आर्यन खान प्रकरणातील प्रभाकर साईल यांचा मृत्यू: स्वतंत्र साक्षीदार नेमके कोण असतात? त्यांचं काम काय असतं?

आर्यन खान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानं आता नाट्यमय वळणं घेण्यास सुरुवात केलीय. या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांनी NCB चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप केले आहेत.

प्रभाकर साईल असं या साक्षीदाराचं नाव असून त्यांचं नाव NCB कडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात 9 साक्षीदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावरच होतं.

प्रभाकर यांनी या प्रकरणी NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर 8 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. साक्षीदार प्रभाकर साईल यांचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. या व्हीडिओमध्ये प्रभाकर साईल यांनी फक्त समीर वानखेडेच नव्हे, तर किरण गोसावी आणि सॅम नामक एका व्यक्तीचा उल्लेख केल्याचं दिसून येतं.

साक्षीदार प्रभाकर साईल यांनी त्यांच्या व्हीडिओतून अनेक गंभीर आरोप केले आहेत.

प्रभाकर साईल यांच्या या व्हीडिओनंतर पोलिस नेमकं कोणाला साक्षीदार करतात? त्यांची भूमिका काय असते? साक्षीदारांची काही पात्रता असते का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

त्यामुळे, स्वतंत्र साक्षीदारांना आरोपींना पकडण्याचा अधिकार आहे? हा सवाल उपस्थित झालाय. याचं उत्तर आम्ही पोलीस अधिकारी आणि कायदे तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

किरण गोसावी यांच्यावरुनही झाला होता वाद...

आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) कार्यालयात घेऊन येणारे मनिष भानुशाली आणि किरण गोसावी स्वतंत्र साक्षीदार असल्याचं NCB ने मान्य केलं होतं.

मनिष भानुशाली भाजपचा कार्यकर्ता आहे. तर, किरण गोसावी खासगी डिटेक्टिव्ह म्हणून काम करतो.

मनिष भानुशाली

फोटो स्रोत, ANI

NCB अधिकारी नसूनही खासगी व्यक्ती आरोपींना कसे पकडू शकतात? हा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपस्थित केलाय.

त्यावेळेही स्वतंत्र साक्षीदारांना आरोपींना पकडण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला होता. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी घटना काय घडली हे समजून घेऊया.

नवाब मलिक

फोटो स्रोत, facebook

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने 2 ऑक्टोबरला मुंबईत 'कॉर्डिलिया' क्रूजवर छापा मारला. NCB ने आर्यन खानसोबत 8 जणांना अटक केली. त्यानंतर त्यांना नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोच्या कार्यालयात आणण्यात आलं.

किरण गोसावी आणि मनिष भानुशाली आर्यन खान आणि अरबाज मर्चंटच्या हाताला पकडून कार्यालयात नेतानाची दृष्य मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर किरण गोसावीचा आर्यन खानसोबतचा फोटा व्हायरल झाला.

एनसीबीने हा आमचा अधिकारी नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर चर्चा सुरू झाली की हा नक्की आहे तरी कोण?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मनिष भानुशाली भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला. त्यावर प्रतिक्रिया देताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मनिष भानुशाली आणि किरण गोसावी स्वतंत्र साक्षीदार असल्याचं स्पष्ट केलं.

तर, "एनसीबीचे तथाकथित स्वतंत्र साक्षीदार किरण गोसावी यांचा मोठा गुन्हेगारी ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्याच्यावर 2007 पासून 2018 पर्यंत अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत," असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पण, त्यांना आरोपींना पकडून नेण्याचा अधिकार आहे का? या प्रश्नावर एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी उत्तर देणं टाळलं.

स्वतंत्र साक्षीदार म्हणजे काय?

साक्षीदार म्हणजे एखादी घटना किंवा गुन्हा प्रत्यक्षात घडताना किंवा होताना पहाणारा व्यक्ती. या साक्षीदाराची साक्ष खटला सुरू झाल्यानंतर आरोपीविरोधात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.

गुन्हा घडल्यानंतर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करतात. घटना स्थळावरून जप्त करण्यात आलेल्या गोष्टी यात नमुद करण्यात आलेल्या असतात. हा पंचनामा कोर्टात सादर करावा लागतो. यावर पंच म्हणून सही करणाऱ्या व्यक्तीला पंच म्हणतात.

मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सांगतात, "घटनास्थळाचा पंचनामा करताना उपस्थित पंच, घटना प्रत्यक्षात पहाणारा किंवा घटनेबद्दल प्रत्यक्ष ऐकणारा व्यक्ती स्वतंत्र साक्षीदार असू शकतो."

आर्यन खान

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे पोलिसांचा पंचदेखील स्वतंत्र साक्षीदार म्हणून धरला जाऊ शकतो.पंच हा सरकारी किंवा आरोपीच्या बाजूचा नसून तो स्वतंत्र असावा लागतो. घटनास्थळी उपस्थित व्यक्तीच स्वतंत्र साक्षीदार बनू शकते.

पोलीस अधिकारी पुढे म्हणतात, "स्वतंत्र साक्षीदार असो किंवा पंच, कोर्टात खटला सुरू झाल्यानंतर त्यांची साक्ष नोंदवण्यात येते."

