आर्यन खान खटल्याशी संबंधित हे 10 लोक तुम्हाला माहिती आहेत का?

आर्यन खान खटल्याशी संबंधित हे 9 लोक तुम्हाला माहिती आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबई हायकोर्टाबाहेरील एक छायाचित्र

आर्यन खानला अटक करणारे एनसीबीच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे आणि इतर तिघांविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. आर्यन खान प्रकरणाशी संबंधित हा भ्रष्टाचाराचा गुन्हा आहे.

तसंच, या प्रकरणी सीबीआयच्या पथकाने मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधील 29 ठिकाणी छापे टाकले आहेत.

या घडामोडीच्या निमित्ताने याप्रकरणाशी नेमकं कोण कोण निगडीत आहे याचा घेतलेला आढावा.

2 ऑक्टोबरला रात्री एनसीबीनं मुंबईजवळ एका क्रूझवर ड्रग्ज पार्टीप्रकरणी कारवाई केली आणि काही जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्यांमध्ये एक नाव होतं अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. या कारवाईसोबतच ती करणाऱ्या अधिकाऱ्याची, समीर वानखेडे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित असणारी विविध माणसं समोर येत गेली.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गेले काही दिवस सतत आरोप केले आहेत.

त्या आरोपांना वानखेडेंकडून प्रत्युत्तरंही देण्यात आली. दररोज नवा आरोप आणि त्याला उत्तर यामुळे या प्रकरणाशी अनेक लोक संबंधित असल्याचं दिसत आहे. यातील प्रमुख लोकांची माहिती येथे घेऊ.

1. आर्यन खान-

अभिनेता शाहरूख खान आणि पत्नी गौरी खान यांचं आर्यन खान हे पहिलं अपत्य होय. आर्यनचा जन्म 13 नोव्हेंबर 1997 रोजी नवी दिल्ली येथे झाला. रेव्ह पार्टीत सहभागी झाल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

आर्यनने लंडनच्या सेव्हन ओक, तसंच भारतात धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपलं शालेय शिक्षण घेतलं. पुढे कॅलिफोर्नियातून त्याने सिनेमा निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं, असं टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

आर्यन खान

फोटो स्रोत, SHAHID SHAIKH/BBC

फोटो कॅप्शन, आर्यन खान

शाहरुख खानप्रमाणेच आर्यन खानलाही चित्रपट क्षेत्रातच रस आहे. 2001 मध्ये आलेल्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात त्याने काम केलं होतं. तसंच 'कभी अलविदा ना कहना' चित्रपटातही त्याने काम केलं होतं. त्याचा सिन नंतर कट केल्याचं म्हटलं जातं.

चित्रपट क्षेत्रातील आवडीपोटीच आर्यनने पुढे जाऊन कॅलिफोर्नियाच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथं त्यांने फिल्म मेकिंगचा कोर्स पूर्ण केला.

आर्यन खानने आतापर्यंत दोन चित्रपटांसाठी आवाज दिला आहे. 2004 साली 'द इनक्रेडिबल्स'चं हिंदी व्हर्जन 'हम है लाजवाब' या चित्रपटात त्याने पहिल्यांदाच आपला आवाज दिला.

या चित्रपटाकरिता आर्यनला सर्वोत्तम डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला.

यानंतर 2019 मध्ये आर्यन खानला आपल्या वडिलांसोबत काम करण्याची पुन्हा संधी मिळाली. 'लायन किंग' चित्रपटात दोघांनीही आपला आवाज दिला होता. शाहरुखने मुफासा तर आर्यनने सिंबा या पात्राला आपला आवाज दिला होता.

आर्यनने मार्शल आर्टचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याला तायक्वांदो प्रकारात ब्लॅक बेल्ट मिळालेलं आहे.

2010 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत आर्यनने सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

न्यायालयात त्याच्या जामिनासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले असून त्याच्या कारागृहातील वास्तव्यासंदर्भातही अनेक बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत.

2. शाहरुख खान-

शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 ला ताज मोहम्मद खान आणि लतीफ फातिमा यांच्या कुटुंबात झाला. सुरुवातीची पाच वर्षं तो आपल्या आजीजवळ मंगळुरूमध्ये आणि नंतर बंगळुरूमध्ये वाढला. शाहरुखची आई मूळ हैदराबादची होती. वडील वकील आणि मूळचे पेशावरचे होते.

शाहरुख दिल्लीत लहानाचा मोठा झाला. सेंट कोलंबा शाळेत शिकताना तो खेळात कायमच पुढे होता. हंसराज कॉलेजमधून त्याने अर्थशास्त्रात बी. ए. केलं आणि मास कम्युनिकेशनमध्ये एम. ए. करायला जामिया मिलीया इस्लामियात प्रवेश घेतला, पण ते शिक्षण पूर्ण केलं नाही.

