एस. आर. रंगनाथन स्मृतिदिन : ग्रंथालयांची गरज इंटरनेटच्या काळातही आहे कारण...

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

आज 27 सप्टेंबर. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक अशी ज्यांची ख्याती आहे त्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा आज स्मृतिदिन आहे. भारतातील ग्रंथालयाची चळवळ समृद्ध होण्यामध्ये रंगनाथन यांचा मोलाचा वाटा आहे.

गेल्या काही दशकांमध्ये ग्रंथालयांचे स्वरूप बदललं आहे. त्यातही ग्रंथपाल आणि एकूणच व्यवसायाचं स्वरूपच डिजिटल युगात बदलल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.

आजच्या किंडल, ई-बुक्स, पीडीएफच्या काळात ग्रंथालय प्रासंगिक राहिली आहेत का? त्यातही या व्यवसायात असलेल्या लोकांची म्हणजे ग्रंथपालांची भूमिका आजच्या काळानुरूप आहे का, असे प्रश्न नेहमी चर्चेत येतात. याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

खिशातच लायब्ररी असताना ग्रंथालयाची गरज काय?

किंडल अनलिमिटेडची जाहिरात पाहिली आहे का? महिन्याला दोनशे रुपयांची फी भरल्यावर तुम्हाला 10 लाखांहून अधिक पुस्तकांचा अॅक्सेस मिळू शकतो, असं ते म्हणतात.

म्हणजे आठवड्यातून बाहेर एक दिवस जेवलं तर हॉटेलचं बिल देखील त्याहून जास्त येईल, त्यापेक्षा कमी दरात लाखो पुस्तकं आपल्याला एका क्लिकवरच उपलब्ध होऊ शकतात. तेव्हा सार्वजनिक ग्रंथालयांकडे कोण जाणार? असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो.

नवोदय विद्यालय शेगावचे ग्रंथपाल अनंत जोशी सांगतात, "गेल्या काही वर्षांमध्ये संशोधक आणि विद्यार्थी वगळता ग्रंथालयाकडे जाण्याचा ओढा कमी झाला आहे असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात पण याचा अर्थ वाचन कमी झालं आहे किंवा जिज्ञासा कमी झाली आहे असं नाही."

तर इतर माहितीची साधनं उपलब्ध झाल्यामुळे थेट ग्रंथालयात येऊन माहिती घेण्याऱ्यांची संख्या कमीच झाली आहे. पूर्वी जे काम एनसायक्लोपिडिया किंवा विश्वकोषाचं असे ते काम आता विकिपेडिया आणि गुगल करत आहे. तेव्हा एखादा संदर्भ चटकन शोधायचा असेल तर त्यासाठी ग्रंथालय कुणी गाठणार नाही हे निश्चित आहे, पण इतर अनेक कारणांसाठी ग्रंथालयांशिवाय पर्याय नाही. हे देखील तितकंच खरं आहे.

'ग्रंथालय ही जागा नाही तर संकल्पना'

ग्रंथालय केवळ पुस्तकांचा संग्रह असलेली जागा नाही तर ही एक संकल्पना आहे, असं अनंत जोशी सांगतात.

"ग्रंथालय या संकल्पनेअंतर्गत ज्ञानाचा प्रसार होणं, ज्ञानाची लालसा जागृत ठेवणं, ज्ञान देणं-घेणं, संवर्धन करणं या गोष्टी अंतर्भूत आहेत. ही अशी जागा आहे जिथे सर्वांना येण्याची परवानगी आहे. भारतातल्या संरक्षण क्षेत्रातल्या लायब्ररी वगळता कोणत्याही लायब्ररीमध्ये तुम्ही जाऊ शकता.