निवृत्त माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे बीबीसीशी बोलताना म्हणाले, "पंचनाम्यावर सही करण्यासाठी, आरोपीची ओळख परेड करताना पंचांची भूमिका महत्त्वाची ठरते."

स्वतंत्र साक्षीदार कोण आहे? गुन्ह्याच्या प्रकरणात त्याचा काही हेतू किंवा इंट्रेस्ट नाही ना? याची खात्री करण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात.

पोलीस अधिकारी पुढे म्हणतात, गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात सरकारी पंच घ्यावेत असा सरकारचा आदेश आहे. जेणेकरून कोर्टात खटल्यादरम्यान पंच फुटणार नाहीत.

त्यामुळे गंभीर प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून घेतलं जातं.

स्वतंत्र साक्षीदारांना आरोपींना पकडण्याचा अधिकार आहे?

स्वतंत्र साक्षीदार आरोपींना पकडून पोलीस ठाण्यात आणू शकतात? हे आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वकीलांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

निवृत्त माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे बीबीसीशी बोलताना सांगतात, "स्वतंत्र साक्षीदार असो किंवा पंच. त्यांना आरोपींना पकडण्याचे अधिकार नाहीत. आरोपींना पकडणं हे फक्त पोलिसांचं किंवा चौकशी यंत्रणांचं काम आहे."

काही वेळा आरोपीकडून पोलीस आणि पंचांवर कारवाईदरम्यान हल्लादेखील करण्यात येतो.

ते पुढे म्हणतात, "आरोपीला पकडताना त्याने पंचांवर हल्ला केला किंवा आरोपीकडून पंचाच्या जीवीताला धोका आहे. अशावेळी स्वतंत्र साक्षीदार आरोपीला पकडू शकतो."

आर्यन खान प्रकरणी सुरेश खोपडे म्हणाले, "टीव्हीवर जे दिसलं असं स्वतंत्र साक्षीदार करू शकत नाहीत."

तर, सामान्य व्यक्तीला आरोपीला अटक करण्याचा अधिकार असल्याचं हायकोर्टाचे वकील गणेश सोवानी म्हणाले.

ते सांगतात, "CRPC म्हणजे क्रिमिनिल प्रोसिजर कोडच्या कलम 43 नुसार कोणताही सामान्य व्यक्ती त्याला माहित झाल्यास आरोपीला अटक करू शकतो आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो."

पण, स्वतंत्र साक्षीदार आरोपीला ताब्यात घेऊ शकतो का? वकील गणेश सोवानी पुढे म्हणतात, "पोलिसांनी एखाद्या स्वतंत्र साक्षीदाराची आरोपीला अटक करण्यासाठी मदत मागितली. तर, साक्षीदार आरोपीला अटक करण्यासाठी मदत करू शकतो."

प्रभाकर साईल

फोटो स्रोत, Video Screen Shot

फोटो कॅप्शन, प्रभाकर साईल

पोलीस अधिकारी सांगतात, पोलिसांची संख्या कमी असल्यास किंवा आरोपी हल्ला करण्याची शक्यता असल्यास, पोलीस स्वतंत्र साक्षीदाराची मदत घेतात.

पण, काही अधिकाऱ्यांचं मत आहे की, स्वतंत्र साक्षीदाराने आरोपीला हात लावला तर तो स्वतंत्र रहात नाही. त्यामुळे साक्षीदारांनी आरोपाला ताब्यात घेणं योग्य नाही.

राजकीय पक्षाचा कार्यकर्ता साक्षीदार बनू शकतो?

मनिष भानुशाली भाजपचे कार्यकर्ते आहेत हे त्यांनी स्वत:च मान्य केलंय. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपचे कार्यकर्ते रेडमध्ये कसे उपस्थित राहीले असा सवाल उपस्थित केला होता.

साक्षीदार कोण असू शकतो? पक्षाचा कार्यकर्ता साक्षीदार बनू शकतो?

यावर सुरेश खोपडे म्हणतात, "स्वतंत्र साक्षीदार कोणीही व्यक्ती बनू शकतो. तो पक्षाचा कार्यकर्ता आहे का नाही याचा गुन्ह्याशी काही संबंध नाही."

नार्कोटिक्सच्या प्रकरणात काय केलं जातं?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या रेडमध्ये काय केलं जातं. हे जाणून घेण्यासाठी आम्ही नार्कोटीक्स विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला.

नाव न घेण्याच्या अटीवर अधिकारी सांगतात, "नार्कोटिक्सची केस करण्यापूर्वी पोलिसींची टीम दोन साक्षीदारांसमोर पंचनामा करते. अधिकारी, कर्मचारी आणि पंचांची झडती घेतली जाते." जेणेकरून पुढे जाऊन ड्रग्ज प्लांट केल्याचा आरोप पोलिसांवर होणार नाही.

नार्कोटीक्सच्या केसमध्ये मदत करणाऱ्या स्वंतत्र साक्षीदाराचं नाव पंचनाम्यात नमुद करावं लागतं असं वरिष्ठ अधिकारी सांगतात. पण, काही प्रकरणात साक्षीदाराचं नाव गुप्त ठेवलं जातं.

गणेश सोवानी पुढे म्हणतात, "एनसीबीच्या प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार म्हणून घेताना त्याचं नाव कार्यालयात करण्यात येणाऱ्या पंचनाम्यात नमूद असावं लागतं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)