आर्यन खान-वानखेडे प्रकरण: लपून बसलेल्या किरण गोसावींची पहिली मुलाखत

आर्यन खान

फोटो स्रोत, Social Media

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे स्वतंत्र साक्षीदार किरण गोसावी यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आलाय. याच प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल यांनी गोसावी यांच्यावर 25 कोटी रूपये खंडणी मागितल्याचा आरोप केलाय.

ड्रग्ज प्रकरणानंतर किरण गोसावी बेपत्ता आहेत. बीबीसीने त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी किरण गोसावींना संपर्क केला.

किरण गोसावी अद्याप पोलिसांच्या ताब्यात का नाहीत, अशी विचारणा बीबीसी मराठीने पुणे पोलिसांकडे केली असता पुणे पोलिसांनी सांगितले की, "किरण गोसावी यांनी अजून सरेंडर केलेलं नाही. आम्ही अलर्ट आहोत. पोलीस स्टेशन आणि कोर्टातही अलर्ट आहोत. त्यांनी काही माध्यमांना मुलाखत दिली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"आम्ही सर्च करतोय. लूक आऊट नोटीस काढली आहे," अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी दिली.

किरण गोसावींनी कॅमेरावर बोलण्यास त्यांनी नकार दिला पण, फोनवरून बीबीसी मराठीला आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू केलीये.

प्रश्न- प्रभाकर साईल यांनी तुमच्यावर आरोप केले आहेत?

किरण गोसावी- हा प्रोपगंडा करण्याचा प्रयत्न आहे. काही गोष्टी माझ्याकडे आहेत. मला हा प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही NCB ला हा प्रश्न विचारा. ज्यांच्यासोबत तो होता किंवा जे नेते यात सहभागी आहेत त्यांचे कॉल डिटेल्स तपासा, त्यांचे सीडीआर तपासून पहा.

प्रश्न- त्यांनी आरोप केले आहेत की तुम्ही पूजा ददलानीला भेटला होतात.

किरण गोसावी- दोन दिवसांपूर्वी माझ्या होणाऱ्या पत्नीला त्याचा फोन आला होता. पैसे देणार का नाही हे विचारत होता. मी जेव्हा सरेंडर होणार होतो तेव्हा हा म्हणाला माझी बहीण पोलीस अधिकारी आहे. मी सर्व सेटिंग करतो. मी म्हणालो धमकीचे सतत फोन येत असल्याने मी महाराष्ट्रबाहेर आहे. मी म्हणालो एखादा वकील कर, मला आत्मसमर्पण करायचं आहे.

समीर वानखेडे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, समीर वानखेडे

प्रश्न- तुम्ही सरेंडर होण्यासाठी तयार आहात?

किरण गोसावी- मी सरेंडर होण्यासाठी तयार आहे. मी सहा ऑक्टोबरला आत्मसमर्पण करणार होतो. पण त्यादिवशी मला फोन आला की सरेंडर झाल्यानंतरही काय हालत होणार ते आम्ही पाहू. मग मी विश्वास कोणावर ठेऊ?

प्रश्न-प्रभाकर साईल यांनी आरोप केलाय की आठ कोटी रूपये समीर वानखेडे यांना द्यायचे होते.

किरण गोसावी-एकदम खोटं आहे. याबाबत कोणत्याही ठिकाणचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत. मी फासावर चढायला तयार आहे. पण यांच्याविरोधात जर पुरावे निघाले तर त्यांनी त्यासाठी तयार रहावं.

प्रश्न- त्यांनी म्हटलंय की तुम्ही फोनवर चर्चा करत होतात, लोअर परळमध्ये भेटलात. 25 कोटी रूपयांचं डील ठेरलं होतं.

किरण गोसावी- जर मी म्हणालो असतो डील 500 कोटी रूपयांचं आहे. तुम्ही ग्राह्य धराल का? तो या प्रकरणी पंच होता कारण तो माझ्यासोबत होता.

आर्यन खान

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे त्याला पंच किंवा साक्षीदार म्हणून घेण्यात आलं. मी धमकीच्या फोन कॉलमुळे महाराष्ट्राबाहेर आहे. त्यामुळे विरोधकांनी या सर्व गोष्टी उचलून धरल्या. त्याला काय आमिष दाखवलं मला माहित नाही. ही गोष्ट 24 तारखेला कशी समोर आली.

प्रश्न- तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत. तरी तुम्ही एनसीबीच्या कारवाईला गेला होतात. तुमच्यावरही प्रश्न उपस्थित झाले.

किरण गोसावी- माझ्यावर दाखल झालेली केस संपली आहे. हे गुन्हे टेक्निकल स्वरूपाचे आहेत. हे गुन्हे माझ्या कामाशी संबंधित आहेत. पुण्याच्या प्रकरणातील व्यक्तीला मी मलेशियाला पाठवलं होतं. काही वैद्यकीय कारणांमुळे ते परत आले.

त्यांनी वैद्यकीय गोष्टी माझ्यापासून लपवल्या. मलेशियात केस होणार होती. मी वाचवलं. ती केस आता का पुन्हा ओपन करण्यात आली. सहा ऑक्टोबरनंतर माझ्यावर लूक-आऊट नोटीस का काढण्यात आली?

