साहित्य संमेलनात विदर्भातील साहित्यप्रेमींची आनंदयात्रा

    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, यवतमाळ

"तुमच्याकडे हृषीकेश गुप्तेंचं 'घनगर्द' आहे का?" साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनात झालेल्या गर्दीतून आलेल्या एका आवाजाने लक्ष वेधून घेतलं. संमेलनासाठी आलेल्या वर्षा बासू यांनी या पुस्तकाबद्दल इंटरनेटवर वाचलं होतं, पण पुस्तकाची प्रत काही मिळाली नव्हती. संमेलनाच्या निमित्ताने त्यांना आवडीचं पुस्तक मिळालं होतं. तर सारंग ठाकरे हा युवक व्यक्तिमत्त्व विकासाची पुस्तक शोधत होता. इतकी पुस्तक पाहून तो भारावून गेला होता.

यवतमाळमधल्या साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वीच नयनतारा सहगल यांचं निमंत्रण नाकारण्यावरून साहित्यक्षेत्र ढवळून निघलं. पण या सगळ्या वादांपलीकडे जात यवतमाळमधील साहित्य रसिकांनी संमेलनाला आणि त्यातही ग्रंथ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. लेखक, वाचक, प्रकाशक या सर्वांसाठी हा प्रतिसाद चैतन्यदायी ठरला आहे.

यवतमाळ हा सधन जिल्हा नाही. शेतकरी आत्महत्यांमुळे हा जिल्हा चर्चेत राहतो. यंदा तर दुष्काळाने या जिल्ह्यात ठाण मांडले आहे. अशी परिस्थिती असताना विदर्भातील आणि यवतमाळमधील रसिकांनी ग्रंथ प्रदर्शानाचे कोपरे धुंडाळले.

'घनगर्द'चे लेखक ह्रषीकेश गुप्ते यांना हे प्रदर्शन म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणारं माध्यम वाटतं. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "पुस्तकांची दुकानं ही शहरांपुरती मर्यादित आहेत हे वास्तव आहे. साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनामुळं राज्यातल्या प्रत्येक भागात पोहोचता येतं. लेखक म्हणून मला ग्रंथ प्रदर्शन ही सकारात्मक गोष्ट वाटते. कारण ती मला अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहचवते. यवतमाळला ग्रंथ प्रदर्शनाला मिळणाऱ्या प्रतिसादकडेही मी असंच पाहतो."

महाराष्ट्रातल्या नामांकित प्रकाशन संस्थांसह लहानमोठ्या प्रकाशन संस्थांचे मिळून 214 स्टॉल्स प्रदर्शनात आहेत.

"या स्टॉल्सपैकी दोन स्टॉल्स महाराष्ट्राबाहेरचे आहेत. एक स्टॉल गोव्याचा तर एक नोएडावरुन आला आहे," अशी माहिती आयोजन समितीचे प्रमुख प्राध्यापक सुधीर नरखेडकर यांनी दिली.

संमेलनापूर्वी झालेला वाद, बडोद्याच्या साहित्य संमेलनाचा अनुभव यांमुळे यवतमाळला किती विक्री होईल याबद्दल अनेक प्रकाशकांच्या मनात साशंकता होती. पण मिळणारा प्रतिसाद प्रकाशकांचा उत्साह वाढवणारा आहे.

विदर्भाच्या वेगवेगळ्या भागांती पुस्तकप्रेमी उपस्थित

मौज प्रकाशनाचे मिलिंद जोशी म्हणाले, "गेल्या वर्षी बडोद्याच्या साहित्य संमेलनात फारशी विक्री झालीच नाही. त्याआधी डोंबिवलीला झालेल्या संमेलनात फारसं आशादायक चित्र नव्हतं. यवतमाळमधला प्रतिसाद मात्र सुखावणारा आहे."

रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर आणि पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे यांनीही हाच मुद्दा मांडला.

रोहन चंपानेरकर म्हणाले, "यवतमाळ असो किंवा महाराष्ट्रातली इतर लहान शहरं, साहित्यविषयक पुस्तकं मिळतील असं एकही सुसज्ज दुकान नाही. पुणे-मुंबईत ती सोय असते. त्यामुळे इथं केवळ यवतमाळच नाही, तर विदर्भातील वेगवेगळ्या भागातूनही पुस्तकप्रेमी येत आहेत."

पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे यांच्या मते ग्रंथप्रदर्शातून वाचनाविषयक जाणिवा समृद्ध होतात.

"मी केवळ साहित्य संमेलनच नाही तर जागतिक पुस्तक मेळावा, कोलकात्याचा 'बोई मेला' अशा ठिकाणच्या मेळाव्यातही सहभागी होतो. विक्रेते हे नेहमी खप असलेली पुस्तकंच विक्रीसाठी ठेवतात. संमेलनातल्या ग्रंथ प्रदर्शनात वाचकांना अनेक विषयावरची पुस्तकं पहायला मिळतात. यवतमाळच्या संमेलनातूनही ही गोष्ट साध्य होईल," असं ते म्हणाले.

ग्रंथप्रदर्शनाने मिळाली पुस्तकं

प्रकाशकांच्या बोलण्यातून जी सकारात्मकता जाणवत होती, ती प्रदर्शनात फिरतानाही जाणवली.

नेहमी आणि हमखास खपणाऱ्या छावा, स्वामी, मृत्युंजय तसंच 'पुलं'च्या पुस्तकांची मागणी होतीच, पण नव्याने मराठी साहित्यविश्वात आलेल्या कलाकृतींचीही हमखास मागणी होत होती.