"तुम्ही तिथले सभासद आहात किंवा नाहीत हे कुणीही तुम्हाला विचारू शकणार नाही. तुम्हाला हवी ती माहिती ते पुरवतीलच. जात-पात, धर्म, लिंग, गरीब, श्रीमंत, वयाने लहान किंवा मोठा हा भेदभाव न करता ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत झालं पाहिजे अशी ग्रंथालयांची रचना असते. या दृष्टीने ग्रंथालयं ही महत्त्वाची असतात," असं जोशी ग्रंथालयांचं महत्त्व विशद करताना सांगतात.

सर्वांना परवडण्यासारखे

अनंत जोशी सांगतात, "ग्रंथालय हे सामान्य करदात्याच्या पैशातून उभारले गेलेले असतात. त्यामुळे त्याचा वापर सामान्य व्यक्तीला व्हावा, असं अपेक्षित असतं. अनेक पुस्तकं तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत किंवा नियतकालिकं यांची फी देखील भरमसाठ असते अशावेळी तुमचे ज्ञान अद्ययावत ठेवायचं असेल तर ग्रंथालयं तुमच्या मदतीला तत्पर असतात."

जोशी सांगतात, "ऑनलाईन जमाना झाल्यापासून अनेक गोष्टी या इंटरनेटवर मोफत असतात पण काही नियतकालिकं, जर्नल्स यांच्यासाठी विशेष सबस्क्रिप्शन लागतं. काही जर्नल्सची फी तर लाखांच्या घरात असते लायब्ररीमध्ये त्यांचा अॅक्सेस असतो.

आयआयटीच्या ग्रंथालयात तर तब्बल तीन तीन लाख रुपये सभासदत्व फी असलेली जर्नल्स आहेत. जर ग्रंथालय नसेल तर ही फी विद्यार्थीच काय पण प्राध्यापकांना देखील परवडणार नाही."

माहिती तंत्रज्ञानाच्या उदयानंतर ग्रंथालयं कशी बदलली?

ग्रंथालय किंवा ग्रंथपाल या संस्था ग्रंथालयशास्त्राच्या अभ्यासाच्या पायावर टिकून आहेत. इतर सर्व ज्ञानशाखांना वृद्धिंगत करणं किंवा त्यांना सहाय्यभूत ठरणं हाच या शाखेचा उद्देश असल्यामुळे ग्रंथालयशास्त्र हा विषय देखील बदलत्या काळानुसार बदलला आहे.

त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा उदय हा ग्रंथालयांसाठी मारक नाही तर तारकच ठरला आहे. कॉम्प्युटर्स आल्यापासून पुस्तकांची माहिती ठेवण्यात अधिक सुसूत्रता निर्माण झाली आहे.

विविध सॉफ्टवेअर्सचा वापर करून क्षणार्धात समजू शकतं की कोणतं पुस्तक कुणाकडे आहे. कुणाची गरज काय आहे हे ओळखून ग्रंथालय सेवा देऊ शकतात. संदर्भ ठेवणे, डॉक्युमेंटेशन ही कामं सुलभ झाली आहेत, त्यामुळे ग्रंथपालाचा तसंच वाचकाचा वेळ वाचू लागला आहे.

संशोधनासाठी ग्रंथालय आवश्यकच

संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ग्रंथालयाचं महत्त्व कमी झालेलं नाही आणि कधी होणार देखील नाही. कारण इंटरनेटवर त्या विषयाच्या संदर्भातील सखोल माहिती उपलब्ध होत नाही. त्यासाठी पुन्हा जर्नल्स किंवा पुस्तकांचा विषय आलाच. इंटरनेटवर पुस्तकं सर्व उपलब्ध नाहीत. त्यांचे शीर्षक (टायटल्स) किंवा अनुक्रमणिका (कंटेट लिस्ट) उपलब्ध असते, पण पूर्ण पुस्तक उपलब्ध नसतं.

