You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शशिकांत शिंदे: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार समर्थकांनीच का फोडले राष्ट्रवादीचे ऑफिस?
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी कोल्हापूरहून
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या निकालानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन नेत्यांमध्ये बेबनाव झाल्याचं चित्र आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात मोठी राडेबाजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
झालेल्या प्रकाराबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली.
ते म्हणाले, "राष्ट्रवादी पक्षामुळे माझी ओळख आहे. मला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मदत केली पण जिल्ह्यातील नेत्यांनी मला पाडणे हे ठरवून केलेले एक षड्यंत्र आहे. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, हे शरद पवार यांना माहीत आहे. पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझं नाव निश्चित झालं होतं.
"मतदारांचा आकडाही मी समोर ठेवला होता. रामराजे निंबाळकर हे देखील या बैठकीला होते. त्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. पण ते किती प्रामाणिक होते माहीत नाही, माझ्या पराभवामागे मोठे कारस्थान आहे. येत्या काळात ते समोर येईल," शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे यांचा पराभव, राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयावर दगडफेक
शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याचे वृत्त पसरताच त्यांचे समर्थक आक्रमक झालेत. त्यांनी साताऱ्यात राडा घालत राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले.
शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फोडल्याचे वृत्त परसरताच पोलिसांनी कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. साताऱ्यात शिंदेना पराभव लागला जिव्हारी लागल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे. या जिल्हा बँक निवडणुकीत अनेक दिग्गजांना निवडणुकीत धक्का बसला.
एका मताने पडले शिंदे
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अनेक अर्थाने चुरशीची झाली. निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतर झालेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र आहे. सातारा जिल्हा बँकेत एकूण 21 संचालक आहेत.
यात विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर, उदयनराजे भोसले यांच्यासह 11 संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामुळं उर्वरित 10 संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक पार पडली.
चुरशीने मतदान झालेल्या निवडणुकीचे निकालही तितकेच धक्कादायक आले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे या उमेदवाराकडून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.
जिल्हा बँकेच्या जावळी मतदार संघासाठी एकूण 49 मतदारांनी मतदान केले. यापैकी शशिकांत शिंदे यांना 24 तर ज्ञानदेव रांजणे यांना 25 मतं मिळाली. शिंदे यांचं संचालकपद अवघ्या एका मताने हुकलं.
ही निवडणूक इतकी महत्त्वाची का ठरली?
ज्ञानदेव रांजणे हे आ. शिवेंद्रराजे यांचे निष्ठावंत समर्थक म्हणून ओळखले जातात. शिंदे यांना धूळ चारत राष्ट्रवादीचे बंडखोर पण शिवेंद्रसिंहराजे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी जिल्हा बँकेत प्रवेश मिळवला आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात या बॅंकेचे महत्त्व काय आहे याविषयी पुढारीचे वृत्तसंपादक हरिश पाटणे सांगतात, "राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्याचं राजकारण अनेक अर्थानी वेगळं आहे. साताऱ्यातील जिल्हा बॅंकेवर वर्चस्व असणारे नेते राजकारणाच्या मुख्य प्रवाहात स्थान बळकट करतात हा सातारा जिल्ह्याचा इतिहास आहे."
"यशवंतराव चव्हाण, किसनवीर आबा यांच्यापासून ते विलासराव उंडाळकर, लक्ष्मण पाटील, अभयसिंहराजे भोसले या सहकारातील दिग्गजांनी जिल्ह्याच्या राजकारणावर जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून पकड मजबूत केली. पुढे हीच परंपरा रामराजे निंबाळकर, शिवेंद्रराजे यांनी कायम ठेवली. त्यामुळं जिल्हा बॅंक निवडणुकीचा जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होतो," असं, दैनिक पुढारीचे वृत्तसंपादक हरिश पाटणे यांना वाटतं.
"शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत झालेल्या गटातटाच्या राजकारणाचा फटका बसला आहे. माण, कराड इथं भाजपसोबत केलेली जवळीक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता आहे," असं हरिश पाटणे यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)