IndiaVs Pakistan सामन्यात पाकिस्तानचं जिंकणं हा इस्लामचा विजय कसा होऊ शकतो?

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी हिंदी

भारतीय उपखंडात क्रिकेटलाच धर्म मानलं जातं. त्यातून भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना असेल तर एक त्यावेळेस क्रिकेटची एकप्रकारची धुंदीच आलेली असते.

पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद तसंच असद उमर यांची वक्तव्यं आणि भारतात मोहम्मद शमीच्याविरुद्ध ऑनलाइन टीप्पण्या पाहिल्या की ही धुंदी समजते.

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी भारताच्या पराभवाला इस्लामचा विजय असं म्हटलं होतं. त्यानी हा व्हीडिओ ट्वीट केला होता.

"जगभरातील मुसलमानांसह हिंदुस्थानी मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानबरोबर आहेत. इस्लामच्या विजयाच्या शुभेच्छा. पाकिस्तान झिंदाबाद", असं ते म्हणाले होते.

पाकिस्तान हा एक इस्लामिक देश आहे, परंतु तिथले गृहमंत्री भारतावर विजय मिळवल्यावर आपल्या देशाला जगभरातल्या मुसलमानांचा प्रतिनिधी असल्यासारखं दाखवत आहेत.

भारत घटनात्मक दृष्ट्या एक सेक्युलर देश आहे. पाकिस्तानपाठोपाठ मुस्लिमांची संख्या जास्त असलेला देश भारत आहे. शेख रशीद यांनी आपण भारतीय मुसलमानांचे प्रवक्ते असल्यासारखा व्हीडिओतून संदेश दिला आहे.

पाकिस्तान संघातील हिंदू खेळाडू दानिश कनेरियाने आपल्याशी धार्मिक भेदभाव झाल्याचा अनेकदा आरोप केला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये असे आरोप कधीच झालेले नाहीत. 2005 साली पाकिस्तानी क्रिकेटर युसुफ योहानाने ख्रिश्चन धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्म स्वीकारला होता.

क्रिकेट आणि धर्म

अशा प्रकारची वक्तव्यं पाकिस्तानातून नेहमीच होत आली आहेत. 2007 साली टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघाला भारताने पराभूत केले होते.

तेव्हा शोएब मलिकने मुस्लीम जगताची माफी मागितली होती. तेव्हा शोएब मलिकचं भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न झालेलं नव्हतं. त्यांचं लग्न 2010मध्ये झालं.

2007 साली भारताकडून पराभव झाल्यावर शोएब मलिक म्हणाला होता, "मी आपला देश आणि जगभरातल्या मुसलमानांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद देतो. तुमचे खूप आभार आणि विश्वचषक जिंकू न शकल्याबद्दल माफी मागतो. आम्ही 100 टक्के प्रयत्न केले होते."

त्याच सामन्यात इरफान पठाण सामनावीर होता हे मात्र शोएब विसरला होता. शोएब मलिकच्या या विधानावर भारतातील मुस्लीम नेते आणि खेळाडूंनी टीका केली होती.

दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष कमाल फारुखी म्हणाले होते, "अशाप्रकारे बोलण्याची त्यांची हिंमत झालीच कशी? पाकिस्तानात कोणी बिगर मुस्लीम समर्थक आहेत की नाही? त्यांचं विधान म्हणजे पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चनांचा अपमानच आहे."

भारताचा हॉकी खेळाडू अस्लम शेर खान म्हणाला होता, "बिचारा भावनांमध्ये वाहावत गेला. त्याला इंग्रजी नीट येत नाहीच त्यातून पराभवानंतर बोलत होता."

पाकिस्तानचं क्रिकेट

पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंची ड्रेसिंग रुमची संस्कृती आणि तिथली राजकीय संस्कृती यांचा सर्वांवर प्रभाव दिसून येतो.

2006 साली डॉ. नसीम अश्रफ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले. तेव्हा खेळाडूंनी धार्मिक गोष्टींचं सार्वजनिकरित्या प्रदर्शन करू नये असं म्हटलं होतं. मात्र त्याचा फारसा परिणाम खेळाडूंवर झाला नाही.

भारताविरुद्ध सामना सुरू असताना ब्रेकमध्ये मोहम्मद रिझवान नमाज पढताना दिसला होता.

