एसटी संप: 'राज्याची परिस्थिती बिकट, त्यात भाजपने ST कर्मचाऱ्यांना भडकवलं' - संजय राऊत #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. राज्याची परिस्थिती बिकट, त्यात भाजपने ST कर्मचाऱ्यांना भडकवलं - संजय राऊत

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ST कर्मचाऱ्यांच्या सध्याच्याच मागण्या घेऊन कर्मचारी गेले होते. पण तिथून त्यांना हाकलून देण्यात आलं. मात्र आता भाजप ST कर्मचाऱ्यांची माथी भडकवत आहे, असा आरोप शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे.

सध्या सुरू असलेल्या एसटी संपासंदर्भात प्रतिक्रिया देताना राऊत बोलत होते.

"भाजप एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवत आहेत. आम्हाला कामगारांचे प्रश्न कुणी शिकवण्याची गरज नाही. कर्मचाऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नये," असं आवाहन राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं.

टीव्ही 9 मराठीच्या बातमीनुसार ते म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सरकारला सहानुभूती आहे. शिवसेना कामगार क्षेत्रातून जन्माला आली आहे. शिवसेनेचा पाठिराखा मजूर, गिरणी कामगार आहे. शिवसेना कष्टकऱ्यांचे नेतृत्व करते. त्यामुळे शिवसेनेची एसटी कर्मचाऱ्यांविषयी भूमिका चुकीची आहे, असं सांगण्याची गरज नाही."

2. 'गुड गोईंग' नवाब मलिक - उद्धव ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी NCB तसंच भाजप नेत्यांवर विविध आरोप केले आहेत. त्याला भाजपकडून प्रत्युत्तरही मिळताना दिसतं.

सध्या सर्वच माध्यमांमध्ये हा वाद गाजताना दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्या या भूमिकेचं कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिकांचे गुड गोईंग असं म्हणत कौतुक केल्याचं सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही नवाब मलिक यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे.

नवाब मलिक यांनी हीच भूमिका पुढे सुरू ठेवावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली, अशी बातमी एबीपी माझाने दिली आहे.

3. येत्या 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान काँग्रेसकडून जनजागरण सप्ताह, जेलभरो आंदोलन

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून गरीबांना लुटायचं आणि उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून देशातील महागाई प्रचंड वाढली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मोदी सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून जनतेची लूट चालवली आहे. त्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात येईल. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान जनजागरण सप्ताह अभियान राबवण्यात येईल. तसंच राज्यात जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. ही बातमी लोकमतने दिली आहे.

4. नवाब मलिक यांचे आरोप चुकीचे असल्याचं सिद्ध करा - कोर्टाची ज्ञानदेव वानखेडेंना सूचना

मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याबाबत आरोप केल्यानंतर त्याविरोधात वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

या प्रकरणात मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं सिद्ध करा, अशी सूचना हायकोर्टाने ज्ञानदेव वानखेडे यांना केली आहे.

तसंच नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत एक शपथपत्र दाखल करावं, असंही कोर्टाने म्हटलं.

समीर वानखेडे हे आता सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार कुणालाही आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे यांनी मंत्र्यांचा वक्तव्य चुकीचं असल्याचं सिद्ध करावं, असं न्या. माधव जामदार यांनी म्हटलं. ही बातमी NDTV ने दिली.

5. किरीट सोमय्या यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश

भाजप नेते किरीट सोमय्या यांना नागपूर सत्र न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

येत्या 20 नोव्हेंबर रोजी त्यांनी नागपूर कोर्टात हजर राहावं, असं न्यायालयाने पाठवलेल्या समन्समध्ये म्हटलं आहे.

किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विविध आरोप करत आहेत.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात 1 रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलेला आहे.

त्यावर बुधवारी (10 नोव्हेंबर) दिवाणी न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. कोर्टाने किरीट सोमय्या अथवा त्यांच्या वकिलांनी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात उपस्थित राहावे, अशी सूचना केली आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)