प्रश्न- तुम्ही सरेंडर का केलं नाही?

किरण गोसावी- मी त्यावेळी सरेंडर करणार होतो. मी पुण्यापर्यंत पोहोचलो. पण त्यावेळी मला फोन आले. तुम्ही आत गेल्यानंतरही काय करतो ते पहा अशी धमकी आली.

येणारे सर्व व्हॉट्सअप कॉल होते. माझ्याकडे नंबर आहेत. मी कोणावर संशय घेऊ. मी सर्व नंबर सादर करणार आहे. आज 22 दिवस झाले मी लपून रहातोय.

प्रश्न- तुम्हाला पंच म्हणून बोलावण्यात आलं होतं की तुम्हीच गेला होतात?

किरण गोसावी- आम्ही त्याठिकाणी माहिती देण्यासाठी गेलो होतो. संध्याकाळनंतर आम्हाला पंच म्हणून बोलावण्यात आलं. क्रूज टर्मिनसवर काही पेपर्स होते. ते मी वाचले. त्यात मुनमुन धामिचा, आर्यन आणि त्याच्या मित्राचं नाव होतं. अजूनही दोन-तीन लोकांची नावं होती. एनसीबी कार्यालयात आल्यानंतर तिथे 10 लोकांची नावं होती. त्यावर माझी सही आणि अंगठ्याचे ठसे घेण्यात आले.

प्रश्न- प्रभाकर साईलचा आरोप आहे की तुम्ही फोटो पाठवलेत?

किरण गोसावी- आम्हाला खबरीकडून टीप मिळत होती. प्रभाकर गेटवर असल्यामुळे मी त्याला फोटा पाठवत होतो. यापैकी कोणी दिसलं तर सांग असं त्याला सांगितलं होतं. हे काम सुरक्षा यंत्रणांचं आहे. पण आम्ही फक्त लोकेट करत होतो. लोकांना स्पॉट करत होते.

प्रश्न- आर्यनसोबत सेल्फी काढलात. हाताला पकडून घेऊन गेलात. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला.

किरण गोसावी- सेल्फी काढण्यावेळी आर्यनला अटक करण्यात आली नव्हती. सेल्फी काढणं चुकीचं होतं. त्याबद्दल मी माफी मागतो. आर्यन माझ्या गाडीतून उतरला होता. त्यावेळी त्याचा पाय सटकला. तो म्हणाला माझा हात पकडून मला वाचवून (Hide) चला.

तोपर्यंत त्याच्यावर आरोप आहेत का नाही हे मला आणि त्याला माहित नव्हतं. त्यामुळे मीडियापासून त्याचा चेहरा बचावण्यासाठी हाताला पकडून घेऊन गेलो.

प्रश्न- तुम्ही त्यांना फोनवरून कोणाशी बोलणं करून दिलंत?

किरण गोसावी- खरंतर व्हिडीओ घेण्याची परवानगी नाही. मला आर्यनने सांगितलं मला एक फोन लाऊन द्या मला घरी सांगू द्यात. त्याने मला रडून विनंती केली. त्याचं जेवण आलं होतं. जेवणाआधी तो म्हणाला एक फोन लावून द्या. त्यासाठी घरच्यांना किंवा कोणालातरी त्याला फोन लावायचा होता. त्यासाठी मी फोन लावून दिला.

प्रश्न- प्रभाकरचा आरोप आहे की कोऱ्या कागदावर सही करायला भाग पाडलं. समीर वानखेडे यांनी सांगितलं होतं.

किरण गोसावी- असं कोणी कोऱ्या कागदावर सही करणार नाही. पंचनाम्याचे कागद मी आणि मनिष भानुशाली यांनी वाचून सही केले.

प्रश्न- टीप तुम्हाला मिळाली होती का फक्त तुम्ही माहिती शेअर केलीत.

किरण गोसावी- मला मनिष भानुशालीने सांगितलं. मग आम्ही एनसीबीला जाऊन सांगितलं. NCB कडे काही लोकांची माहिती होती. हे प्रकरण खोटे असल्याचे आरोप निराधार आहेत.

किरण गोसावी

फोटो स्रोत, Sachin sawant/twitter

फोटो कॅप्शन, किरण गोसावी

प्रश्न- आर्यनकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले नव्हते असं एनसीबीचं म्हणणं आहे.

किरण गोसावी- कोर्टात काय झालं याबद्दल मी काहीच बोलू शकणार नाही.

प्रश्न- प्रभाकर साईलला किती काळापासून ओळखता.

किरण गोसावी- गेल्या चार महिन्यांपासून प्रभाकरला ओळखतो. तो माझ्याकडे काम मागण्यासाठी आला होता. बहुदा गेल्या 10-12 दिवसात मी त्याला पैसे दिले नाहीत म्हणून त्याने हे आरोप केलेत.

प्रश्न- तुम्ही पोलीस नाही मग तुमच्या गाडीवर पोलीसची पाटी कुठून आली?

किरण गोसावी- ती गाडी माझी नव्हती. पोलीस पाटी माझी नाही. त्यावेळी खूप धावपळ सुरू होती. माझ्याकडे गन नाही. ते लायटर आहे. ते खोटे फोटो आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)