You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोयापेंड आयात करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही- पीयूष गोयल
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सोयापेंड आयात करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र प्राइस कमिशनचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी पीयूष गोयल यांची भेट घेतली. त्यावेळेस पटेल यांनी सोयापेंडीवर चर्चा केली. यावेळेस सोयापेंड आयातीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं गोयल यांनी स्पष्ट केलं.
सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर काही दिवसांपासून सुरू आहे. सोयाबीनच्या दराच्या पावत्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.
ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचं पीक मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला नेमका किती दर मिळणार, दरवर्षी सोयाबीन मार्केटला आल्यावरच त्याचे दर का उतरतात, असा प्रश्न शेतकरी विचारताना दिसून येत आहेत.
त्यामुळे सोयाबीनच्या दराचं नेमकं प्रकरण काय आहे, सरकारनं सोयापेंड आयात करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे सोयाबीनच्या दरावर काय परिमाण होतील, याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
सोयाबीनचा भाव दरवर्षी पडतो, कारण...
आमच्या शेतात सोयाबीन होती तेव्हा सोयाबीनला चांगला भाव होता. पण, ती काढणीला आली तर भाव उतरतो. आमचं पीक मार्केटला न्यायची वेळ आली की भाव उतरतो, अशी तक्रार शेतकरी करत आहेत.
त्यामुळे मग काढणीला आल्यावरच सोयाबीनचा भाव का उतरतो, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.
कृषीतज्ञ शरद निंबाळकर यांच्या मते, "सोयाबीनचं पीक मार्केटला न्यायची वेळ आली की, हमखास भाव पडतात, असं जे शेतकरी म्हणतात ते बरोबर आहे.
शेतकऱ्याचा शेतमाल जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा त्यात मॉईश्चर (आर्द्रता किंवा ओल) आहे किंवा इतर कारणं सांगून भाव पाडले जातात. यानंतर व्यापारी हाच माल 2 ते 3 महिने साठवून ठेवतात आणि नंतर अधिक दरानं त्याची विक्री करतात. यातून त्यांना नफा कमावयाचा असतो, कारण हा त्यांचा धंदा आहे. म्हणून वर्षानुवर्षं असं चक्र चालत आलं आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय कारणं कारणीभूत नसतात."
लातूरमधील कडधान्य आणि डाळीचे व्यापारी सुनील कलंत्री सांगतात, "यंदा सोयाबीनला 5500 ते 6000 रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्या राज्यात पाऊस आहे आणि त्यामुळे कमी प्रमाणात सोयाबीन मार्केटमध्ये येत आहे. पाऊस उघडला की ते मोठ्या प्रमाणावर येणार, पण त्यावेळी त्याची मागणी मात्र कमी असणार. यामुळे मग भाव डाऊन होतील."
पण, दरवर्षीच दर का पडतात, असं विचारल्यावर ते म्हणाले, "कारण एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन मार्केटमध्ये येतं. पुरवठा जास्त आणि मागणी कमी अशी स्थिती निर्मिती होते. यंदा तर सोयाबीनचं पीक पण चांगलं आलं आहे. गेल्या वर्षीचा भाव बघून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरली आहे. त्यामुळे सोयाबीनचं क्षेत्रही वाढलं आहे."
शेतकऱ्यांनी काय करायला हवं?
अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी काय करायला हवं, असा प्रश्न पडतो.
याविषयी शरद निंबाळकर सांगतात, "शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक क्षमता वाढवायला हवी. त्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. सोयाबीन 2 ते 3 महिने साठवून ठेवलं तर त्याला चांगला फायदा मिळू शकतो. ते ताबडतोब विकलं की नुकसान होतं. यासाठी गावागावांत 'गाव तिथं गोदाम' या संकल्पनेवर प्रभावीपणे काम व्हायला हवं."
तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सोयाबीन संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्हेत्रे सांगतात, "तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर पिकामध्ये मॉईश्चर वाढलेलं असेल, काडी-कचरा आणि काळा डाग असेल तर भाव डाऊन होतो, कमी मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यानं सोयाबीन लगेच न विकता काही काळ थांबावं, गरजेप्रमाणे थोडाथोडा माल विकावा."
सरकारी निर्णयाचा सोयाबीनच्या दराला फटका?
केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यात 12 लाख मेट्रिक टन जीएम (जनुकीय बदल केलेल्या) सोयापेंड आयातीला परवानगी दिली आहे. जीएम सोयापेंडीचा वापर प्रामुख्यानं पोल्ट्री उद्योगात कच्चा माल म्हणून केला जातो.
जुलै-ऑगस्ट महिन्यात पोल्ट्रीसाठीचा कच्चा माल अजिबात उपलब्ध नव्हता. त्यामुळे मग पोल्ट्री उद्योजकांनी सोयापेंड आयातीची मागणी केली होती.
आता ऑक्टोबर महिन्यात या हंगामातील सोयाबीन मार्केटला आल्यानंतर आयात सोयापेंडही बाजारात उपलब्ध होणार असल्यानं सोयाबीनला कमी भाव मिळेल, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शेतमाल बाजारभावाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांच्या मते, "सोयाबीनच्या दरावर नक्कीच परिणाम होणार आहे. 12 लाख टन माल बाहेरून येऊन पडणार, त्यामुळे निश्चितच दबाव येणार. चांगल्या क्वालिटाचा माल 4500 रुपये प्रती क्विंटलपर्यंत जाण्याची भीती, मला वैयक्तिरित्या वाटते."
