महिला तस्करी : अल्पवयीन मुलानं पत्नीला ओडिशातून राजस्थानात नेऊन विकलं

    • Author, संदीप साहू
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, भुवनेश्वरहून

ओडिशाच्या एका अल्पवयीन मुलानं राजस्थानात त्याच्या पत्नीला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेच्या कुटुंबानं याबाबत तक्रार केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी गुरुवारी तिला राजस्थानाहून परत आणलं आणि पतीला अटक करून बालसुधार गृहामध्ये पाठवलं आहे.

राजस्थानहून परत आल्यानंतर महिला ओडिशातल्या बलांगीर जिल्ह्याच्या टिकरपडा गावात आई वडिलांबरोबर राहत आहे.

"लग्नानंतर आठ दिवसांनीच त्यांनं मला विटांच्या भट्टीत काम करायचं म्हणून राजस्थानात नेलं. जवळपास दोन महिन्यांनी तो मला सोडून कुठेतरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी मला समजलं की, त्यानं मला एक लाख रुपयांमध्ये विकलं आहे. खरेदी करणाऱ्यानं मला घरी आणि त्याच्या शेतात काम करायला लावलं. नंतर बलांगीर पोलिसांचं पथक याठिकाणी आलं आणि त्यांनी मला परत आणलं," असं त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

या महिलेला त्या पुन्हा लग्न करणार आहेत का? असं विचारण्यात आलं. त्यावर पुढं काय होणार हे आताच सांगता येणार नाही, मात्र मी आईवडिलांच्या घरीच राहील, असं त्या म्हणाल्या.

खरेदी करणाऱ्यानं लैंगिक शोषण केलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, या महिलेला खरेदी करणारा वयस्कर व्यक्ती होता आणि तो पुढच्या काही दिवसांत त्यांच्याशी लग्न करणार होता, असं बेलपाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी बुलू मुंडा म्हणाले.

"आमचं पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मुलीला परत आणत होतं, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचा रस्ता अडवला. मुलीला 1 लाख 80 हजारांमध्ये खरेदी केलं आहे. त्यामुळं तिला नेऊ देणार नाही," असं पोलिसांनी सांगितलं.

महिलेपर्यंत कसे पोहोचले पोलीस?

"आमच्या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं, त्यांना पोलिस ठाण्यात येऊन बोलण्यासाठी राजी केलं. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या सल्ल्यानुसार आमचे कर्मचारी महिलेला मागच्या रस्त्यानं घेऊन तिथून निघून आले आणि त्याचदिवशी ओडिशाला रवाना झाले," असं बुलू मुंडा यांनी सांगितलं.

"त्यांच्यासाठी महिला या जनावरांसारख्या असतात, त्यांची खरेदी विक्री त्यांच्यासाठी नेहमीचीच आहे," असं मुंडा म्हणाले.

राजस्थानात महिलेला शोधणं अत्यंत कठिण काम होतं, असं बलांगीरचे पोलिस अधीक्षक नितिन कुशलकर म्हणाले.

"महिलेकडे मोबाईल फोन नव्हता. त्यामुळे तिच्यापर्यंत पोहोचणं कठिण होतं. आम्ही तिच्या कुटुंबीयांकडून एक फोटो घेतला आणि बरान पोलिसांच्या मदतीनं तिला शोधून काढलं," असं ते म्हणाले.

राजस्थान पोलिसांनी महिलेची खरेदी करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

अल्पवयीन आरोपीनं आधी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पत्नी त्याला सोडून कुठंतरी निघून गेली आहे, असं वाटल्याचं तो म्हणाला. त्यावर पोलिसांत तक्रार का केली नाही, असं पोलिसांनी विचारलं. तर त्यानं घाबरलो होतो असं पोलिसांना सांगितलं.

"त्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि सखोल चौकशी केली त्यानंतर त्यानं पत्नीला विकल्याची माहिती दिली," असं मुंडा म्हणाले.

पती अल्पवयीन, पत्नी सज्ञान

या महिलेच्या पतीच्या वयावरून वाद निर्माण झाला आहे. पती सज्ञान असून त्याचं वय 24 वर्षं आहे, असं पत्नीनं बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं. पोलिसांनी मात्र, त्याचं वय केवळ 17 वर्षं असल्याचं म्हटलं आहे.

