सेक्स वर्करचं कोरोना काळातलं आयुष्य : ना ग्राहक, ना पैसा, ना सरकारी योजनांचा लाभ

    • Author, चिंकी सिन्हा
    • Role, बीबीसीसाठी

सेक्स वर्क देखील एक व्यवसायच आहे असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने अलीकडेच मांडले आहे. स्वेच्छेने केलेले सेक्स वर्क हे व्यवसाय असल्याचं अनेक सेक्स वर्कर्स आधीपासून सांगत होत्या. सुप्रीम कोर्टाने त्यांची दखल घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी बीबीसीने हा लेख प्रकाशित केला होता. तो आता पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

मुंबईतील कामाठीपुरा हा भाग वेश्या व्यवसायासाठी ओळखला जातो. कोरोनामुळे या भागाचं काय नुकसान झालं आहे याचा घेतलेला हा आढावा.

त्या खुऱ्याडात घुसताच बंकरमध्ये शिरल्यासारखं वाटतं. एकावर एक लाकडाचे कप्पे रचून ही खुराडी तयार झाली आहेत. ट्रेनच्या शयनयानमध्ये बर्थ असतात तसं वाटतं. खुराड्यात हवा खेळती राहावी यासाठी एक्झॉग्स्ट पंखेही आहेत.

पातळ गाद्यांवर बेडशीटऐवजी ताडपत्री आहे. पडदे आहेत पण एकदम विरून गेलेत. ही सगळी मांडणी झटपट सेक्सकरता उभारण्यात आली आहे. सेक्सचा विषय सोडला तर या मांडणीला काहीच अर्थ नाही. या खुराड्यांमध्ये सौदा होतो. या सौद्यात भावनांना थारा नाही.

मुंबईतल्या कामाठीपुरा भाग, गली नंबर एक. रमाबाई चाळीतल्या या बंकरसारखी खुराडी देशातल्या वेश्यागृहांप्रमाणेच आहेत. इथे जागा अत्यंत चिंचोळी. पण धंदा हा धंदा आहे, त्यामुळे सगळे जैसे थे सुरू राहतं. तुम्ही या जागेला सर्व्हिस चेंबर म्हणू शकता. बाकी वर्कप्लेसप्रमाणे इथेही कामच चालतं. इथे तुम्हाला प्रकाश कमी जाणवेल पण ही वर्कप्लेस आहे खरी.

खूप वर्षांपूर्वी निधि (नाव बदललं आहे) यांना त्यांच्या घरच्यांनी सोडून दिलं. कारण इतकंच की तिचा जन्म ट्रान्सजेंडर म्हणून झाला होता. जाहीरपणे बलात्कार आणि अत्याचाराच्या धमक्यांनंतर तिला इथे जागा मिळाली आहे. जसं या कोठीने निधिला सामावून घेतलं तसं ती स्वत:शी म्हणाली- आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. मी सुरक्षित आहे.

हे काम तिला आवडत नाही, पण मनाला समजवावं लागलं. दुसरा काही उपाय नव्हता. इथल्या बाकी बायकांकडेही पर्याय नाहीत. निधि तर ट्रान्सजेंडर होती.

कामाठीपुऱ्यात विस्कटून गेलेलं आयुष्य

मी शेवटचं तिला भेटले होते तेव्हा तिच्या पाठीवर सामान होतं. तिची नजर टॅक्सी शोधत होती. तिला विक्रोळीला जायचं होतं. कामाठीपुरा गल्ली क्रमांक 1मधल्या अंधारकोठड्यांना सोडून तिला विक्रोळीला जायचं होतं. कामाठीपुरात सुरू असलेल्या पुनर्निर्माण कामांमुळे मोठ्या संख्येने सेक्स वर्कर्सना हा परिसर सोडून जावं लागलं. मुंबानगरीच्या मध्यभागी असलेले हे ठिकाण या सगळ्याजणींसाठी मोक्याची जागा होती.

ती मला म्हणाली होती- "या प्रोजेक्टने खूपच त्रास दिला आहे. सेक्स वर्कर्सना आपली कोठ्या रिअल इस्टेट कंपनीला विकाव्या लागल्या."

