सोयाबीन दर : शेतमालाचे दररोजचे बाजारभाव कुठे व कसे पाहायचे?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

हंगाम खरीप असो की रब्बी, पीक काढून घरात आणलं की त्याला मार्केटमध्ये नेमका किती भाव मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारतात.

आता शेतकऱ्यांना हा भाव जाणून घेण्यासाठी मार्केटला जाण्याची गरज नाही किंवा कुणाला फोनही करण्याची गरज नाही.

तुम्ही घरबसल्या फोनवर तुमच्या शेजारील मार्केटमध्ये शेतमालाची काय दरानं खरेदी केली जात आहे, ते पाहू शकता.

इथं तुम्ही केवळ तुमच्या भागातीलच नाही, तर तुमच्या शेतमालाला देशातल्या कोणत्या बाजारपेठेत किती दर मिळतोय, तेही पाहू शकता.

पण, मग हे दर कसे आणि कुठे पाहायचे याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.

असे पाहा शेतमालाचे बाजारभाव

पिकांचे दररोजचे बाजारभाव पाहण्याचं ठिकाण म्हणजे Agmarknet.

Agmarknet ही भारत सरकारची अधिकृत वेबसाईट आहे, जिथं तुम्हाला देशभरातील बाजारपेठांधील पिकांचे बाजारभाव पाहता येतात.

आता ते पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला agmarknet.gov.in असं सर्च करायचं आहे.

या वेबसाईटवर डावीकडे तुम्हाला सर्च हा पर्याय दिसेल.

इथं तुम्हाला पहिला जो प्राईसचा रकाना दिलेला आहे, तिथं प्राईस पर्याय तसाच ठेवायचा आहे.

त्यानंतर कमोडिटी या रकान्यात तुम्हाला ज्या पिकाचा बाजारभाव पाहायचा आहे, ते पीक निवडायचं आहे.

आता मला सोयाबीनचा बाजारभाव पाहायचा असल्यानं मी सोयाबीन हे पीक निवडलं आहे.

पुढे स्टेट या रकान्यात तुमचं राज्य म्हणजे महाराष्ट्र निवडायचं आहे.

त्यानंतर डिस्ट्रिक्ट या रकान्यात तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जसं मी माझा जिल्हा बुलडाणा निवडला आहे.

नंतर मार्केट या रकान्यात तुमच्या भागातील बाजारसमिती निवडायची आहे. जशी मी माझ्या तालुक्यातील देऊळगाव राजा ही बाजारसमिती निवडली आहे.

पुढे तुम्हाला डेट फ्रॉम आणि डेट टू हे दोन रकाने दिसतील.

इथं आपल्याला ज्या तारखेचा बाजारभाव पाहायचा आहे, ती निवडायची आहे.

आता मला 20 नोव्हेंबरचा सोयाबीनचा बाजारभाव पाहायचा असल्यानं मी डेट फ्रॉम या रकान्यात 20 नोव्हेंबर 2021 ही तारीख निवडली आहे आणि डेट टू या रकान्यात 21 नोव्हेंबर 2021 ही तारीख निवडली आहे.

एकदा का तारीख टाकून झाली की तुम्हाला समोर असलेल्या गो या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. 20 नोव्हेंबर रोजी देऊळगाव राजा बाजार समितीतील सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती देणारं हे पेज आहे, अशा आशयाचं शीर्षक इथं तुम्हाला दिसेल.

इथं तुम्ही पाहू शकता की, 20 नोव्हेंबरला देऊळगाराजा बाजारपेठेत सोयाबीनला कमाल म्हणजेच जास्तीत जास्त बाजारभाव 6 हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तर किमान म्हणजेच कमीतकमी बाजारभाव 4500 रुपये प्रती क्विंटल आणि सरासरी 5500 रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळाला.

अशाप्रकारे Agmarknet या वेबसाईटवर तुम्ही तुम्हाला हवं असलेलं राज्य, शेतमालाचा प्रकार आणि बाजारपेठ निवडून तिथला बाजारभाव पाहू शकता.

विक्रीयोग्य अशा 300 शेतपिकांचे बाजारभाव इथं उपलब्ध असल्याचं ही वेबसाईट सांगते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)