ते पुढे सांगतात, "खरं तर जुलै-ऑगस्ट महिन्यात कोंबड्यांना द्यायला मालच उपलब्ध नव्हता. त्याचवेळेस सरकारनं सोयापेंडची आयात करायला हवी होती. पण, तसं न करता आयात ऑक्टोबरपासून केली जात आहे. त्यामुळे आता एकाच वेळी शेतातलं सोयाबीन आणि आयात केलेला माल मार्केटला येणार आहे."
कृषी मूल्य आयोगाचे माजी सदस्य पाशा पटेल सांगतात, "यंदा पोल्ट्री उद्योगाला कच्चा मालच उपलब्ध नव्हता. यासाठी सरकारनं सोयापेंड आयात चुकीच्या काळात करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा गरज होती, तेव्हा सोयापेंड आली नाही आणि गरज नसताना उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्याचा माल आणि आयात माल एकदाच मार्केटमध्ये येणार, असा खेळ झाला. याचाच परिमाण सोयाबीनच्या दरावर झाला आहे."
पण पुढच्या 2 महिन्यांत ही परिस्थिती बदलेल आणि सोयाबीनला चांगला भाव मिळेल. तसंच शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी काही काळ थांबलं पाहिजे, असं पटेल सांगतात.
व्हायरल पावत्या
सोयाबीनच्या दराच्या काही पावत्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
यातली एक पावती 13 सप्टेंबर 2021 रोजीची असून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील आहे. यात सोयाबीनला प्रती क्विंटल 11,501 रुपये दर मिळाल्याचं दिसून येत आहे.
तर दुसरी पावती अकोला जिल्ह्यातल्याच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील आहे. या पावतीवर 20 सप्टेंबर 2021 रोजी सोयाबीनला प्रती क्विंटल 3950 रुपये आहे.
या पावत्या पाहून केवळ एका आठवड्याभरात सोयाबीनचे भाव 11 हजारांहून 4 हजारांवर आल्याची चर्चा सुरू झाली.
पावत्यांमागचं सत्य
या व्हायरल पावत्यांमागचं सत्य जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्याशी संपर्क साधला.
ते म्हणाले, "ज्यावेळेस बाजार समितीत शेतमालाची आवक सुरू होते, त्यावेळेस सुरुवातीला आलेल्या एक-दोन शेतकऱ्यांना बाजारभावाच्या डबल भाव देऊन त्यांचा सत्कार केला जातो. याला व्यापाऱ्यांच्या भाषेत मुहूर्ताचा भाव असं म्हणतात. शेतकरी घेऊन आलेल्या एकूण मालापैकी साधारण दोन-तीन क्विंटलला असा भाव दिला जातो. हा मुहूर्ताचा भाव देऊन झाला की मग नियमितपणे शेतमालाचे लिलाव होतात आणि मार्केटच्या दरानं खरेदी केली जाते."
पण, सोयाबीनचे भाव दर पडलेत. ते 11 हजारांहून 4 हजारांवर आल्याची चर्चा सुरू आहे, असं विचारल्यावर ते म्हणाले, "हे सगळं मीडियावाल्यांनी छापलं आहे. सोयाबीनचे दर 4500 ते 5000 रुपयांदरम्यान आहेत. जास्तीत जास्त ते 5500 पर्यंत जात आहेत. सोयबीनला सरकारचाच हमीभाव 4000 रुपये असेल, तर मार्केटमध्ये 11 हजार रुपये दर कसा मिळणार?"
केंद्र सरकारनं 2021-22 या वर्षासाठी सोयाबीनसाठी 3,950 इतका हमीभाव जून महिन्यात जाहीर केला आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय भेंडारकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "अकोटमध्ये या महिन्यात सोयाबीनला 4000 ते 6700 रुपये प्रती क्विटंल इतका भाव मिळत आहे. शेतकऱ्याला जो काही भाव मिळत आहे, तो सोयाबीनची क्वालिटी पाहून दिला जात आहे. सध्या 40 टक्के शेतकरी असे आहेत, जे मॉईश्चरचं प्रमाण अधिक असलेली सोयाबीन घेऊन येत आहेत. शेतातून काढलं की पीक थेट मार्केटला आणत आहेत."
सोयाबीनचे भाव पडलेत का असं विचारल्यावर ते म्हणाले, "सोयाबीनचे दर 10 हजारांवरून 4 हजारांवर आले, असं काही झालेलं नाही. आमच्याकडे 6500 रुपये इतका मुहूर्ताचा भाव होता. तो आवक सुरू झाल्यानंतर पहिल्या बोलीच्या वेळेस दिला गेला. आता मात्र मार्केट रेटनं मालाची खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. यंदा सोयाबीनला चांगली मागणी आहे. 40 टक्के मॉईश्चर असलेली सोयाबीनही 4000 रुपयांच्या जवळपास भाव मिळत आहे. हमीभावापेक्षाही अधिक हा भाव आहे."
शेतमालाचे दर ठरवताना त्यात मॉईश्चर (ओल किंवा आर्द्रता), डाग किंवा काळे पडलेले आणि त्यात असलेला काडी-कचरा किंवा माती हे तीन निकष आधारभूत मानले जातात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)