यंदाच्या जानेवारी महिन्यातली ही गोष्ट. मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या सेक्स वर्कर्सचं आयुष्य उद्धवस्त होऊन गेलं. त्यांना आता जगणं कठीण होऊन बसलं आहे. त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. यांच्यापैकी बहुतेकजणी स्थलांतरित आहेत. स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे दस्तावेजही नाहीत.

कमाई शून्य

मे महिन्यात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाला. ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर्ससाठी जिवंत राहणं अत्यंत कठीण झालं आहे. कामाठीपुऱ्यात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था त्यांना शिधा पुरवत आहेत.

सरकारकडून काहीही मिळालेलं नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने एक पत्र प्रसिद्ध केलं. काहीही कमाई होत नसल्याने सेक्स वर्कर्सना मदत करण्याचं आवाहन प्रशासनाला करण्यात आलं होतं.

सेक्सवर्कर्सच्या अधिकारांना ओळख मिळवून देणारं पत्र

या पत्राची भाषा लक्ष वेधून घेणारी आहे. महिला आणि बालकल्याण विभागाचे प्रभारी आयुक्त हृषिकेश यशोध यांनी हे पत्र लिहिलं होतं. सेक्स वर्कर्सच्या संदर्भात जी भाषा वापरली जाते तशी या पत्राची भाषा नव्हती.

सेक्सवर्कर्सच्या कामाला ओळख मिळवून देण्यासाठी लढणाऱ्यांना नवी आशा मिळाली. सेक्स वर्कर्सच्या कामाला सर्व्हिस म्हणून मान्यता मिळावी यासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांना या पत्राने हुरुप मिळाला. त्यांच्या कामाला सर्व्हिस म्हणून मान्यता देण्यासाठी सरकार जागतिक संकटाची वाट बघत होतं.

23 जुलै रोजी महिला आणि बालकल्याण विभागाकडून पाठवण्यात आलेल्या पत्राचा विषय होता- देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोव्हिड-19 च्या काळात आवश्यक सेवा उपलब्ध करून देणेबाबत. सेक्सवर्कर्सचे अधिकार आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासंदर्भात हे एक ठोस पाऊल आहे.

पत्रात म्हटलं आहे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणि वेश्या व्यवसाय सोडून दिलेल्या महिलांचे कमावण्याचे मार्ग बंद झाले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना कामही मिळत नाहीये. यामुळे त्यांच्यावर तसंच त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी जिवंत राहणंही अवघड झालं आहे.

या पत्राद्वारे पहिल्यांदाच देशातल्या कोणत्याही राज्याने सेक्सवर्कर्सच्या कामाला काम म्हणून मान्यता दिली आहे. सेक्स वर्कर्सकडे नैतिकतेला धक्का पोहोचवणाऱ्या म्हणून पाहिलं जातं. एचआयव्ही किंवा सेक्स ट्रॅफिकिंगची चर्चा होते तेव्हाच त्यांचा विषय निघतो.

वंचित-उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या संस्थापक मीना सेशु यांच्या मते हा स्वागतार्ह बदल आहे. या पत्रात सेक्सवर्कर्स महिलांना देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया असा उल्लेख नाही. असं पहिल्यांदाच होतं आहे. त्यांच्या कामावर लक्ष देण्यात आलं आहे.

वेश्या व्यवसाय

सेशु सांगतात, पत्रात संस्कृत भाषेतील वेश्या शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. या महिलांसाठी हा शब्द सन्मान देणारा आहे. सेक्सवर्कर्स महिलाही हा शब्द वापरतात. हे पत्र त्यांच्या कामाविषयी बोलतं. पत्राचा विषय आहे- अशा स्त्रिया ज्या वेश्या व्यवसायावर अवलंबून आहेत. व्यवसायाचा हिंदी अर्थ होतो पेशा. इंग्रजीत अर्थ होतो काम. पत्र आहे- वेश्या व्यवसायावर अवलंबून महिलांना कोव्हिड-19 काळात आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याबाबत.