ग्रंथालयामध्ये एकाच विषयावर शेकडो पुस्तकं उपलब्ध असतात. ती एकाच जागी वर्गवारी करून ठेवलेली असतात जर त्यांची संदर्भसूची पाहिली तर ते पुस्तक तुमच्या कामाचं आहे की नाही हे चटकन लक्षात येतं आणि पुढचं काम सोयीस्कर होतं. पण त्यासाठी ग्रंथालयाची पायरी चढण्याची गरज आहे.

ग्रंथालय : माहितीचा अधिकृत स्रोत

इंटरनेटमुळे माहिती घेणं हे सोपं झालं आहे, पण ती माहिती अधिकृत आहे की नाही त्याची सत्यता पडताळून पाहिली गेली आहे की नाही याविषयी वाचकाच्या मनात शंका असू शकते.

विकिपीडिया या माहितीचा स्रोत आहे, पण त्यात वाचकाला बदल करता येऊ शकतो. त्यामुळे ते नेहमीच शंभर टक्के सत्य आहे, असं कुणीही म्हणणार नाही.

ग्रंथालयात मात्र आलेलं प्रत्येक पुस्तक आणि जर्नल हे ऑथेंटिक सोर्सवर आधारित आहे की नाही याची खात्री करून घेतली जाते, पडताळणी केली जाते. मगच त्या पुस्तकाला किंवा जर्नलला ग्रंथालयाच्या कपाटात स्थान दिलं जातं.

'ग्रंथालयातल्या इतर सेवांचाही लाभ घ्यावा'

ग्रंथालय विविध सेवा पुरवत असतं. कधी कधी त्या मोफत असतात तर काही माफक शुल्क घेऊन त्या पुरवल्या जातात.

तुम्हाला नेमकं कोणत्या विषयावरील पुस्तक हवं आहे किंवा तुमची गरज काय आहे याची चर्चा जर तुम्ही ग्रंथपालाशी केली तर त्यानुसार तुम्हाला सेवा पुरवली जाऊ शकते.

त्याच विषयावरील दुसऱ्या लेखकाचं पुस्तक किंवा दुसऱ्या प्रकाशनाचं पुस्तक तुमच्या उपयोगी कसं पडू शकतं याची कल्पना ग्रंथपालाला असते. तेव्हा त्यांच्याकडून तुम्ही मोफत कंसल्टेशन घेऊ शकता.

अनेक संस्था या वाचकांना अनुवाद, संदर्भसूची तयार करण्यास देखील मदत करतात, तेथील सोयीसुविधांची उपलब्धता पाहून या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. संदर्भासाठी किंवा अभ्यासासाठी काही पुस्तकांच्या काही पानांच्या छायाप्रती मिळू शकतात.

या सुविधा नसतील तर किमान प्रत्येक ग्रंथालय तुम्हाला वाचण्यासाठी पुस्तकं, बसण्यासाठी जागा आणि शांतता या गोष्टी तर देतंच देतं. तेव्हा याचा उपयोग का नाही करून घ्यायचा. तुमच्याच पैशातून उभारलेल्या जागेचा तुम्ही उपयोग करावा हेच तर आम्ही सांगतो.

'वाचन ही चळवळ आहे'

भारतातली सार्वजनिक ग्रंथालयाची रचना ही दोन पद्धतींची आहे. एक थेट सरकारकडून चालवली जाणारी जसं की विद्यापीठ, सरकारी ग्रंथालयं, प्रशासकीय ग्रंथालयं तर दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर चालणारी सेवाभावी ग्रंथालयं.

महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या पाच हजारांच्या वर आहे. इंटरनेटच्या काळातही ग्रंथालयांचे सभासद वाढत आहेत असं परभणी येथील गणेश वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप पेडगावकर सांगतात.

गणेश वाचनालय हे शासनमान्यताप्राप्त 'अ' दर्जाचे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात एकूण 90,000 हून अधिक पुस्तकं आहेत.

आमच्या ग्रंथालयातील जास्तीत जास्त सभासद हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती असतात. इतर सभासद हे कमीच आहेत, असं पेडगावकर खेदाने सांगतात.

