चंद्रकांत पाटीलः बाबरी मशीद पाडण्याचं श्रेय घेता, पण त्यावेळी एक तरी शिवसैनिक होता का? #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. बाबरी पाडण्याचं श्रेय घेता, पण त्यावेळी एक तरी शिवसैनिक होता का? - चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही स्वातंत्र्यलढ्यात कुठे होतो, हे जाणून घ्यायचं असेल तर इतिहास वाचा, असं म्हणत पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कुठे होता, असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला केला आहे.

बाबरी प्रकरणानंतर सगळे लपून बसले होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आले, असा दावा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला होता.

चंद्रकांत पाटील यांनी त्यालाही प्रत्युत्तर दिलं. बाबरी मशीद पाडण्याचं श्रेय शिवसेना वारंवार घेते. पण एकतरी शिवसैनिक तिथे उपस्थित होता का, असा प्रश्न पाटील यांनी विचारला.

त्यावेळी कुणी जबाबदारी घेणार नसेल तर मी घेईन, असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं, असं पाटील म्हणाले. ही बातमी सरकारनामाने दिली.

2. दसऱ्याच्या मुहूर्तावर पंतप्रधानांकडून 7 नव्या संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्याच्या निमित्ताने 7 नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या राष्ट्राला समर्पित केल्या. या 7 कंपन्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेचा हेतू पूर्ण करतात, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

यामध्ये एक कंपनी राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही आहे. 'यंत्र इंडिया लिमिटेड' असं या कंपनीचं नाव असून याच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, "आयुध निर्माण 41 कारखान्यांना नवं रुप देण्याचा निर्णय, तसंच 7 नव्या कंपन्यांची सुरुवात, देशाच्या याच संकल्पयात्रेचा भाग आहे. हा निर्णय गेली 15-20 वर्षे प्रलंबित होता. या सर्व सात कंपन्या आगामी काळात भारतीय सैन्याची मोठी ताकद ठरतील, असा मला विश्वास आहे." ही बातमी एबीपी माझाने दिली.

3. शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल - संजय राऊत

2019 मध्ये शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला होता. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना 22 जागा मिळवून देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शुक्रवारी (15 ऑक्टोबर) माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत बोलत होते.

ते म्हणाले, "राज्याची सत्ता हाती आल्यापासून शिवसेनेने आपल्या विस्तारासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान बळकट करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवसेना कोणती भूमिका घेणार हे संपूर्ण देशाला समजून घ्यायचं आहे. शिवाय, कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते, तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे, असंही राऊत म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.

4. 'NCB ने शाहरुखच्या मुलाला सुपरस्टार बनवलं'

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अटकेत आहे. या प्रकरणावरून देशात विविध प्रकारच्या चर्चा सुरू असताना दिग्दर्शक रामगोपाल वर्गा यांनी एक अजब वक्तव्य केल्याचं दिसून आलं आहे.

वर्मा यांनी ट्विट करून आपलं मत मांडलं. NCB या कारवाईच्या माध्यमातून आर्यन खानला सुपरडुपर हिट बनवत असल्याचं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं.

"शाहरुख खानने आपल्या मुलाला फक्त सुपरस्टार बनवले, पण एनसीबीने त्याला जीवनाची दुसरी बाजू दाखवून त्याला एक अतिसंवेदनशील अभिनेता बनवले आहे, जेणेकरून तो जीवनात आपली कामगिरी दाखवू शकेल आणि व्यक्तिमत्त्व तेजस्वी बनविण्यासाठी जमिनीवरील वास्तव समजून घेऊ शकेल," असंही वर्मा म्हणाले. ही बातमी झी 24 तासने दिली.

5. गावागावात संविधान भवन बांधणार - धनंजय मुंडे

500 लोकसंख्या असलेल्या वस्ती किंवा गावात अद्ययावत असं संविधान भवन बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

या संविधान भवानांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह ग्रंथालय आदी सर्व गोष्टी असतील. यंदाच्या वर्षीपासूनच संविधान भवनांच्या बांधकामाला सुरुवात होईल, असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं. ही बातमी ई-सकाळने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)