शमीमा बेगमः 'जिहादी दुल्हन'ची दहशतवादाविरोधात विरोधात लढण्याची तयारी

शमीमा बेगम

"दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा आयुष्यभर पश्चाताप राहील. त्यामुळे आता दहशतवादाविरोधात लढण्यासाठी ब्रिटनची मदत करू इच्छित आहे," असं इस्लामिक स्टेट (IS) ची 'जिहादी दुल्हन' शमीमा बेगमनं म्हटलंय.

शमीमा बेगमनं बीबीसीशी बोलताना म्हटलं की, 'समाजाच्या कामाला' मी येऊ शकते आणि त्यामुळे मला सीरियातील रिलिफ कॅम्पमध्ये 'सडत' ठेवणं अयोग्य आहे.

22 वर्षीय शमीमा बेगम हिच्यावर कथित इस्लामिक कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेट (IS) मध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे. मात्र, हे आरोप शमीमा कायम फेटाळत आलीय. ब्रिटनचे तत्कालीन गृहमंत्री साजिद जावेद यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या आधारावर शमीमा बेगमची ब्रिटनचं नागरिकत्व काढून घेतलं होतं. जावेद हे अद्यापही त्या निर्णयावर ठाम आहेत.

15 वर्षांची असताना शमीमा बेगम लंडनमधील इतर दोन मुलींसोबत ब्रिटन सोडून सीरियात गेली होती. तिथं जाऊन इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाली होती. शमीमा बेगम बांगलादेशी वंशाची ब्रिटिश नागरिक आहे.

शमीमानं तिथं डच दहशतवाद्याशी लग्न केलं आणि तीन वर्षांहून अधिक काळ ती इस्लामिक स्टेटमध्ये राहिली. 2019 मध्ये सीरियातील शरणार्थींच्या शिबिरात शमीमा गरोदर अवस्थेत सापडली. बाळंतपणानंतर तिच्या मुलाचा न्यूमोनियानं मृत्यू झाला. शमीमानं सांगितल्याप्रमाणे, तिच्या आणखी दोन मुलांचा याआधी मृत्यू झाला आहे.

शमीमाने 2017 साली इस्लामिक स्टेटद्वारे मँचेस्टर एरेनावर केलेल्या हल्ल्याबाबत म्हटलं होतं की, ते हल्ले इस्लामिक स्टेटवर केलेल्या हल्ल्यांप्रमाणे होते. तिने या दहशतवादी हल्ल्याला 'बदला' म्हटलं होतं. या हल्ल्यात 22 लोकांचा जीव गेला होता.

'मला कायम स्वत:बद्दल तिरस्कार राहील'

जगभरात नरसंहार आणि हत्या करणाऱ्या संघटनेत सहभागी झाल्याबाबत प्रश्न बीबीसीचे प्रतिनिधी जोश बेकर यांनी विचारला असता शमीमा म्हणाली की, "आता याबाबत विचार करून मला त्रास होतो. त्या निर्णयामुळे माझा मलाच तिरस्कार वाटतो."

बीबीसी साऊंड्स आणि बीबीसी 5 लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत शमीमा बेगमनं म्हटलं की, आता केवळ खऱ्या भावनांबद्दल बोलायलाच बरं वाटतं.

शमीमा बेगम

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, शमीमा बेगम

इस्लामिक स्टेटबाबत तिच्या बदललेल्या भूमिकेबाबतही बीबीसीनं प्रश्न विचारला. तेव्हा ती म्हणाली, "इस्लामिक स्टेटबाबतचं मत बरंच आधी बदललंय. पण आता माझं खरं मत व्यक्त करणंच मला योग्य वाटतं."

शमीमानं म्हटलं की, "जर मला ब्रिटनमध्ये परतण्याची परवानगी मिळाली, तर ब्रिटनमधील लोकांना सीरियात बोलावण्याच्या इस्लामिक स्टेटच्या रणनितीबाबत सरकारला सल्ला देऊ शकते. कट्टरतावादी बनण्याची इच्छा असलेल्यांशी इस्लामिक स्टेट कशी चर्चा करतं, याच्या क्लृप्त्याही सरकारला सांगू शकेन."

असं करणं ही माझी 'जबाबदारी' असल्याचं शमीमा सांगते. तसंच, आणखी कुणाही मुलीने आपलं आयुष्य असं वाया घालवू नये, असंच आपल्याला वाटत असल्याचं शमीमा सांगते.

