You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लखीमपूर हिंसाचार : 11 ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'चं आवाहन #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्वर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध म्हणून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचं आवाहन
लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. यादिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व गोष्टी दिवसभर बंद राहतील.
बुधवारी (6 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत लखीमपूर घटनेतील हिंसाचाराबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना सर्व मंत्र्यांनी दोन मिनीटं उभं राहून श्रद्धांजली वाहिली.
बैठकीनंतर मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीतल्या निर्णयाबाबत माहिती दिली.
एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
2. हा उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा रिझल्ट- नवनीत राणा
जनतेनं शिवसेनेला नाकारलं आहे. जनता कोणासोबत आहे हे दिसून आलंय. हा फडणवीस यांच्या मेहनतीचा आणि उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा रिझल्ट आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली.
नवनीत राणा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.
'देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातात. त्यांना समजून घेतात. त्यामुळे जनतेने भाजपाला साथ दिली,' असं नवनीत राणा यांनी म्हटलं.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या निकालाने भाजप नंबर 1 पक्ष तर शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. सत्ता असूनही ते चौथ्या नंबरवर गेले आहेत.
टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
3. काँग्रेस पुन्हा महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष होईल- नाना पटोले
'मैं अकेला ही चला था, लोग जुडते गए और कारवाँ बनता गया' असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकांच्या निकालावर भाष्य केलं.
पुन्हा एकदा काँग्रेसला राज्यात नंबर एकचा पक्ष बनवण्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
"काँग्रेस हा पक्ष खऱ्या अर्थाने तळागाळातला पक्ष आहे. कुणाला तरी तिसऱ्या माणसाला समोर उभं करायचं आणि मग तिहेरी लढतीत सहज निवडून यायचं, असलं राजकारण काँग्रेसने कधीही केले नाही. म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेस हाच एक नंबरचा पक्ष होईल," असं नाना पटोले यांनी म्हटलं.
"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे हा विजय कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विजय आहे," असंही पटोले यांनी म्हटलं.
महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
4. कारवाई करणारे अधिकारी ढोंगी आणि ड्रगमाफिया चांगले काय?- राम कदम यांची टीका
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी साहसाने कारवाई करत ड्रग्जसहित काही लोकांना रंगेहाथ पकडलं. देशभरातून त्यांचं कौतुक होत असताना राज्य सरकारचे मंत्री पत्रकार परिषद घेऊन ही कारवाई ढोंग असल्याचं सांगत या अधिकाऱ्यांचा अपमान करतात, असं म्हणत भाजप नेते राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.
जे अधिकारी कारवाई करतात ते ढोंगी, पण जे ड्रगमाफिया आहेत ते चांगले. काय म्हणायचंय काय?, महाराष्ट्र सरकारची मती गेलीये कुठे? अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र सरकार ड्रगमाफियांचं समर्थन करत आहेत का? असे प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केलेत.
एनसीबीने रेव्ह पार्टी प्रकरणी कारवाई करत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना अटक केलीय. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्जही जप्त केलं होतं.
त्यानंतर बुधवारी (6 ऑक्टोबर) नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी नसून भाजपचेच लोक असल्याचा आरोप केला होता.
राम कदम यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
5. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराएवढा प्रॉडक्टिव्हिटी बोनस
केंद्रीय मंत्रिमंडळाने राजपत्रित अधिकारी वगळून रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराएवढा उत्पादकतेवर आधारित बोनस मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.
सुमारे 11.56 लाख नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल.
रेल्वेच्या नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी लिंक बोनस मिळतो. यावर्षीही रेल्वेच्या या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. यात आरपीएफ आणि आरपीएसएफच्या जवानांचा समावेश नाही. यामुळे त्यांना हा बोनस मिळणार नाही.
मिंटने ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)