साहित्य संमेलनाला आलेल्या वर्षा बासू म्हणाल्या, "मी या 'घनगर्द' पुस्तकाबद्दल फेसबुकवर चर्चा ऐकली होती. यवतमाळमध्ये हे पुस्तक मिळत नव्हतं. ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्तानं मला ते मिळालं. अनेकदा पुस्तक परीक्षण, फेसबुक किंवा अन्य माध्यमातून पुस्तकांबद्दल माहिती मिळते. पण प्रत्येक वेळी ती मिळतातच असं नाही."

दुसऱ्या एका स्टॉलवर विशीतला एक मुलगा बराच वेळ काहीतरी शोधत होता. कोणतं पुस्तक घेणार आहे, असं विचारल्यावर त्यानं सांगितलं, "मी नेपोलियन हिलचं 'विचार करा आणि श्रीमंत व्हा,' हे पुस्तक घेणार आहे."

सारंग ठाकरे अशी स्वतःची ओळख त्यानं सांगितली. "मी पहिल्यांदाच या संमेलनाला आलो आहे. इतकी पुस्तकं बघून एकदम वेगळं वाटतंय. मी लष्कर भरतीची तयारी करतोय. त्यामुळं मी व्यक्तिमत्त्व विकासाची पुस्तकं खरेदी करणार आहे," सारंगनं सांगितलं.

डॉक्टर स्वाती पाटील आणि डॉ. स्नेहा राठोड यांनीही वेगवेगळ्या विषयांवरची इतकी पुस्तकं पहिल्यांदाच पाहिली, असं सांगितलं.

"दुकानात खूप मर्यादित पर्याय असतात. निवड करायला फार वाव नसतो. त्यामुळं आमच्याकडे जी पुस्तकं नाहीयेत, ती आवर्जून घेऊन जाणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरेंचे लेख आम्ही नेहमी वाचायचो. पण त्यांची पुस्तकं नव्हती वाचली. ती नक्की खरेदी करू."

प्रदर्शनातली आर्थिक उलाढाल नेमकी किती?

ही गर्दी पाहिल्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाची आर्थिक उलाढालही लक्षणीय होत असेल असा विचार मनात आला.

प्रकाशकांनी ग्रंथ प्रदर्शनाच्या या बाजूवरही प्रकाश टाकला. मुळात ग्रंथ प्रदर्शनात प्रत्येक प्रकाशकाचा जो खप होतो त्याची अधिकृत आकडेवारी ठेवण्याची कोणतीही यंत्रणा संमेलनामध्ये नसते. त्यामुळं इथं होणाऱ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जे आकडे छापले जातात, त्याला वास्तविकतेचा फारसा आधार नसतो, असं मिलिंद जोशी, रोहन चंपानेरकर आणि अरुण जाखडे यांनी सांगितलं.

"अर्थात, साहित्य संमेलनाकडे केवळ आर्थिक चष्म्यातून पाहणं योग्य नाही. ही एक संधी असते वाचकांसोबत स्वतःला जोडून घेण्याची. यानिमित्तानं आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या वाचकांपर्यंत पोहोचता येतं. सकस साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणं, हीसुद्धा प्रकाशक म्हणून आमची जबाबदारी आहे," असं रोहन चंपानेरकर यांनी म्हटलं.

पद्मगंधाचे अरुण जाखडे यांनी सांगितलं, "जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये विक्रीची आकडेवारी नीट ठेवली जाते. नॅशनल बुक ट्रस्टकडून प्रत्येक स्टॉल वर एक फॉर्म दिला जातो शेवटच्या दिवशी या फॉर्ममध्ये विक्रीचे तपशील भरले जातात. मराठी साहित्य संमेलनांमध्ये अशी अधिकृत कोणतीही नोंद ठेवली जात नाही त्यामुळे प्रकाशक जो आकडा सांगतो तोच ग्राह्य धरला जातो."

"अर्थात विक्रीचे आकडे जितके महत्त्वाचे असतात तितक्याच इतर गोष्टींचा विचार होणंही गरजेचं असतं. प्रकाशकांना माध्यमांमधले जाहिरातींचे दर परवडत नाहीत. संमेलनातील प्रदर्शनामुळं नवीन पुस्तकांची जाहिरात होते. महाविद्यालयं, वाचनालयं पुस्तकांची मागणी करतात. त्यामुळं पुढच्या व्यवसायाची पेरणी होते," असंही अरुण जाखडे यांनी म्हटलं.

वाचनाची भूक

लेखक प्रणव सखदेव यांनी बीबीसी मराठीसोबत संवाद साधताना म्हटलं, "यवतमाळमध्ये लोक ग्रंथप्रदर्शनाला गर्दी करत असतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. विदर्भ, कोकण अशा भागांत अनेक ठिकाणी पुस्तकांची उत्तम दुकानच नाहीत, खरंतर पुण्या- मुंबईपेक्षा महाराष्ट्रातील जी छोटी शहरं आहेत तिथल्या मुलांना वाचनाची, साहित्य समजून घेण्याची भूक अधिक आहे. ग्रंथ प्रदर्शनांमुळं ही गरज भागते. मी थोडंसं उपहासानं असंही म्हणेन की गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनामुळं साध्य झालेली ही एकमेव सकारात्मक गोष्ट आहे."

"संमेलनावर खर्च करणाऱ्या साहित्य महामंडळानं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पुस्तकाचं एक तरी दुकान उभं करण्यासाठी प्रयत्न करावा," अशी सूचनाही सखदेव यांनी केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)