You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साहित्य संमेलन : अरुणा ढेरेंच्या भाषणाचं स्वागत; पण...
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, यवतमाळ
"झुंडशाहीपुढे प्रत्येक वेळी नमते घेणार का," असा थेट प्रश्न 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित केला. पण ढेरे यांच्या भाषणानंतरही नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणावरून उठलेलं वादंग शमलेलं नसून अनेक साहित्यिकांनी त्यांची बहिष्काराची भूमिका कायम ठेवली आहे.
साहित्य संमेलनाच्या काही दिवस आधीच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सेहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यावरून तीव्र पडसाद उमटले. यावर ढेरे अध्यक्षीय भाषणातून काय भूमिका घेतात याची उत्सुकता होती. ढेरे यांनी नयनतारा सहगल यांचं आमंत्रण मागे घेणे असमर्थनीय होतं, अशी परखड भूमिका घेतली.
नयनतारा सहगल यांचं आमंत्रण रद्द केल्याचा निषेध म्हणून अनेक साहित्यिकांनी यापूर्वीच संमेलनावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यानंतर आयोजकांनी बहिष्कार मागे घेण्याचं आवाहन केलं होतं.
ढेरेंनी संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडलेल्या भूमिकेकडे हे साहित्यिक कसं पाहतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला.
ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर म्हणाल्या, "अरुणाताईंचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा जो अभ्यास आहे त्याला अनुसरून त्यांनी भूमिका मांडली. अध्यक्षांकडून संयत पण कणखर उत्तर आवश्यक होतं. तसंच त्यांनी आपल्या भाषणातून दिलं. वैयक्तिकरीत्या मला त्यांचे भाषण आवडलं. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी गेल्या संमेलनातही सरकारला खडे बोल सुनावले होते. आताही त्यांनी तशीच भूमिका घेतली आहे."
संमेलनातील एका कार्यक्रमात प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार होती. मात्र त्यांनी संमेलनावर बहिष्कार घातला.
मात्र अरुणा ढेरे यांच्या भाषणानंतरही संमेलनावरील बहिष्काराची भूमिका कायम असल्याचं गणोरकर यांनी स्पष्ट केलं.
'लेखनाचा अनादर हे पाप म्हणून बहिष्कार टाकला'
ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर देखील बहिष्काराच्या निर्णयावर ठाम आहेत.
"देशातील सर्व व्यवस्था झुंडशाहीपुढे मान टाकताना दिसत आहेत. त्याची प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक होतं. अरुणा ढेरेंची प्रकृती सात्विक आहे. आततायी बोलण्याचा त्यांचा स्वभाव नाही. अशी व्यक्ती जेव्हा अतिशय तीव्र शब्दांत टीका करते तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे, हे नक्की. अरुणा ढेरेंच्या भाषणाने गेलेली अब्रू सांभाळली गेली. त्यामुळे त्यांचं भाषण निश्चितच स्वागतार्ह आहे."
कुबेर म्हणाले, "पण यामुळे माझा बहिष्काराचा निर्णय बदलणार नाही. मी स्वतःला लेखकांचा एक प्रतिनिधी मानतो. लेखनाचा अनादर हे पाप आहे. म्हणून मी बहिष्काराची भूमिका घेतली."
"नयनतारा सहगल या डाव्या विचारांच्या आहेत म्हणून त्यांचं निमंत्रण रद्द केल्याचे म्हटलं गेलं. मुळात डावा-उजवा हा भेद गौण आहे. आपण एखाद्याला बोलावून त्याचं आमंत्रण रद्द करणं चुकीचं आहे. नयनतारा यांच्या भूमिका कोणापासून लपून राहिलेल्या नव्हत्या," असं ते म्हणाले.
"त्यांनी आणीबाणीच्या वेळेस त्यांच्या बहिणीलाही विरोध केला होता अशा लेखिकेचा अपमान होत असेल तर इतर लेखकांवरही ही वेळ येऊ शकते त्यामुळेच वैयक्तिक पातळीवर एक लेखक म्हणून संमेलनावरचा माझा बहिष्कार कायम आहे," असं ते म्हणाले.
अरुणाताईंचं अभिनंदन पण...
कवी आणि लेखक बालाजी सुतार म्हणाले, "अरुणाताईंचं नितळ आणि सुंदर भाषणाबद्दल अभिनंदन करायला हवं."
"नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्याचा स्पष्ट शब्दात निषेध केला ते नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यांनी आपल्या भाषणात झुंडशाहीचा निषेध केला. मात्र इथे 'झुंडशाही' म्हणताना त्यांना मनसे किंवा नयनतारा यांच्या नावाला विरोध करणारी शेतकरी संघटना अपेक्षित असावी. सहगल यांचं आमंत्रण मनसे किंवा शेतकरी संघटना यांमुळे रद्द झालं नाहीये. ज्या अन्य शक्ती त्यामागं कार्यरत आहेत, तिथपर्यंत अरुणा ढेरेंनी पोहोचायला हवं होतं. मात्र संमेलनाच्या व्यासपीठावरून त्या जे बोलल्या तेदेखील पुरेसं आहे," असं ते म्हणाले.
संयत रूपातील दुर्गाबाईंचं दर्शन
एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले, "अरुणा ढेरेंचं भाषण अतिशय उत्तम होतं. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या जात होत्या, त्याला अनुसरून भूमिका घेत त्यांनी भाषण केलं. अत्यंत संयतपणे त्यांनी जे सांगायचं होतं, ते ठणकावून सांगितलं. त्यांचा स्वभाव आक्रमक नाही. त्यांच्या भाषणातून संयत रूपातल्या दुर्गाबाईंचं दर्शन घडलं."
कार्यक्रमांमध्ये फारसे बदल नाहीत
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा विद्या देवधर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "काही साहित्यिकांनी बहिष्काराची भूमिका घेतली असली तरी कार्यक्रमांमध्ये फारसे बदल होणार नाहीत."
संमेलनातील नियोजित कार्यक्रमांमध्ये गिरीश कुबेर, प्रभा गणोरकर, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, श्रीकांत बोजेवार, बालाजी सुतार, चंद्रकांत वानखेडे आणि अन्य साहित्यिकांचा समावेश होता. नयनतारा सहगलांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर या सर्वांनी संमेलनावर बहिष्कार टाकला.
"जिथं कार्यक्रमाचे मुख्य पाहुणेच येणार नसतील, तर तो कार्यक्रम रद्द करावा लागेल. काही कार्यक्रयांमध्ये जेवढे पाहुणे सहभागी होतील, त्यांच्या सोबत कार्यक्रम पार पाडला जाईल. मात्र ज्या कार्यक्रमांचे समन्वयक अनुपस्थित राहणार आहेत, त्या कार्यक्रमांसाठी अन्य समन्वयकांची निवड करण्यात आली आहे," असं त्या म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)