College Reopen: राज्यातील महाविद्यालयं कधी सुरू होणार? काय म्हणाले उदय सामंत?

फोटो स्रोत, BBC/shahid sheikh
राज्यातील कॉलेज दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे संकेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिले.
4 ऑक्टोबरपासून शहरात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत.
शाळा सुरू मग कॉलेज का नाही? कॉलेज कधी आणि कसे सुरू होणार? FY, SY, TY चे वर्ग एकाच वेळी सुरू होणार का?
विद्यार्थ्यांचे लसीकरण, प्रवासाची सोय, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केले जात आहेत.
यासंदर्भात बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केली. ते काय म्हणाले पाहूया,
प्रश्न: मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर कॉलेज सुरू करणार अशी चर्चा अनेक आठवड्यांपासून सुरू आहे. याबाबत काही निर्णय झालाय का?
उत्तर: कॉलेज सुरू करायची वेळ आता आली आहे असं मला वाटतं. त्यासाठी आम्ही प्रत्येक विद्यापीठाकडून अहवाल मागवला आहे.
प्रश्न: शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला मग कॉलेज का नाही?
उदय सामंत: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार कॉलेजबाबतचा निर्णय घेतला जातो. AICTE ने (All India council for technical education) नवीन शैक्षणिक वर्षापासून कॉलेज सुरू करा असं सांगितलं आहे. म्हणजेच 1 नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करा असं ते म्हणत आहेत. पण लगेच दिवाळी असल्याने आम्ही थांबलो आहोत.
प्रश्न: मग कॉलेज नेमके कधी सुरू होणार?
उदय सामंत: दिवाळीनंतर कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. तिसरी लाट आली नाही तर दिवाळीनंतर कॉलेज सुरू करू.
प्रश्न: कॉलेज सुरू करण्याचा आराखडा काय असेल?
उदय सामंत: सर्व विद्यापीठांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोव्हिड टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल. त्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल.

फोटो स्रोत, facebook
याबाबत आपत्कालीन व्यवस्थापनासोबत चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत याविषयी बैठक होणार आहे.
प्रश्न: FY,SY,TY, इंजिनीअरींग असे सर्व कॉलेज एकाच वेळी सुरू करणार का?
उदय सामंत: ऑफलाईन शिक्षणाची सर्वाधिक गरज असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल. एकाचवेळी सर्व वर्ग, शाखा 100% सुरू करता येणार नाहीत. प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल.
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून कॉलेजचे शिक्षण सुरू ठेऊ. परंतु ऑफलाईनसाठी किती मुलांना एकावेळी बोलवता येईल यावर काम सुरू आहे.
प्रश्न: विद्यापीठांची भूमिका काय आहे?
उदय सामंत: अनेक विद्यापीठांनी कॉलेज सुरू करण्याबाबत अहवाल दिला आहे. विदर्भात कोरोना रुग्णसंख्या कमी आहे.
तेव्हा 20-25% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह कॉलेज सुरू करू शकतो असा अहवाल आमच्याकडे आहे. इतरांचेही अहवाल येत आहे.
सरकारसमोर काय आव्हान आहे?
कॉलेज सुरू करत असताना विद्यापीठांना मोठी तयारी करावी लागणार आहे. कारण शाळेच्या तुलनेत कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या अधिक असते.
अनेक कॉलेजला मोठे कॅम्पस नाहीत त्यामुळे सुरक्षित अंतर राखण्याचेही आव्हान आहे.

फोटो स्रोत, EPA
कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आणि त्यांच्या प्रवासाची सोय करणंही महत्त्वाचं आहे.
विद्यार्थी पदवी कॉलेजपासून लांब राहतात. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी सार्वजनिक वाहनातून प्रवास करतात. तेव्हा कॉलेज सुरू झाल्यास अशा सर्वांसाठी प्रवासही खुला करावा लागेल.
कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ही तरुण मुलं 'स्प्रेडर' ठरू शकतात.
त्यामुळे कॉलेज सुरू केले तर गर्दी होऊ न देण्याचं आव्हान सरकारसमोर आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