सेशु सांगलीला राहतात. सांगलीत साधारण 250 महिला राहतात ज्या वेश्या व्यवसायात आहेत. याआधी या महिलांना केवळ एचआयव्ही रोखण्यासाठीच्या योजनांच्या माध्यमातून ओळख मिळाली आहे.

सरकारी योजनांमधून वेश्या व्यवसायातील महिला बाहेर का?

वेश्या व्यवसायातील महिला याआधी एकदा अशा परिस्थितीतून गेल्या आहेत. नव्वदीच्या दशकात मुंबईचा रेड लाईट एरिया अर्थात कामाठीपुरा हा भाग एचआयव्ही/एड्सचं केंद्र बनला होता. त्यावेळी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एड्स नियंत्रणासाठी एक योजना तयार केली होती. मात्र ही योजना लवकरच गुंडाळली.

त्या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी काही वर्षं गेली. आता कोरोनाने वेश्या व्यवसायातील या महिलांवर तशी वेळ ओढवली आहे. निधि आणि तिच्या सहकाऱ्यांना माहिती आहे की येणारा काळ आणखी अवघड असेल.

अवघड दिवस

फोनवरून बोलताना ती म्हणाली, तुम्हाला एचआयव्ही/एड्सची माहिती आहे. त्याच्याशी कसं लढायचं हे ठाऊक आहे. कोरोना विषाणू कशा ना कशा पद्धतीने पसरणार आहेच. पुढे काय होणार हे समजतच नाहीये. मुंबईतला कामाठीपुरा भाग हा कंटेनमेंट झोनमध्ये आला नाही. या भागात कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.

कोरोनाचा रुग्ण नाही

असं असलं तरी त्यांना नेहमीप्रमाणे बहिष्काराला सामोरं जावं लागत आहे. राज्य सरकारने त्यांना असहाय्य अवस्थेत सोडून दिलं आहे. गरीब लोकांसाठी अनेक योजनांचा फायदा सेक्सवर्कर्सना देण्यात आलेला नाही. कोव्हिड-19 विरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने 11 अधिकारप्राप्त गट तयार केले आहेत.

सेशु यांचं म्हणणं आहे अधिकारप्राप्त गटाने संग्रामशी (SANGRAM) संपर्क केला आणि देशातील सेक्सवर्कर्सच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यानंतर या गटाने मंत्रालयाला अहवाल दिला. मंत्रालय राज्यात खाद्य वितरणाशी निगडीत पीडीएसच्या अंतर्गत सेक्सवर्कर्सना अन्नधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. या महिला पीडीएसच्या कक्षेत येत नसतील तर त्यांना अन्य कल्याणकारी योजनांमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं.

कोणतीही योजना नाही

सेशु सांगतात, हे पत्र जारी करण्यात आलं असलं तरी सेक्सवर्कर्ससाठी कोरोना काळात कोणतीही योजना नाही. त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं.

काही दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये मागणी करण्यात आली की केंद्र सरकार आणि दिल्लीतलं सरकार यांनी सेक्सवर्कर्स, एलजीबीटीक्यू समाजाच्या माणसांना आर्थिक मदतीबरोबरच सामाजिक सुरक्षा मिळवून द्यावी.

सर्व्हिस म्हणून दर्जा का नाही?

अनैतिक व्यापार निवारण अधिनियमानुसार ज्या वेश्यालयात सेक्सवर्कर्स राहतात आणि काम करतात ते बेकायदेशीर आहेत. परंतु शहरांमध्ये हे गेली अनेक वर्षं सर्रास सुरू आहेत. अनेकदा इथून मुलींची सुटका करून त्यांना सुधारगृहात नेण्यात येतं किंवा पोलीस त्यांना तंबी देऊन सोडून देतात.

मात्र यापैकी अनेकींचं म्हणणं आहे की त्या मर्जीने हे काम करत आहेत. नॅशनल सेक्स वर्कर्स असोसिएशनशी संलग्न जुडी आएशा यांचंच उदाहरण बघूया.

