पंजाब विधानसभा निवडणूक 2022 बद्दल तुम्हाला माहिती असावं असं सर्वकाही

पंजाबमध्ये सध्या सगळ्यांची नजर 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागली आहे. 20 फेब्रुवारीला पंजाबात एकाच टप्प्यात मतदान पार पडेल. 10 मार्चला मतमोजणी होऊन निकाल लागतील.

कॅप्टन अमरिंदर यांनी पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापन केली असून ही विधानसभा निवडणूक ते भाजपसोबत लढवत आहेत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही कॅप्टन अमरिंदन सिंह यांच्यासाठी प्रचार केला.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक काँग्रेस (PLC) आणि सुखदेव सिंह धिंडसा यांच्या नेतृत्त्वाखालच्या शिरोमणी अकाली दल (संयुक्त) सोबत भाजप पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक लढवत आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची जादू खरंच चालणार की, काँग्रेस आणि अकाली दल यांच्यातच राजकीय संघर्ष असेल?

असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. मात्र त्यावर चर्चा करण्यापूर्वी पंजाब विधानसभा निवडणुकीचं संपूर्ण समीकरण नेमकं कसं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या अशाच काही प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत.

पंजाब विधानसभा निवडणूक केव्हा होणार?

पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी 2022 रोजी या एकाच टप्प्यात मतदान होईल. आधी मतदानासाठी 14 फेब्रुवारीची तारीख जाहीर करण्यात आली होती. पण 16 फेब्रुवारीला साजरी होणारी रविदास जयंती लक्षात घेता मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

16 व्या पंजाब विधानसभेसाठी 117 जागांवर ही निवडणूक होईल. 10 मार्चला इथली मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.

यापूर्वीची विधानसभा निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्या विधानसभेचा कार्यकाळ 17 मार्च, 2022 ला (कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 17 मार्च, 2017 ला पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती) संपणार आहे.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच पंजाबमध्येही दर पाच वर्षांनी निवडणुका होतात.

मतदारसंघ आणि बहुमताचा आकडा?

पंजाबमध्ये 117 विधानसभा मतदारसंघ आहे.

विधानसभा निवडणुकीत बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 59 चा आकडा गाठावा लागतो.

ज्या पक्षाला किंवा आघाडीला 59 किंवा अधिक जागा मिळवण्यात यश मिळतं, त्यांची सत्ता स्थापन होते.

प्रमुख उमेदवार कोण?

अमरिंदर सिंग

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर हे पटियाला शहर मतदारसंघातून निवडणूक लढवतात. ते गेल्या 4 वर्षांपासून पंजाबची सत्ता सांभाळत होते. मात्र काही दिवसांपूर्वीच मोठा बदल करण्यात आला आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते आता काँग्रेस पक्षात नाहीत. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला.

कॉंग्रेस

नवज्योत सिंग सिद्धू

पंजाब काँग्रेसचा कारभार सांभाळल्यानंतर सिद्धू यांचं पक्षातलं स्थान आणखी वाढलं आहे. त्यात आता अमरिंदर मुख्यमंत्री नाहीत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली तर सिद्धू यांच्याकडे मोठी जबाबदारी असण्याची शक्यता आहे.

चरणजीत सिंग चन्नी

पंजाबमध्ये काँग्रेसनं नवीन मुख्यमंत्री म्हणून चन्नी यांची निवड केली आहे. त्या माध्यमातून काँग्रेसनं राज्यात दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत चन्नी यांची भूमिकाही महत्त्वाची असेल.

परगट सिंग - ऑलिम्पियन परगट सिंग यांना अद्याप पंजाब सरकारमध्ये महत्त्वाचं स्थान किंवा पद मिळालेलं नाही. मात्र सिद्धू यांच्याशी त्यांची असलेली जवळीक पाहता, त्यांना पंजाब कांग्रेसचं सरचिटणीसपद देण्यात आलं आहे. भविष्यातही त्यांचं महत्त्वाचं स्थान असेल.

सुखपाल सिंग खैरा - आम आदमी पार्टी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे सुखपाल खैरा चांगले वक्ते आहेत. मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे.

सुनील जाखड - पंजाब कांग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओलविरोधात लढणारे सुनील जाखडही काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा आहेत.

शिरोमणी अकाली दल

प्रकाश सिंग बादल - पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंग बादल यावेळीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सुखबीर सिंग बादल - शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर बादल हे विद्यमान खासदार असले, तरी ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अकाली दल पक्षाचा ते प्रमुख चेहरा आहेत.

आम आदमी पार्टी

भगवंत मान - भगवंत मान आम आदमी पार्टीचे पंजाबमधील एकमेव खासदार आहेत. धुरी येथून ते आपतर्फे निवडणूक लढवत असून आपने मान हे आपले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याचं जाहीर केलंय.

