शरद पवार: 'सत्ता गेल्यावर अस्वस्थता इतक्या टोकाला जाऊ नये'

    • Author, प्रवीण मुधोळकर,
    • Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूरहून

"सत्ता गेल्यावर माणसे अस्वस्थ होतात. पण, सत्ता गेल्यावर अस्वस्थता इतक्या टोकाला जाऊ नये," अशी टीका शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

"गेल्या दोन तीन दिवसांत देवेंद्र फडणवीसांनी केलेली वक्तव्यं पाहिली तर लक्षात येईल की ती वक्तव्यं उथळपणाची आहेत. मी चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो पण अशा संवेदनशील प्रकरणांवर मी कधीही पक्षीय भूमिका घेतली नाही. राज्याच्या हिताचे काय आहे हेच मी पाहिले," असे शरद पवार म्हणाले.

मुंबईत भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना फडणवीसांनी अमरावती, मालेगाव आणि नांदेडमधील हिंसाचार हा प्रयोग असल्याचे वक्तव्य केलं होतं. देशात अराजक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार विरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यावर फडणवीसांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटते, असे पवार म्हणाले.

"अमरावती आणि राज्यातील काही शहरात ज्या दंगली झाल्या त्या काही विशिष्ट व्यक्तींनी आणि विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी घडवून आणलं असे प्रथमदर्शनी दिसत. अजून ते इस्टॅब्लिश व्हायचंय. पण यामुळे संपूर्ण गृहखातं अपयशी ठरले किंवा संपूर्ण राज्य सरकार अपयशी ठरलंय अस मला वाटत नाही. मला महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांची तपासाची क्षमता मला माहीत आहे." असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. पवार यांनी नागपुरात बुधवार पत्रकार परिषद घेतली.

अमरावतीमधील दंगलीत भाजपासह रझा अकादमी आणि युवासेनेचाही हात असल्याचे बोलले जाते.

यावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, "मला यातील वस्तुस्थिती माहिती नाही. नेमकी माहिती घेऊन बोलेन. समज, गैरसमज आणि अफवेतून चुकीच्या काही घटना घडल्या असतील तर चौकशी नंतर कारवाई होईल. या घटनांमध्ये काहींनी कायदा हातात घेतला. तर काहींनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फायदा घेतल्याची शंका आहे. पण, त्याच्या खोलात जाण्याची गरज आहे."

अभिनेत्री कंगना राणावत हीचे बोलणे गांभीर्याने घेण्यासारखे नाही. त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे, असे ते म्हणाले. महात्मा गांधींचे महत्त्व संपूर्ण जगाने ओळखले आहे. गांधीजींवर कुणी बरळल्याने काही फरक पडणार नाही.

"माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग फरार असल्याचे सांगितले जाते. ते समोर येऊन वस्तुस्थिती सांगायला तयार नाही. त्यामुळे अनिल देशमुखांना विनाकारण पोलिस कोठडी मिळाली आणि त्यांच्यावर अन्याय झाला," असे पवार म्हणाले.

"आमची विचारधारा ही गांधी नेहरूंची आहे, आम्ही जरी थेट काँग्रेसमध्ये नसलो तरी विचारधारा तीच आहे. पण काही लोक ज्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपकडून लढवली होती. त्यांची मानसिकता आणि वैचारिक बांधिलकी काय असेल हे लक्षात घ्या," असा टोला पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

"विदर्भातील राष्ट्रवादीचे एकमेव दुकानही बंद पडेल," असे वक्तव्य नाना पटोले यांनी बुलडाणा येथे केले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांचे सोयाबीनच्या प्रश्वावर नागपुरात आंदोलन सुरू आहे. यावर पवार म्हणाले तुपकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांच्या मागण्यांसंबंधात निर्णय घेणाऱ्यांशी बोलल्यानंतरच मार्ग निघेल.

नागपूर येथील व्यापाऱ्यांच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. यावर बोलतांना पवार म्हणाले, "नितीन गडकरींची मी नेहमी तारीफ करतो. कारण ते पक्षातीत आहेत. विकासाच्या बाबतीत ते भेद करीत नाहीत. मात्र, त्यांना बळ देण्यासंदर्भात मोदींशी बोलायला हवे. कारण त्यांना बळ देणे हे मोदींच्या हातात आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)