"आम्ही त्याची शाळेतील कागदपत्रं आणि आधार कार्ड तपासलं आहे. त्यावरून त्याचं वय 17 असून तो अल्पवयीन आहे," बेलपाडा पोलिसांचं म्हणणं आहे.

आरोपीचे वकील पृथ्वीराज सिंह यांनीही याला दुजोरा दिला. "त्यामुळंच शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी त्याचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायाधीशांनी त्याची रवानगी बालसुधार गृहात केली," असं ते म्हणाले.

आरोपीच्या जामीनासाठी मंगळवारी जिल्हा न्यायालयात अर्ज करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला शिक्षा कमी होईल. मात्र तो अल्पवयीन असल्यानं त्याच्या कुटुंबीयांसमोर एक नवी समस्या निर्माण झाली आहे.

अल्पवयीन मुलाचं लग्न केल्याप्रकरणी आई-वडिलांच्या विरोधात पोलीस गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अटकेच्या भीतीनं आरोपीचे कुटुंबीय घर सोडून निघून देले आहेत. अनेक प्रयत्नांनंतरही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

महिला तस्करी

महिलांची तस्करी करणाऱ्यांसाठी त्यांना जाळण्यात अडकवणं किती सोपं असतं, हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ओडिशामध्ये ही एक गंभीर समस्या आहे.

देशभरात महिलांची तस्करी करणाऱ्यांच्या नजरा या कायम ओडिशावर असतात. विविध प्रकारची आमीषं दाखवून दलाल मुलींचा किंवा त्यांच्या आई वडिलांचा विश्वास जिंकतात आणि त्यांना इतर राज्यांत नेऊन त्यांची विक्री करतात.

राज्याच्या आदिवासी भागात अशी प्रकरणं अधिक आढळतात. याठिकाणी जाळ्यात अडकवलेल्या तरुणी उत्तरेकडील राज्यांत विक्री केल्या जातात. या तरुणीची खरेदी विक्री पंजाब आणि हरियाणामध्ये सर्वाधिक होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र दिल्ली, राजस्थान आणि युपीदेखील यात फार मागे नाही.

ओडिशा आणि महिला तस्करी

ओडिशामधून दरवर्षी हजारोंच्या संख्येनं मुलींची इतर राज्यांत विक्री केली जाते, त्याचं नेमकं कारण काय?

"याची दोन मुख्य कारणं आहे. गरिबी आणि जनजागृतीचा अभाव. अनेक तरुणींना चांगल्या ठिकाणी लग्नाचं आमीष दाखवून फसवलं जातं. गरीबीमुळं मुलीचं लग्न करण्यास अक्षम असणाऱ्या आई वडिलांना दलालांच्या कारस्थानांचा अंदाज येत नाही. त्यामुळं ते सहजपणे या जाळ्यात अडकतात. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी अनेकदा खोटी लग्नही लावली जातात," असं सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा मोहंती सांगतात.

"लग्नाबरोबरच हे दलाल चांगल्या ठिकाणी काम मिळवून देण्याचं खोटं आश्वासन देत मुलींच्या आई वडिलांना फसवतात. तरुणींच्या आई वडिलांना कायद्याची माहिती नसते आणि त्यामुळे दलालांचं काम सोपं होतं. बहुतांश प्रकरणांत कामगाराची नोंदणी गरजेची असते, पण ती होतच नाही," असंही त्या म्हणाल्या.

दुसऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा दाश यांनीही यामागचं आणखी एक कारण सांगितलं. "याठिकाणच्या तरुणी अत्यंत साध्या भोळ्या असतात. त्यांचा विश्वास जिंकण हे दलाल आणि तशा इतरांसाठी अगदी सोपं असतं, हेही यामागचं एक कारण आहे."

दरवर्षी ओडिशामधून शेकडोंच्या संख्येनं महिलांची तस्करी होते. महिलांचं नशीब बलवत्तर असेल तर कधीतरी या दलदलीतून त्यांची सुटका केली जाते. जसं या प्रकरणात घडलं," असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)