"कथा, कादंबऱ्या, कविता वाचणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचं ते नमूद करतात. ललित साहित्य वाचण्यासाठी आमच्याकडे 400 रुपये अनामत रक्कम भरावी लागते आणि 50 रुपये मासिक शुल्क आहे. अशा सभासदांची संख्या 2700 इतकी आहे. तीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ इतकेच लोक सभासद आहेत.

यावरून ग्रंथालयांच्या स्थितीचा तुम्ही अंदाज घेऊ शकतात. गेल्या काही वर्षांमध्ये करमणुकीसाठी वाचण्याचं प्रमाण कमी झालं आहे. व्हीडिओ आणि टीव्ही घरोघरी पोहोचले आहेत. पूर्वी लोक सुहास शिरवळकर, गुरूनाथ नाईक, बाबा कदम यांच्या कादंबऱ्या वाचायला नेत पण आता नवीन पिढीला ही नावं देखील माहीत नाहीत," असं पेडगावकर सांगतात.

ग्रंथालय लोकाभिमुख बनवणं आवश्यक

ग्रंथालय लोकाभिमुख बनवण्यासाठी ग्रंथालयातर्फे विविध उपक्रम घेतले जातात. पुस्तकांवर चर्चा, कवितांचं वाचन, परिसंवाद यांचं आयोजन ग्रंथालयातर्फे केलं जातं.

पण कोव्हिडच्या काळात अर्थातच या गोष्टी कमी झाल्याचं पेडगावकर सांगतात. जनजीवन जसं-जसं पूर्ववत होईल तसे हे कार्यक्रम पुन्हा सुरू होतील आणि पुन्हा लोक ग्रंथालयांशी जोडले जातील, असं पेडगावकर यांना वाटतं.

ग्रंथालयांची गरज ही वाचन संस्कृती वाढवणं आणि टिकवणं यासाठी आहे. वाचन हा संस्कार आहे आणि तो घडवायचा असेल तर ग्रंथालयांची भूमिका अनन्यसाधारण आहे, पण त्याबरोबरच ग्रंथालयांनी देखील काळानुरुप सातत्याने बदलण्याचं आव्हान देखील आमच्यासमोर आहे, असं पेडगावकर सांगतात.

ग्रंथालयशास्त्रातील करिअरच्या संधी

ग्रंथालयशास्त्र हे अधिक व्यापक होताना दिसत आहे, असं अनंत जोशी यांना वाटतं.

या क्षेत्रातील करिअरच्या संधीबाबत बोलताना ते सांगतात की पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पारंपरिक पद्धतीने ग्रंथपाल होण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो, पण त्याचबरोबर नव्या काळात अनेक नवीन करिअर्स या शाखेच्या लोकांसाठी उपलब्ध आहेत.

देशात सरकारी तसंच खासगी संस्थांची इंफर्मेशन सेंटर्स असतात. माहितीच्या स्फोटानंतर माहितीचं नीट आकलन करणाऱ्या लोकांची गरज अधिकच प्रमाणात भासू लागली आहे. ती पुरवण्यासाठी ग्रंथालयशास्त्र आणि माहिती विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची गरज आहे.

पूर्वी या क्षेत्रात केवळ कलाशाखेतील विद्यार्थी येत असत पण आता विज्ञान शाखेतील पदवीधरांना देखील हे क्षेत्र खुणावू लागलं आहे. पदवी पूर्ण झाल्यानंतर ग्रंथालयशास्त्राचा एक वर्षाचा पदवीचा कोर्स असतो (B.Lib) तर एक वर्षाचा पदव्युत्तर कोर्स असतो (M.Lib).

देशातल्या मोठ्या संस्था जसं की IISC, IIT, ISRO या ठिकाणीसुद्धा या क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज असते तिथे देखील तुम्ही ग्रंथपाल किंवा रिसर्च असोसिएट म्हणून काम करू शकता, असं जोशी सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)