You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
T20 World Cup: भारत - पाक क्रिकेट सामन्याचा उन्माद कमी झाला, मात्र रोमांच कायम
- Author, मनोज चतुर्वेदी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
टी-20 विश्वचषकात भारताच्या प्रवासाची सुरुवात 24 ऑक्टोबरला पाकिस्तान विरोधातील सामन्यानं होणार आहे.
तसं पाहिलं तर हा केवळ एक सामना आहे. मात्र दोन्ही संघांसाठी या सामन्याचं महत्त्व खूप जास्त असतं. या दोन्ही संघातील विजयी संघाचा प्रवास अत्यंत यशस्वी ठरण्याची आणि पराभूत होणाऱ्या संघाचा आत्मविश्वास डगमगण्याची शक्यता या सामन्यानंतर मोठ्या प्रमाणावर असते.
पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये उत्साह आणि रोमांच शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळं क्रिकेटप्रेमींमध्ये हा सामना सर्वाधिक लोकप्रिय आहे.
या लोकप्रियतेमुळंचं दोन्ही देशांदरम्यान, कायम अत्यंत तणावाच्या वातावरणात सामना खेळला जातो. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यावरून आता पूर्वीसारखा तणाव पाहायला मिळत नाही, हेही खरं आहे.
गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघाचे खेळाडू आणि कर्णधार हे हा सामना त्यांच्यासाठी इतर सामन्यांसारखाच असल्याचं, म्हणत असल्याचं पाहायला मिळतं. संघातील सदस्यांना तणावापासून दूर ठेवण्यासाठी असं म्हटलं जात असेल, याचीही मोठी शक्यता आहे.
प्रत्यक्षात कोणत्याही संघाला, कोणत्याही परिस्थितीत हा सामना गमावयाचा नसतो, आणि याच भावनेमुळं रोमांच वाढतो. विजय किंवा पराजय यावर आता क्रिकेट प्रेमींची पूर्वीसारखी तीव्र प्रतिक्रिया उमटत नाही, त्यामुळं क्रिकेट खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रीत करण्याची संधी मिळते, ही बाबही खरी आहे.
तणाव पूर्वीसारखाच
''पाकिस्तानबरोबरचे सामने पूर्वीही तणावात खेळले जायचे आणि आजही तणावातच खेळले जातात. या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाहीच, हेच सत्य आहे. मात्र, क्रिकेटपटू मैदानात तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, हेही खरं आहे," असं भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहिलेले मदनलाल यांनी म्हटलं आहे.
मात्र, प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूला पाकिस्तानच्या विरोधात चांगली कामगिरी करण्याची इच्छा ही असतेच. आपण दोन्ही संघांच्या सामन्यांचा इतिहास पाहिला तर, हे सामने कायम हाय व्होल्टेज असतात. त्यामुळं दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांमध्येही तणाव वाढणं, हे स्वाभाविक आहे, असंही ते म्हणाले.
भारत आणि पाकिस्तानचे संबंध कधीही फार चांगले नव्हते आणि त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या खेळांवरही नेहमीच पाहायला मिळतो. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचं मत भारतानं कायम व्यक्त केलं आहे. त्यामुळं दोन्ही देशांमध्ये शत्रूत्वाची भावनाही असते. शिवाय पाकिस्तान स्वतंत्र देश बनल्यापासूनच कधीही भारताशी त्यांचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत.
या खराब संबंधांमुळंचं सामन्याला युद्धाचं रुप येतं. या सर्वाची पायभरणी 1952-53 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान दरम्यानच्या कसोटी मालिकेनं झाली आहे. भारतानं दिल्लीत झालेला पहिला सामना जिंकल्यानंतर लखनऊमध्ये दुसरा सामना गमावला तेव्हा, दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
त्यानंतरच्या दोन मालिकांमध्ये क्रिकेट खेळाडूंच्या मनात याची भीती असल्याचं पाहायला मिळालं. जिंकलं नाही तरी चालेल, पण हारायचं नाही, यावरचं कायम दोन्ही संघांचा जोर पाहायला मिळाला आहे. पराभवानंतर चाहत्यांच्या तीव्र आणि हिंसक प्रतिक्रिया या भीतीमागचं कारण होत्या. कारण या पराभवासाठी जबाबदार खेळाडूंच्या घरांबाहेर जाळपोळ-दगडफेक ही सर्वसामान्य बाब होती.
क्रिकेटसाठी वेड हेच उन्मादाचं कारण
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमधील जनता क्रिकेटसाठी अक्षरशः वेडी आहे. त्यामुळं त्यांना एकमेकांकडून पराभूत होणं कधीही मान्य झालं नाही. 1996 च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारत - पाकिस्तान दरम्यान बेंगळुरूमध्ये झाला होता. त्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.