शाहरुख खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शाहरुख खान

फुटबॉल खेळताना एकदा जखमी झाल्यानंतर दिग्दर्शक बॅरी जॉन्सन यांनी शाहरुखला आपल्या एका नाटकासाठी ऑडिशन द्यायला सांगितलं. त्या नाटकात शाहरुख मुख्य डान्सर होता आणि त्याला एक डायलॉगही मिळाला.

बॅरी जॉन्सनना शाहरुखचं गाणंही खूप आवडलं होतं. शाहरुख 15 वर्षांचा असताना त्याचे वडील कॅन्सरने वारले. तरुण वयात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्यानं त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. पुढे जाऊन ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याविरुद्ध निवडणुकीत उभे राहिले आणि हरले. त्यांनी अनेक व्यवसाय करण्याचे अयशस्वी प्रयत्नही केले.

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाशी शाहरुखचं जवळचं नातं होतं. 1974 पर्यंत तिथली खानावळ त्याचे वडील चालवायचे आणि शाहरुख त्यांना सोबत करायचा.

रोहिणी हट्टंगडी, सुरेखा सिक्री, रघुवीर यादव आणि राज बब्बरसारख्या बड्या अभिनेत्यांना त्यानं तिथं काम करतांना पाहिलं. इब्राहिम अलकाझींबरोबर 'सूरज' आणि 'सातवा घोडा' यासारख्या नाटकांच्या तालमी बघताना त्याची नाटक आणि सिनेमाशी तोंडओळख झाली.

पंकज उधासच्या एका कार्यक्रमात कार्यकर्ता म्हणून काम करताना मिळालेलं पन्नास रुपये मानधन ही शाहरुखची पहिली कमाई होती. या पैशांतून शाहरुख ट्रेननं आग्र्याला गेला.

1991 सालीच शाहरुखला हेमा मालिनींबरोबर 'दिल आशना है' हा त्याचा पहिला चित्रपट मिळाला. पण 25 जून 1992 रोजी 'दिवाना' रिलीज झाला आणि नायकाच्या भूमिकेत तो पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला.

3. नवाब मलिक-

नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत. इंटरनेटवरील माहितीनुसार त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला असून ते मुंबईत कुर्ला येथे राहातात.

नवाब मलिक

फोटो स्रोत, @NAWABMALIKNCP

फोटो कॅप्शन, नवाब मलिक

1995-2004 या कालावधीत ते समाजवादी पक्षाचे नेते होते. त्यानंतर ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. नवाब मलिक मुंबईतल्या अणुशक्ती नगर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. तत्पुर्वी ते नेहरुनगर मतदारसंघाचे आमदार होते.

2014 च्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या तुकाराम काटेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र 2019 साली त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला.

अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्यांचा जावई समीर खानला एनसीबीने अटक केली होती. मात्र दोनन आठवड्यांपुर्वी त्याला कोर्टाने जामीन दिला आहे. त्याच्याकडे सापडलेले पदार्थ म्हणजे 'हर्बल तंबाखू' होता असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं होतं.

भाजप कार्यकर्ते NCB च्या कारवाईत काय करत होते? किरण गोसावीने एनसीबीच्या कारवाईत सहभाग कसा घेतला? त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत मग तो पंच-साक्षीदार कसा?

एनसीबी ने भाजपच्या दिल्ली आणि राज्यातील नेत्यांच्या दबावामुळे भाजप नेत्याच्या नातेवाईकाला का सोडलं? बॉलीवूडमधील सेलिब्रिटी लॉकडाऊनदरम्यान मालदीवला असताना समीर वानखेडे यांचे कुटुंब सुद्धा तिथे होते. वानखेडे दुबईत काय करत होते? समीर वानखेडे आणि एनसीबी खोट्या गुन्ह्यांत लोकांना अटक करतात? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

समीर खान

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, समीर खान

समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीवर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर मलिक यांनी आरोप केले असून, त्यातील काही आरोपांना वानखेडे, त्यांची पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी उत्तर दिली आहेत.

4. समीर वानखेडे-

एनसीबीच्या या हायप्रोफाइल ठरलेल्या केसमध्ये सर्वाधीक लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे समीर वानखेडे यांनी. समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत.

महसूल सेवेत येण्याआधी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये (Central Police Organization) रूजू झाले.

समीर वानखेडे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, समीर वानखेडे

भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner Customs) म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.

त्यानंतर, महसूल गुप्तचर संचलनालय (DRI) आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीतही (NIA) त्यांनी काम केलंय. 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो मुंबईचे विभागीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला.

5. क्रांती रेडकर-

क्रांती रेडकर या मुंबईच्याच. त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झालं. रामनारायण रुईया कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली.

2000 साली 'सून असावी अशी' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2003 साली प्रदर्शित झालेल्या प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली.

क्रांती रेडकर

फोटो स्रोत, INSTAGRAM/KRANTI REDKAR

फोटो कॅप्शन, क्रांती रेडकर

2006 साली आलेल्या 'जत्रा- ह्याला गाड रे त्याला गाड' या चित्रपटात क्रांती यांची भूमिका होती. याच चित्रपटातल्या कोंबडी पळाली तंगडी धरून या गाण्यानं क्रांती यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

2017 साली क्रांती यांचा समीर वानखेडे यांच्याशी विवाह झाला. अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला होता. क्रांती आणि समीर यांना झिया आणि झायदा या दोन जु्ळ्या मुली आहेत.