सांगलीत राहणारी जुडी हे काम स्वेच्छेने करते. गरिबीमुळे पश्चिम बंगालमधल्या आपल्या गावी तिने हे काम सुरू केलं. नवऱ्याचं निधन झालं होतं. त्यांचं मूल लहान होतं. त्यानंतर एका मित्राच्या बरोबरीने सुरक्षित जागेच्या शोधात ती आसनसोलला गेली. त्यानंतर काही महिन्यांनी सांगलीला आली. सांगतीतल्या वेश्यालयात काम करू लागली. गेली आठ वर्षं ती हे काम करते आहे.

मूलभूत अधिकार

आता त्यांच्यासाठी सेक्स एखाद्या सर्व्हिसप्रमाणे आहे. एखाद्या देवाणघेवाणीसारखं. स्पा सेंटरमध्ये जसा मसाज केला जातो तसंच त्यांना हे वाटतं. वर्षानुवर्ष सेक्स वर्कर्सची एक प्रतिमा तयार करण्यात आली आहे.

त्यांना मानसिक आजार, छळ आणि शोषणाची शिकार असल्याचं सांगितलं जातं किंवा खराब बायका अशी हेटाळणी केली जाते. एक कामगार म्हणून जे मूलभूत अधिकार त्यांना मिळायला हवेत त्यामध्ये ही प्रतिमा अडसर ठरते.

पण आएशा खंबीर आहे. आएशा आणि तिच्यासारख्या अन्य महिलांनी अशा संकटांचा सामना केला आहे. कोरोना संकटलाही त्या पार करतील. सांगलीत जिथे ती राहते तिथेच ग्राहकांना ती सेवा देते. कोरोनाने तिच्या कामाला मोठा फटका बसला आहे.

आएशा सांगते, आमचे बहुतांश ग्राहक प्रवासी कामगार असतात. ते कर्नाटकातून असतात. एखाद्या दिवशी एखादा ग्राहक मिळतो. सेक्सच्या वेळी आम्ही काळजीही घेतो. पण तेवढंही पुरेसं नाही. लॉकडाऊन लागल्यावर पुढे काय होणार हे आएशाला समजू शकलेलं नाही. कोरोना होऊ नये यासाठी आएशा आणि तिच्या सहकारी काळजी घेत होत्या.

आएशा सांगते, "परिस्थितीने आम्हाला अडचणीत टाकलं आहे. आम्ही एकमेकींची मदत केली. उपासमारीने मरायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. आम्ही मदतीसाठी विनंती केली. आता ब्युटी पार्लर आणि स्पा सुरू झाले आहेत. लोकांनी कामावर जायला सुरुवात केली आहे. कोव्हिड-19चा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. एचआयव्हीशी जसे लढलो तसं कोरोनाशी लढू."

सेक्सवर्कर्सची आशा

यादरम्यान महिला आणि बालकल्याण आयुक्त यशोध यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं. या पत्रानंतर आएशाच्या संघटनेने दुसऱ्या राज्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क करायला सुरुवात केली. अन्य राज्यातील सेक्सवर्कर्सना दैनंदिन जीवन जगण्याकरता मदत मिळेल अशी आशा आहे.

आएशा सांगतात की सर्व्हिस प्रोव्हायडरची मान्यता मिळणं आवश्यक आहे.

जगभरात या महिलांसाठीचे नियम सुस्पष्ट नाहीत. सरकारने प्रवासी कामगार आणि रस्त्यावर दुकान मांडणाऱ्यांसाठी योजना तयार केली. मात्र अशी कोणतीही योजना सेक्सवर्कर्ससाठी राबवण्यात आलेली नाही.

सेक्सवर्कर्स प्रवासी कामगारांप्रमाणेच आहेत. परंतु दैनंदिन आवश्यक गोष्टींपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग खडतर आहे. त्यांच्या वाटेत सामाजिक, सांस्कृतिक, कायदेशीर तसंच भाषिक अडथळे आहेत.