या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रम अनफिट असल्यामुळं खेळला नव्हता. त्यामुळं पाकिस्तानच्या पराभवानंतर अक्रम न खेळल्यानंच पाकिस्तानचा पराभव झाला, असाच समज तयार झाला. त्यामुळं लाहोरमधील त्यांच्या घरी प्रचंड दगडफेक झाली होती. वसीम अक्रम प्रमाणेच अनेक क्रिकेटपटुंनाही अशा प्रकारे चाहत्यांच्या रागाचा सामना करावा लागला.
दोन्ही देशांचे क्रिकेटचे चाहते पराभवावर अशाप्रकारे प्रतिक्रिया देत असतात. तसंच विजयाचा जल्लोषही त्याच प्रमाणात साजरा केला जात असतो. 7 फेब्रुवारी 1999 ला भारत फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तान विरोधात दुसरी कसोटी खेळत होता.
त्यापूर्वी चेन्नईत भारताचा पराभव झाला होता. या कसोटीत अनिल कुंबळेनं दुसऱ्या डावात 10 विकेट घेत, जिम लेकरच्या विक्रमाची बरोबरी करत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर ढोल नगाडे वाजवून विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला होता. तो कधीही विसरता येण्यासारखा नाही.
सामन्यादरम्यान कर्फ्यूसारखं वातावरण
पूर्वी दूरदर्शनवर महाभारत ही मालिका लागायची. त्यावेळी देशात रस्त्यांवर कर्फ्यू लागल्यासारखी परिस्थिती असायची. कारण प्रत्येक घरात ही मालिका पाहिली जात होती, हे आपल्या लक्षात असेलच.
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांच्या वेळीही अशीच परिस्थिती असायची. सामन्याच्या दोन-तीन दिवसांपूर्वी सगळीकडं मॅचचीच चर्चा असायची. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अशाप्रकारचा उन्माद काहीसा कमी झाला आहे. मात्र रोमांच आणि उत्साह तसाच आहे. त्यामुळंच आयसीसीदेखील त्यांच्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवून या संधीचं सोनं करण्याचा शक्य तो प्रत्येक प्रयत्न करत आहे.
2019 च्या विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्डवर सामना झाला होता. या सामन्याची प्रेक्षक क्षमता 26,000 आहे. मात्र आठ लाख लोकांनी त्याच्या तिकिटासाठी अप्लाय केलं होतं. त्यावरुन तुम्हाला या सामन्यांबाबत लोकांमध्ये असलेलं वेड लक्षात येईल. टीव्हीवर 50 कोटी लोकांनी हा सामना पाहून एक विक्रम रचला होता.
गेल्या 10-15 वर्षांमध्ये क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रियांची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. आजही दोघांपैकी कोणालाही पराभव मान्य नाही, हे खरं असलं तरीही दोन्ही देशातील चाहत्यांनी पराभव पचवणही शिकलं आहे. त्यामुळंच तीव्र प्रतिक्रिया उमटत नाहीत.
यात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन्ही देशांनी नियमित खेळल्याचाही मोठा वाटा राहिला आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आजही फारसे चांगले नाहीत. मात्र, आयसीसी स्पर्धांमध्ये खेळल्याने दोन्ही देशांच्या क्रिकेटपटुंमधील संबंधही सुधारले आहेत.
पाकिस्तानचे क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि वसीम अक्रम हे भारतीय कार्यक्रमांमध्ये नियमितपणे झळकायचे असा एक काळ होता. मात्र, 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा प्रचंड तणाव वाढला. त्यामुळं क्रीडासंबंधांवरही पूर्णविराम लागला.
दोन्ही देशांमधील या खराब संबंधांमुळंच भारतानं आयसीसीच्या स्पर्धांमध्येही पाकिस्तानच्या विरोधात खेळण्यावर बहिष्कार घालण्याची मागणी समोर येत असते. 2019 मद्ये पुलवामा हल्ल्यामुळं अशी मागणी झाली होती. तर सध्या जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी घटनांमुळं ही मागणी होत आहे.
मात्र, अशा मागण्यांना कधीही फारसं महत्त्वं देण्यात आलेलं नाही. कारण अशाप्रकारे सामना न खेळणं हे आयसीसीच्या नियमांच्या विरोधी आहे. तसंच यावेळी तर बीसीसीआय आयोजक आहे, त्यामुळं ही मागणी मान्य होणं, शक्यच नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)