एसटी संप : '150 रुपयाच्या तिकिटासाठी 500 रुपये आणायचे कुठून?'

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून

''आम्हाला वाईला जायचंय. गेले दोन तास झालं इथं थांबलोय. वाईसाठी कुठलीच खासगी गाडी मिळेना. साताऱ्यापर्यंत गाड्या आहेत, पण खासगी ट्रॅव्हल्सवाले 400 ते 500 रुपये घेतायेत. आता आमच्यासारख्यानं कसं जायचं सांगा.''

पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्थानकात वाईसाठी जाण्यासाठी मुबारक डांगे आणि त्यांच्या पत्नी थांबल्या होत्या. मुबारक यांना आठवड्यातून दोनवेळा वाईहून पुण्याला डायलिसिससाठी यावं लागतं.

पुण्यातल्या नोबेल हॉस्पिटलमध्ये ते डायलिसिससाठी येतात. एसटीचा संप असल्याने त्यांना वाईला त्यांच्या घरी जाण्यासाठी कुठलंही वाहन मिळत नव्हतं. साताऱ्यापर्यंत काही ट्रॅव्हल्स नेत होते. परंतु ते अव्वाच्या सव्वा भाडे आकारत होते.

त्यामुळे घरी जायला बस कधी मिळेल या आशेने दोघे स्वारगेट एसटी स्टेशनमध्ये भटकत होते.

बीबीसी मराठीशी बोलताना मुबारक म्हणाले, ''मला डायलिसिससाठी आठवड्यातून दोन वेळा पुण्याला यावं लागतं. एसटीचा संप असल्याने आम्ही अशाच एका खासगी गाडीने पुण्यात आलो. पुण्यात आमचं कोणी नाही. आम्ही डायालिसिसनंतर दोन दिवस हॉस्पिटलमध्येच राहिलो. आता घरी निघालो तर वाहन मिळत नाही.''

ते पुढे म्हणाले, ''साताऱ्यापर्यंत काहीजण नेतायेत पण ते आम्हाला 400 ते 500 रुपयांची मागणी करतायेत. एसटी सुरू होती तेव्हा आम्ही 150 ते 200 रुपयात महाबळेश्वरपर्यंत जात होतो. एसटीच्या संपामुळे आमच्यासारख्या सामान्य लोकांचे हाल होतायेत. खासगी ट्रॅव्हल्सकडून आमची लूट होतीये याकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यायला हवं.''

मुबारक यांच्यासारखाच अनुभव आम्हाला देखील आला. आम्ही प्रवासी म्हणून स्वारगेट स्थानकात गेलो. साताऱ्याला जाण्यासाठी किती पैसे लागतील असे आम्ही एका खासगी ट्रॅव्हल्सला विचारले, तेव्हा आम्हाला 300 रुपये सांगण्यात आले. तर एका प्रवासी कार चालकाने आम्हाला 400 रुपये लागतील असे सांगितले.

असं असलं तरी आम्ही आरटीओने ठरवून दिलेल्या दरात प्रवासी वाहतूक करतोय, असं ट्रॅव्हल्सच्या लोकांचं म्हणणं आहे.

पुणे मुंबई ट्रॅव्हल्स चालविणारे गणेश कुडले म्हणाले, ''आरटीओने आम्हाला दरपत्रक दिलंय. त्याप्रणाणे आम्ही प्रवासी वाहतूक करतोय. मुंबईला जाण्यासाठी एसी बससाठी आम्ही 500 रुपये आकारतोय. एसटी सुरू होती तेव्हा आम्हालासुद्धा स्पर्धा असायची. त्यामुळे कमी पैशात आम्ही प्रवाशांना घेऊन जायचो. एसटी बंद असल्याने आरटीओच्या दराप्रमाणे आम्हाला तिकीटाचे उलट जास्त पैसे मिळत आहेत.''

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने राज्य शासनाने खासगी ट्रॅव्हल्सला एसटी स्थानकातून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली. त्यामुळे स्वारगेट स्थानकात ज्या फलाटांवर एसटी लागत होत्या, त्या फलाटांवर खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असल्याचं चित्र होतं.

त्यात खासगी बसेस बरोबरच 17 सीटर, खासगी टॅक्सी अशा सर्व प्रकारची वाहने उभी होती. आरटीओचे कर्मचारी या वाहनांची तपासणी करताना आणि प्रवाशांची सुरक्षा खरंच घेतली जात आहे का याची पाहणी करताना दिसून आले.

या दराविषयी पुण्याचे उपप्रादेशिक अधिकारी संजय ससाणे म्हणाले, ''खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस या सेमी लक्झरी आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी एसटीने वेगळे दरपत्रक तयार केले आहे. त्या दरपत्रकाप्रमाणे प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश खासगी ट्रॅव्हल्सला दिले आहेत.

''जो शेवटचा थांबा असेल त्याच थांब्याचे जास्तीत जास्त प्रवासी घेण्याच्या सुचना या ट्रॅव्हल्सला केल्या आहेत. त्यामुळे एखाद्याला मधल्या कुठल्या ठिकाणी जायचे असेल तर त्यांना त्या ठिकाणी जाणाऱ्या खासगी बसची वाट पाहावी लागेल.''

एकीकडे खासगी बसेसला एसटी स्थानकातून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली असली, तरी दुसरीकडे एसटीचे कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. अद्यापती एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही.

राज्य सरकारनं आतापर्यंत 2937 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)