भारतात वेश्या व्यवसाय बेकायदेशीर नाही

भारतात वेश्या व्यवसाय बेकायदेशीर नाही. मात्र वेश्यालय चालवणं, सेक्ससाठी खुलेआम चेतवणं, वेश्या व्यवसायातून पैसा कमावणाऱ्या महिलेच्या कमाईवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून राहणं बेकायदेशीर आहे.

वंचित वर्गासाठी काम करणाऱ्या वकील आरती पै सांगतात, "सेक्स वर्कर्ससाठी महिला आणि बालकल्याण आयुक्तांनी जारी केलेलं पत्र अॅडव्हायजरी आहे. दोन वर्गवारीतला भेद स्पष्ट करतं. एक असा वर्ग ज्यांचा या कामासाठी वापर करून घेतला जातो. दुसरा असा वर्ग की ज्या महिला मर्जीने हे काम करतात."

त्या सांगतात, पत्रासारख्या पुढाकारामुळे थोडा बदल नक्कीच घडतो. हे प्रयत्न महत्त्वाचे आहेत कारण सरकारने पाऊल उचललं आहे. सामाजिक अधिकारांशी संबंधित सरकारी योजनांमध्ये सेक्सवर्कर्सना स्थान आहे.

कुटुंबाचा आधार

या महिलांपैकी अनेकजणी घरातील कर्त्या आहेत. घरातली माणसं त्यांच्या कमाईवर अवलंबून आहेत. कामाठीपुऱ्यातील अनेक महिलांना जागेचं भाडं देणं कठीण झालं आहे. एका बेडचं भाडं अडीचशे रुपये आहे. जागा सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

कामाठीपुऱ्यात साडेतीन हजार सेक्सवर्कर्स आहेत. मुंबईच्या अन्य भागात मिळून हजारो सेक्सवर्कर्स आहेत. या सगळ्याजणींना अन्नधान्याच्या बरोबरीने औषधांचीही आवश्यकता आहे. नाकोच्या (NACO) आदेशात म्हटलं आहे की नोडल एजन्सींनी या महिलांपर्यंत औषधं आणि अँटी-रेट्रोव्हायरल औषधं पोहचवावी.

कोरोनाच्या भीतीने कामाठीपुरा सोडून अन्य ठिकाणी स्थलांतरित महिलांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. ग्राहकांना सर्व्हिस देण्यासाठी त्या 50 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त भाडं देऊन खोली घेतात. ग्राहकांना सर्व्हिस दिल्यानंतर शेवटच्या लोकलने शहराच्या दुसऱ्या भागात परत जातात. गेली अनेक वर्षं त्यांचं हेच जगणं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सेक्स वर्कर्सचं इथून स्थलांतर सुरू आहे. ट्रान्सजेंडर इथून जाणारे शेवटचे असतील. तूर्तास लाकडाच्या खुराड्यांमध्ये ते टिकून आहेत.

मोठी प्रतीक्षा

त्यांची प्रतीक्षा खूप मोठी आहे. ते पत्र चांगल्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. या लढाईत त्या टिकून आहेत. कोरोनाच्या लढाईने त्यांना आणखी मजबूत केलं आहे.

निधि म्हणते, "आम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही. घर चालवण्यासाठी आम्ही हे काम करतो. आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही हे काम करतो. यात काहीही चुकीचं नाही.

मला आठवतं की कशी ती धर्माची पाईक आहे. शुक्रवारी नमाजासाठी जाताना मी तिला पाहिलं आहे."

शबनम (नाव बदललं आहे) आपलं काम सुरू करण्यापूर्वी उदबत्ती लावते. जसं एखादा दुकानदार दुकान उघडण्यापूर्वी उदबत्ती लावतो.

या कामातली नैतिकता-अनैतिकता, सामाजिक कलंक, गरिबी या गोष्टी बाजूला ठेऊया. हे काम करणाऱ्या महिलांना हे ईमानदारीचं काम वाटतं. त्यांनी आपलं शरीर विकलेलं नाही. ज्यांनी पैसे दिलेत अशा ग्राहकांना सर्व्हिस दिली आहे. या कामात त्या स्वत:च्या मर्जीने आहेत.

निधि म्हणते, मीही तुमच्यासारखीच एक कामगार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)