You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवाब मलिक : 'अमरावतीमध्ये बंदच्या आडून दंगल घडवण्याचा भाजपचा डाव होता'
अमरावतीध्ये बंदच्या आडून सुनियोजित पद्धतीनं दंगल घडविण्याचा भाजपचा डाव होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
"रझा अकादमीच्या लोकांशी आशिष शेलार मिटींग करत होते. यासंदर्भातला माझ्याकडे फोटो आहे. आशिष शेलार तिथे काय करत होते, याचा खुलासा त्यांनी करावा," असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.
नवाब मलिक यांनी आज (15 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन अमरातीमधील हिंसाचार हा सुनियोजित असल्याचा आरोप केला.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, शनिवारी (13 नोव्हेंबर) अमरावतीमध्ये भाजपकडून बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. "मात्र बंदच्या आडून सुनियोजित पद्धतीने दंगल घडविण्याचा भाजपचा डाव होता, जो पोलिसांनी उधळून लावला," असा दावा त्यांनी केला आहे.
अमरावतीमध्ये दोन समुदायांमध्ये दंगा झाला नव्हता, असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय.
"भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि अन्य नेत्यांनी अमरावीमध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन 2 नोव्हेंबरलाच केला होता. पोलीस तपासात ही माहिती समोर आली आहे," असंही नवाब मलिकांनी म्हटलं.
"भाजपचा हा हातखंडा आहे. सर्व उपाय थकले की, दंगलींचं हत्यार बाहेर काढून राजकारण केलं जातं," असाही आरोप मलिकांनी केला.
'तो' राष्ट्रवादीचा नगरसेवक नाही
दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीच्या मालेगावातील नगरसेवकावर गुन्हा दाखल केला असल्याची चर्चा आहे. मात्र त्यात तथ्य नसल्याचं मलिक यांनी म्हटलंय.
मलिक यांनी सांगितलं की, आमदार मुफ्ती यांनी 2014ची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढली होती. त्यांच्यासोबत आलेल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. नंतर काँग्रेससोबत राष्ट्रवादीची युती झाली. त्यामुळे मालेगाव मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने मुफ्ती हे एमआयएमसोबत गेले.
त्यांच्यासोबत इतर नगरसेवकही गेले. कागदपत्रावर ते राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. पण प्रत्यक्षात ते एमआयएममध्ये आहेत, असंही मलिक यांनी म्हटलंय.
आशिष शेलारांचं प्रत्युत्तर
"अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या दंगलींचा आणि सन 2016-17च्या फोटोंचा संबंध काय? माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय?" असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार यांनी म्हटलं की, "ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका."
रझा अकादमी सोबतचे असे असंख्य फोटो आम्हाला दाखवावे लागतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादीने फोटोचं राजकारण बंद करावं, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.
अमरावतीमध्ये नेमकं काय झालं?
त्रिपुरात झालेल्या धार्मिक हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये शुक्रवारी (12 नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
रझा अकादमी या संघटनेकडून अमरावतीत तोडफोडीचा प्रकार घडल्याचं समोर आलं. तो प्रकार शमतो न शमतो त्याच्या निषेधार्थ शहरात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून दुसऱ्या दिवशी बंदचं आवाहन करण्यात आलं.
बंद पुकारलेल्या दिवशीही (शनिवार, 13 नोव्हेंबर) अमरावतीत गोंधळाचं वातावरण होतं. यादरम्यान काही ठिकाणी पळापळी, तोडफोडीचं दृश्यही समोर आलं.
त्यानंतर जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)