कुंवर विजय प्रताप सिंग - पंजाब पोलिस सेवेतील माजी महानिरीक्षक कुंवर विजय प्रताप सिंग, यांनी वेळेपूर्वी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. अवमान प्रकरणी तपासात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

हरपाल सिंग चिमा - केजरीवाल यांनी सुखपाल सिंग खैरा यांच्याकडून विरोधीपक्ष नेतेपद काढून हरपाल सिंग चीमा यांना दिलं होतं.

बलजिंदर कौर - आम आदमी पार्टीमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बलजिंदर कौरदेखील पक्षाचा महत्त्वाचा चेहरा आहेत.

अनमोल गगन मान - प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि सध्या पंजाबच्या राजकारणातील नवा मात्र अत्यंत सक्रिय चेहरा आहेत. पक्षानं त्यांची खरडमधून उमेदवारी आधीच जाहीर केली आहे.

प्रमुख मतदारसंघ कोणते?

  • पटियाला (शहर) - कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मतदारसंघ
  • लाम्बी - प्रकाश सिंग बादल यांचा मतदारसंघ
  • जलालाबाद - सुखबीर सिंग बादल यांचा मतदारसंघ
  • अमृतसर (पूर्व) - नवज्योत सिंग सिद्धू यांचा मतदारसंघ
  • डेरा बाबा नानक - सुखजिंदर सिंग रंधावा यांचा मतदारसंघ

पंजाब विधानसभा निवणुकीतील महत्त्वाचे मुद्दे कोणते?

कृषी कायद्यांना विरोध - केंद्र सरकारनं तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सीमेवरील आंदोलनाला नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. याच कायद्यांमुळं अकाली दलानं भाजपबरोबरची अनेक दशकांपासूनची आघाडी तोडली होती.

अवमान प्रकरणी न्यायास विलंब - अवमान प्रकरणी अजूनही न्याय मिळालेला नाही. नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्याच सरकारला यावरून घेरलं, आणि त्यानंतर काय झालं ते सर्वांसमोर आहे.

बेरोजगारी - कॅप्टन यांच्या 'घर-घर नोकरी'च्या आश्वासनानं पंजाब काँग्रेसच्या राजकारणात अनेकदा भूकंप आला आहे.

या सर्व मुद्द्यांशिवाय नशेखोरी, खाणी आणि वीज या मुद्द्यामुळंही विधानसभा निवडणुकीत वातावरण तापण्याची शक्यता आहे.

2017 च्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो?

सध्य चरणजीत सिंग चन्नी हे सरकारचं नेतृत्व करत आहेत. त्यापूर्वी अमरिंदर सिंग मुख्यमंत्रिपदी होते.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पंजाबच्या 117 पैकी 77 जागांवर विजय मिळाला होता.

तर प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पार्टीला 20 जागा मिळाल्या होत्या. आप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला होता.

काँग्रेसच्या या मोठ्या विजयानं पंजाबमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल आणि भाजप आघाडीची राज्यात तिसऱ्या स्थानी घसरण झाली होती. अकाली दलला 15 आणि भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या.

लोक इन्साफ पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या.

जवळपास तीस वर्षे भाजपबरोबर सत्तेत आघाडी असलेल्या शिरोमणी अकाली दल पक्षानं 2020 मध्ये केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात जात भाजपबरोबर फारकत घेतली होती.

त्यानंतर शिरोमणी अकाली दलनं बहुजन समाज पार्टीबरोबर आघाडी केली.

आम आदमी पार्टीनं 2017 मध्ये लोक इन्साफ पार्टीबरोबर आघाडी करत निवडणूक लढवली होती. मात्र, नंतर ती आघाडी तुटली होती.

  • 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 38.5 टक्के (59,24,995) मतं मिळाली होती.
  • शिरोमणी अकाली दलला 25.3 टक्के (38,98,161) मतं मिळाली होती.
  • आम आदमी पार्टीला 23.8 टक्के (36,59,266) मतं मिळाली होती.
  • भाजपला 5.3 टक्के (8,19,927) मतं मिळाली होती.

पंजाबमध्ये 2017 च्या निवडणुकीत मालवा, माझा आणि दोआबा समीकरण समजण्यासाठी पुढील आकडे महत्त्वाचे आहेत.

मालवा - काँग्रेस (40), आम आदमी पार्टी (18), शिरोमणी अकाली दल (8), भारतीय जनता पार्टी (1), लोक इन्साफ पार्टी (2)

माझा - काँग्रेस (22), शिरोमणी अकाली दल (2), भारतीय जनता पार्टी (1)

दोआबा - काँग्रेस (15), शिरोमणी अकाली दल (5), आम आदमी पार्टी (2), भारतीय जनता पार्टी (1)

गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी वेगळं काय?

