नवाब मलिकांचा जावई समीर खान प्रकरणी जप्त करण्यात आलेला गांजा नव्हता?

फोटो स्रोत, ANI
- Author, मयांक भागवत,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानला सेशन्स कोर्टाने ड्रग्ज तस्करीच्या आरोपांप्रकरणी जामीन दिलाय.
कोर्टाने जामीन मंजूर करताना, समीर खानवर ड्रग्जची तस्करी आणि ड्रग्जसाठी पैसा पुरवण्याचे आरोप टिकत नसल्याचं नमूद केलंय.
कोर्टाच्या आदेशानंतर नवाब मलिक यांनी, "एनसीबी लोकांना खोट्या गुन्ह्यात गुंतवून नाहक बदनाम करण्याचं काम करते," असा आरोप केलाय.
नवाब मलिक यांनी दावा केला की "200 किलो गांजा मिळाला. पण हा हर्बल तंबाखू असल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं"
नवाब मलिक यांच्या आरोपांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून अजून काही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
समीर खानला NCB ने जानेवारी महिन्यात ड्रग्जप्रकरणी अटक केली होती. साडेआठ महिन्यांनंतर त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला.
समीर खान कथित ड्रग्ज प्रकरण काय आहे?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला 9 जानेवारी 2021 ला काही संशयास्पद हालचालींचा सुगावा लागला होता.
समीर वानखेडेंच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकामध्ये "मुंबईतील वांद्रे भागातून गांजा जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता."
यात आरोपी करण सजलानीच्या घरातून गांजाचा इंपोर्टेड प्रकार जप्त केल्याची माहिती दिली होती. चार आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली. यानंतर सर्वात पहिल्यांदा नवाब मलिक यांचा जावई समीर खानचं नाव पुढे आलं.

फोटो स्रोत, ANI
समीर खानला 12 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहाण्यास समन्स बजावण्यात आले.
एनसीबीने 13 जानेवारीला चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहाण्याचे आदेश दिले होते.
एनसीबीने 13 जानेवारीला पुन्हा एक पत्रक प्रसिद्ध केलं. यात, "चौकशीमध्ये ड्रग्ज प्रकरणी समीर खानची भूमिका पुढे आल्यामुळे त्याला अटक केल्याची माहिती एनसीबीने मीडियाला दिली होती."
समीर खानला अटक केल्यानंतर 14 जानेवारीला एनसीबीने त्याच्या घरी शोध घेतला होता. समीर खानला कोर्टासमोर हजर करण्यात आलं.
एनसीबीने कोर्टात दावा केला होता की, "समीर खान आणि सजलानी हर्बल प्रॉडक्टच्या नावाखाली गांजा विकण्याचा विचार करत होते." समीर खान या ड्रग्ज प्रकरणी पैसे पुरवणारा आणि भागीदार आहे असा आरोप एनसीबीने केला होता.

फोटो स्रोत, ANI
एनसीबीने NDPS कायद्याच्या कलम 27 (a) अंतर्गत समीर खानला ड्रग्जची तस्करी आणि पैसे पुरवल्याच्या आरोपाप्रकरणी अटक केली होती.
"ड्रग्ज तस्करी आणि पैसा पुरवण्याचे आरोप टिकत नाहीत"
जानेवारी महिन्यात अटक केल्यानंतर समीर खानला सप्टेंबर महिन्यात सेशन्स कोर्टाकडून जामीन मिळाला.
कोर्टाने आदेशात म्हटलं,
- आरोपीने तो तंबाखूच्या पदार्थांचा व्यापार करतो असं मान्य केलंय.
- त्यामुळे ड्रग्ज तस्करी आणि पैसे पुरवण्याचे आरोप टिकत नाहीत.
- जप्त करण्यात आलेल्या 11 नमुन्यात गांजा नव्हता असं केमिकल अॅनालिसिस रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय. त्यामुळे आरोपीविरोधात कलम 29 टिकू शकत नाही.
- दोन्ही आरोपींचं संगनमत असल्याचे पुरावे सरकारी वकील सादर करू शकले नाहीत.
- सरकारी वकीलांना केमिकल अॅनालेसिस रिपोर्ट ग्राह्य धरल्यामुळे NDPS कायद्याचं कलम 27 (a) टिकणार नाही.
कोर्टाने एनसीबी अधिकाऱ्यांच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केलेत. तक्रारीत 194 किलो जप्त केल्याचं लिहिण्यात आलंय. पण, रामपूरमध्ये करण्यात आलेला पंचनामा जो चार्जशीटचा भाग नाहीये. त्यात 189 किलो लिहिण्यात आलंय. याचं उत्तर तपास यंत्रणेने दिलेलं नाही.
"एनसीबी लोकांना खोट्या आरोपात गुंतवते"
आर्यन खानच्या अटकेनंतर नवाब मलिकांनी एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडेंवर आरोपांची तोफ डागली. एनसीबीच्या सततच्या कारवाईवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
गुरूवारी पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांनी समीर खान प्रकरणावरून एनसीबीवर पुन्हा टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, "एनसीबी लोकांना खोट्या गुन्ह्यात गुंतवते आणि बातम्या पेरून लोकांना बदनाम करण्याचं काम करते."

फोटो स्रोत, facebook
केंद्र विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू असतानाच. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध एनसीबी असा सामना सुरू झालाय.
मलिक पुढे सांगतात, "एनसीबीने 200 किलो गांजा जप्त केल्याचा दावा केला. केमिकल अॅनालिसिस रिपोर्टमध्ये मात्र हा गांजा नसल्याचं स्पष्ट झालं."
जप्त करण्यात आलेला हर्बल टोबॅको होता. "एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळू नये?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

फोटो स्रोत, ANI
जावई समीर खानच्या जामीनावर सुनावणी दरम्यानही एनसीबीने मुद्दाम टाळाटाळ केल्याचं नवाब यांनी म्हटलंय.
एनसीबीची प्रतिक्रिया काय?
नवाब मलिक यांच्या आरोपांवर एनसीबीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

फोटो स्रोत, Ani
नवाब मलिकांनी एनसीबीवर भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना सोडल्याचा आरोप 9 ऑक्टोबरला केला होता. त्याला उत्तर देताना एनसीबीने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांनी समीर वानखेडे यांना समीर खान यांच्या जामीनाबद्दल प्रश्न विचारला.
समीर वानखेडे म्हणाले होते, "आम्ही या प्रकरणी हायकोर्टात अपील करणार आहोत."
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर जास्त बोलण्यास नकार दिला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