बीबीसीच्या कार्यक्रमात सीरियातून सहभागी

बुधवारी (15 सप्टेंबर) शमीमा बेगमने आयटीव्हीच्या 'गुड मॉर्निंग ब्रिटन' कार्यक्रमात चर्चा केली आणि त्यावेळी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासमोर थेट प्रस्ताव सादर केला की, दहशतवादाविरोधातल्या लढाईत मी देशाची 'संपत्ती' बनू इच्छित आहे.

"दहशतवादी कारवाया करण्यात मी सहभागी असल्याचा 'कुठलाच पुरावा' नाहीय. माझं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करण्यासाठीही मी तयार आहे," असंही शमीमानं म्हटलं.

शमीमा बेगम

फोटो स्रोत, SOPA IMAGES VIA GETTY IMAGES

"मला माहित आहे, मी काहीही म्हटलं तरी लोक मानणार नाहीत की मी आता बदललीय. विश्वास ठेवा की, मी लोकांची मदत करू इच्छित आहे. ज्यांच्या हृदयात थोडीशी तरी दया, करूणा आणि सहानुभूती आहे, त्यांना मनापासून सांगू इच्छिते की, मला सीरियात पाऊल ठेवल्यानंतर माझ्या निर्णयाबद्दल पश्चाताप वाटतो. आयुष्यभर हा पश्चाताप राहील," असंही ती म्हणाली.

'मला फक्त एक संधी द्या'

शमीमा बेगम म्हणते, "मी जे काही केलंय, त्यामुळे इतरांपेक्षा माझ्याबाबत मला अधिक तिरस्कार आहे. मी फक्त एवढंच म्हणू शकते की, 'आय अॅम सॉरी' आणि मला आणखी एक संधी द्यावी."

"इस्लामिक स्टेटमध्ये परतण्यापेक्षा मरणं पसंत करेन. इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्याबाबत मी कुणालाच सांगितलं नाही, हाच एक माझा गुन्हा आहे," असं शमीमा सांगते.

शमीमा बेगम पुढे म्हणते की, "न्यायालयात जाऊन आरोपांचा सामना करून, त्यांचं खंडन करण्यास मी तयार आहे. मला माहित आहे की, इस्लामिक स्टेटमध्ये मी आई आणि पत्नी होण्यापलिकडे काहीच केलं नाहीय."

ब्रिटनमध्ये परत घेण्यास सरकारचा नकार

ब्रिटनचे विद्यमान आरोग्यमंत्री आणि यापूर्वी गृहमंत्री राहिलेले साजिद जावेद यांनी म्हटलंय की, "शमीमा बेगमला परत येऊन नागरिकत्त्व मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढू देण्याची अजिबात शक्यता नाहीय."

शमीमा बेगम

'गुड मॉर्निंग ब्रिटन'शी बोलताना ते म्हणाले, "ब्रिटनचं नागरिकत्त्व तिच्याकडून काढून घेण्याचा निर्णय नैतिक रुपानं अगदी बरोबर होता. कायद्यानेही योग्य आणि ब्रिटनच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचाही होता."

साजिद जावेद म्हणाले की, "मी याच्या खोलात जात नाही. मात्र, हे नक्की की, मी पाहिलं, ते तुम्ही पाहिलं नाहीय. जे मला माहित आहे, ते तुम्हाला माहित असतं, तर तुम्हीही हाच निर्णय घेतला असतात, याबाबत माझ्या मनात शंका नाही."

तर गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, सरकारचं सर्वात मोठं प्रधान्य देश आणि जनतेची सुरक्षा आहे.

माजी गृहमंत्री साजिद जावेद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी गृहमंत्री साजिद जावेद

'लिबर्टी' या मानवाधिकार संघटनेनं शमीमा बेगमचं नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयाला 'अत्यंत वाईट उदाहरण' म्हटलं होतं आणि लोकशाही सरकारांनी निष्पक्ष सुनावणीच्या अधिकार काढून घ्यायला नको, असंही म्हटलं होतं.

शमीमा बेगमसोबत सीरियात जाणारी कदीजा सुल्ताना ही कथितरित्या एका बॉम्बस्फोटाच्या घटनेत मृत्युमुखी पडली. शमीमासोबतची तिसरी मुलगी अमीरा अबासे हिच्याबाबत अद्याप काहीही कळलं नाहीय.

शमीमानं याआधीच संगितलं होतं की, सीरियातील सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं आणि तिथं तिला एका तुरुंगात ठेवून त्रास दिला जात होता.

('आय अॅम नॉट अ मॉन्स्टर' पॉडकास्टच्या जोश बेकरने बीबीसी साऊंड्स आणि बीबीसी रेडिओ 5 लाईव्हमधील पॉडकास्ट सीरीजमध्ये शमीमा बेगमसोबत चर्चा केली.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)