निवडणुकीच्या तोंडावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आणि चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री बनल्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये काहीशी गोंधळाची स्थिती आहे. काँग्रेसनं दलित मुख्यमंत्री निवडून दलित मतदारांना खूश करण्यचा प्रयत्न केला आहे.

दुसरीकडं, अकाली दल अनेक दशकांपासून एकत्र असलेल्या पक्षापासून वेगळा झाला आहे. त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या साथीनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यास दलित उपमुख्यमंत्री देण्याची घोषणा पक्षानं केली आहे. मात्र काँग्रेसनं त्यापूर्वीच मोठी चाल खेळली आहे.

माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप यांची साथ आम आदमी पार्टीसाठी वरदान ठरू शकते.

EVM आणि VVPAT म्हणजे काय?

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) असं उपकरण आहे, ज्यावर उमेदवारांची नावं आणि त्यांची निवडणूक चिन्हं असतात.

मतदारसंघात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत उमेदवारांची नावं लिहिलेली असतात.

निरक्षर मतदारांसाठी प्रत्येक उमेदवारांचं निवडणूक चिन्हंही असतं. उदाहरणार्थ भाजपचं कमळ किंवा काँग्रेसचा हाताचा पंजा.

तुम्ही मत देण्यासाठी तयार असाल तेव्हा आवडीच्या उमेदवाराच्या नावासमोरील निळं बटन दाबावं. थोडा वेळ थांबावं, फक्त बटन दाबलं म्हणजे तुमच्या मताची नोंद झाली असं नाही.

तुम्हाला एक बीपचा आवाज ऐकू येईल, तो आला म्हणजे मत नोंद झालं. त्यानंतर कंट्रोल युनिटचा लाईट बंद होतो.

तुम्ही मत दिल्यानंतर मतदान अधिकारी ईव्हीएमचं "क्लोझ" बटण दाबतो. त्यानंतर उपकरण मत नोंदवणं थांबवतं. म्हणजे कोणी जास्त मतं, किंवा छेडछाड करू शकत नाही.

मेण आणि सुरक्षा पट्टीनं ते सील केलं जातं. निवडणूक आयोगाकडून त्याला क्रमांक दिला जातो.

मतमोजणीच्या वेळीच ते उघडलं जातं.

मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतगणना कर्मचारी आणि उमेदवारांचे एजंट याची तपासणी करतात. हे सर्व काम "रिटर्निंग अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होतं.

उपकरणाशी छेडछाड झाली नसल्याची खात्री झाल्यानंतर रिटर्निंग अधिकारी "रिझल्ट"चं बटन दाबतात.

कंट्रोल युनिटवर दिसणारी, प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मतं यांची नोंद अधिकारी घेतात.

त्याची खात्री झाल्यानंतर रिटर्निंग अधिकारी निकालाच्या पत्रावर सही करतात आणि निवडणूक आयोगाला ती सोपवतात.

निवडणूक आयोग लगेचच त्यांच्या वेबसाईटवर हे निकाल दर्शवतं.

VVPAT (वोटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल) सिस्टीमद्वारे मत दिल्यानंतर लगेचच कागदाची एक चिठ्ठी तयार होते. त्यावर तुम्ही मत दिलेल्या उमेदवाराचे नाव आणि चिन्हं असतं.

वादाची परिस्थिती उद्भवल्यास ईव्हीएममधील मतं आणि या चिठ्ठ्या जुळवून तपासणी करता यावी म्हणून ही यंत्रणा तयार केली आहे.

ही चिठ्ठी ईव्हीएमला लावलेल्या काचेच्या स्क्रीनमधून 7 सेकंदांसाठी दिसते.

हे उपकरण 2013 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी डिझाईन केलं होतं.

पात्र मतदार आणि मतदान?

मतदान करण्यासाठी तुमचं वय किमान 18 वर्षे असायला हवं.

मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर एकापाठोपाठ क्रमानं तुम्हाला आत पाठवलं जातं. त्याठिकाणी अधिकारी आपल्या ओळखपत्राची तपासणी करतात.

एक अधिकारी तुमच्या बोटावर न मिटणारी शाई लावतील. त्यानंतर तुम्हाला मतदार रजिस्टरवर सही करावी लागेल.

तिसरे मतदान अधिकारी चिठ्ठी घेतो आणि ईव्हीएमच्या कंट्रोल यूनिटवर बॅलेट लिहिलेलं बटन दाबेल.

आता तुम्ही मतदानासाठी तयार आहात.

तुम्हाला वोटिंग कंपार्टमेंटकडे पाठवलं जाईल. त्याठिकाणी तुम्हाला एक ईव्हीएम दिसेल, त्यात तुमच्या मताची नोंदणी होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)