6. ज्ञानदेव वानखेडे-

ज्ञानदेव वानखेडे हे समीर वानखेडे यांचे वडील आहेत. त्यांचं नाव दाऊद असल्याचा आऱोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या विवाहाची तसेच जन्मदाखल्याचे कागद मीडियासमोर ठेवले त्यात समीर यांच्या वडिलांचा उल्लेख दाऊद असा आहे. मात्र वानखेडे कुटुंबीयांनी तसेच ज्ञानदेव यांनी यात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

समीर यांनी खोट्या नोंदींच्या आधारे नोकरी मिळवली त्यामुळे त्यांची जातपडताळणी समितीकडून तपासणी होईल असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

7. किरण गोसावी-

एनसीबीने कॉर्डिला क्रुझवर छापा टाकल्यानंतर एका व्यक्तीनं आर्यन खानसोबत सेल्फी घेतला. तो सेल्फी सर्वत्र व्हायरल झाला. आर्यन खानसोबत छाप्यानंतर सेल्फी घेणारी व्यक्ती कोण, असा प्रश्न सर्वत्र विचारला जाऊ लागला.

किरण गोसावी

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

फोटो कॅप्शन, किरण गोसावी (खुर्चीत बसलेला आर्यन खान)

त्यानंतर एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीच्या टीमसोबत नऊ पंच होते. त्यात किरण गोसावी हेही होते. मात्र, नंतर किरण गोसावींचा वादग्रस्त इतिहास समोर येत गेला.

किरण गोसावी हे स्वतः प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचं सांगतात. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये किरण गोसावी केपीजी ड्रिम्स सोल्युशन्स नावाची फर्म मुंबईतील घाटकोपर भागात चालवत असल्याचं सांगण्यात आले आहे.

किरण गोसावींच्या विरोधात पुण्यातील चिन्मय देशमुख यांनी 2018 मध्ये फसवणुकीची तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून गोसावी फरार होते. पुणे पोलिसांनी आता त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढली असल्याची माहिती पुण्यातील झोन एकच्या उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी बीबीसी मराठीला दिली होती.

8. प्रभाकर साईल-

याच प्रकरणातील साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांनी व्हीडिओ प्रसिद्ध करत समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप केलेत.

वानखेडे
फोटो कॅप्शन, संजय राऊत, प्रभाकर साईल, समीर वानखेडे

NCB कडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात 9 साक्षीदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावरच होतं. या व्हीडिओमध्ये त्यांनी सांगितलं की, ते किरण गोसावीचे बॉडीगार्ड होते. त्यानंतर त्यांनी किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.

9. सॅम डिसूझा-

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसूझा हे नाव अधून-मधून समोर येत असतानाच, या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी आपल्या व्हीडिओत सॅम डिसूझा यांचं नाव घेतलं.

प्रभाकर साईल यांनी खंडणीचे आरोप केले आणि त्याबाबत जी माहिती दिली, त्यात सॅम डिसूझा हे नाव वारंवर येतं. किंबहुना, शाहरूख खानची मॅनेजर पूजा या जेव्हा भेटायला आल्या, तेव्हा किरण गोसावी, सॅम डिसूझा आणि पूजा हे एकाच गाडीत बसले होते, असंही प्रभाकर साईल यांनी व्हीडिओत म्हटलंय.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

या सगळ्यांत सॅम डिसूझा नावाबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात असतानाच, सोमवारी (25 ऑक्टोबर) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सॅम डिसूझांच्या नावाचा उल्लेख केला. संजय राऊत म्हणाले, "सॅम डिसूझा हा मुंबई आणि भारतातला सर्वांत मोठा मनी-लाँडरिंग प्लेयर आहे. हा मोठा खेळ आहे आणि तो आता कुठे सुरू झालाय. जे सत्य उजेडात येतंय, ते धक्कादायक आहेत. देशभक्तीच्या नावाखाली खंडणी वसूल केली जातेय, खोट्या केसेस टाकल्या जातायत."

10. अनन्या पांडे-

अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात दोनदा चौकशी करण्यात आली.

अनन्या पांडे ही आर्यन खान याची मैत्रीण आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सध्या अटकेत आहे. त्याच्या व्हॉट्सअॅप वर काही चॅट आढळून आल्यानंतर NCB ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.

अनन्या पांडे

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, अनन्या पांडे

अनन्या पांडे ही अभिनेते चंकी पांडे यांची कन्या आहे. 2019 साली 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या सिनेमातून अनन्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

त्यानंतर 'पती, पत्नी और वो', 2020 मध्ये प्रदर्शित झालेला 'खाली पीली' या सिनेमांमध्ये ती झळकली. तर आगामी वर्षभरात अनन्याचे आणखी 3 सिनेमे येऊ शकतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)