त्याच्या नमाज पठणाचा व्हीडिओ शोएब अख्तरने ट्वीट केला आणि लिहिलं होतं, अल्ला आपल्यासमोर वाकणाऱ्याची मान कोणासमोरही झुकू देत नाही, सुभानअल्लाह

डॉ. नसीम अश्रफ रॉयटर्सशी बोलताना म्हणाले होते, "धार्मिक श्रद्धा खेळाडूंना प्रेरणा देतात, त्यांची एकजूट टिकवतात यात शंका नाही, मात्र क्रिकेट आणि धर्म यांच्या संतुलन असलं पाहिजे.

या संदर्भात मी इंझमाम उल हक (तेव्हाचा कप्तान) याच्याशी बोललो आहे. वैयक्तिक श्रद्धा असण्यात काहीच हरकत नाही मात्र इस्लाम आपले विचार दुसऱ्यांवर लादण्याची परवानगी देत नाही, असं इंझमामला सांगितलं आहे."

शोएब मलिकच्या 2007मधील विधानानंतर कमाल फारुखी म्हणाले होते, अशाप्रकारची विधानं पाकिस्तानी खेळाडू करत राहातात. बांगलादेशाविरोधात पराभव झाल्यावर वसीम अक्रमने बंधुराष्ट्राविरोधात पराभव झाला अशी टिप्पणी केली होती. फारुखी याला क्रीडा भावनेच्याविरोधातील वक्तव्य म्हणतात.

"मोहम्मद अझरुद्दिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानवर विश्वचषकात तीन वेळा विजय मिळवला आहे. अझरुद्दिनने क्रिकेट आणि धर्म यांची सरमिसळ होऊ दिली नव्हती. पाकिस्तानचे खेळाडू आणि नेते अशाप्रकारची विधानं करतात तेव्हा त्यांच्यावर असलेल्या दबावाचंही दर्शन घडत असतं."

खेळातली स्पर्धेची भावना धार्मिक नसते

माजी खेळाडू सबा करिम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "पाकिस्तानमधून येणारी अशाप्रकारची वक्तव्यं अत्यंत फालतू आहेत. ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटमधील स्पर्धेची भावना खेळाच्या स्तरावर आहे, धार्मिक स्तरावर नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या विधानांमधून वेडेपणाच दिसतो. त्यांनी भारतीय मुस्लिमांचे प्रवक्ते होऊ नये. भारतीय मुसलमान टीम इंडियाचे महत्त्वाचे भाग आहेत. आपल्या संघाच्या जय-पराजयावर त्यांचा आनंद किंवा दुःख ठरतं."

सबा म्हणाले, "पाकिस्तानमधून अशी विधानं आली की भारतातील एकारलेपण वाढतं. त्या विधानांना इथून प्रतिक्रिया मिळत राहाते. मोहम्मद शमीच्या बाबतीत आपण तेच झाल्याचं पाहातो."

अर्थात सबा करिम मैदानामध्ये नमाजपठण करण्याविरोधात नाहीत. धार्मिक गोष्टींच्या पालनामुळे कोणाचं नुकसान होत नाही, असं ते म्हणतात.

शेख रशीद यांच्याशिवाय पाकिस्तानातील आणखी एक मंत्री असद उमर यांनीही असंच ट्वीट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं, "आम्ही आधी त्यांना पराभूत करतो. मग ते धरणीवर कोसळतात तेव्हा त्यांना आम्ही चहा देतो." असद उमर यांनी या ट्वीटसाठी भारताचे विग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा संदर्भ वापरला होता.

रशीद आणि असद या दोघांच्या विधानांवर पाकिस्तानातही टीका होत आहे.

पाकिस्तानी पत्रकार शिराज रशीद यांनी ट्वीट केलंय, जिंकल्यानंतर शेख रशीद यांनी जगभरातल्या मुस्लिमांना धन्यवाद देणं अत्यंत चूक आहे. कृपया, क्रिकेटपासून राजकारण आणि धर्माला दूर ठेवा.

पाकिस्तानातील विधीज्ञ रीमा उमर म्हणतात, "गृहमंत्र्यांचं विधान धोकादायक आणि विभाजनवादी आहे. भारतीय टीममधील मुस्लीम खेळाडूवर धर्मामुळे प्रश्नचिन्ह उभे होत आहेत तर काही मंत्री आपल्या मर्यादेचं उल्लंघन करत आहेत."

रीमा उमर यांनी विराट कोहली आणि मोहम्मद रिझवान, बाबर आझम यांच्या गळाभेटीचा फोटो ट्वीट करुन म्हटलं, नशिब खेळाडूंनी खेळाची भावना आणि मर्यादा यांचं पालन केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)