You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींनंतर गुजरातमध्ये कोणताही मुख्यमंत्री का टिकू शकला नाही?
- Author, बीबीसी गुजराती टीम
- Role, नवी दिल्ली
भाजप नेते विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अहमदाबादपासून दिल्लीपर्यंत चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर गुजरातचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा झाली.
भूपेंद्र पटेल हे गुजरात विधिमंडळाचे नेते म्हणून निवडले गेल्याची माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं की, "भूपेंद्र पटेल लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. गांधीनगरमध्ये भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक झाली. त्यात पटेल यांचं नाव जाहीर करण्यात आलं."
रुपाणी यांच्या राजीनाम्याची बातमी आल्यानंतर एकीकडे यामागील कारणांबाबत उलटसुलट चर्चांना तोंड फुटलं, तर दुसरीकडे अजून गुजरातला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या मुख्यमंत्र्याचा पर्याय सापडलेला नाही का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी तीन वेळा सलग गुजरातचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर आक्रमक व रोमहर्षक शैलीत प्रचार करून मोदींनी भारताच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत मजल मारली.
पण ते पंतप्रधान झाल्यापासून अगदी कालपर्यंत (11 सप्टेंबर) गुजरातमध्ये वारंवार राजकीय उलथापालथ होताना दिसते आहे.
या पार्श्वभूमीवर, गुजरातला अजून मोदींचा पर्याय मिळालेला नाहीये का, असा प्रश्न स्वाभाविकपणे समोर येतो.
'बीबीसी गुजराती'ने या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गुजरातमधील राजकारणाचा कानोसा घेणाऱ्या काही विश्लेषकांशी संवाद साधला.
सध्याचा काळ, भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि आधीच्या मुख्यमंत्र्यांशी केली जाणारी तुलना, यांमुळे गुजरातमध्ये राजकीय नेतृत्वाबाबत अस्थिरता दिसून येते आहे, असं मत राजकीय विश्लेषक जतीन देसाई यांनी व्यक्त केलं.
ते म्हणतात, "मोदींनी त्यांच्या कार्यकाळादरम्यान स्वतःची 'विकासपुरुष' ही प्रतिमा यशस्वीरित्या निर्माण केली होती. शिवाय, तत्कालीन केंद्रीय नेतृत्वानेही त्यांच्या या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न केला नाही."
"भाजपचं तत्कालीन केंद्रीय नेतृत्व आजच्या पक्षश्रेष्ठींपेक्षा अधिक लोकशाहीवादी होतं, पण मे 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले, तेव्हापासून त्यांच्या विकासवादी नेत्याच्या प्रतिमेशी स्पर्धा करू शकणारा दुसरा कोणी नेता गुजरातमध्ये निर्माण झालेला नाही."
मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या कार्यकाळात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासंदर्भात आणि गुजरातमध्येही नेतृत्वाच्या बाबतीत कोणतंही मोठं बंड झालेलं दिसत नाही, याकडे देसाई लक्ष वेधतात.
"अशी बंडाची वेळ कधी आलीच असेल, तरी त्या व्यक्तीला आणि बंडाच्या प्रयत्नाला मोदींनी तत्काळ मोडून काढलं होतं. पण त्यांच्या नंतर मुख्यमंत्री झालेल्या इतर दोन नेत्यांमध्ये पक्षांतर्गत बंड दडपण्याची क्षमता दिसली नाही," असं ते म्हणतात.
'इतरांचं स्थान उंचावणं मोदींना रुचत नाही'
राजकीय विश्लेषक डॉक्टर हरी देसाई यांच्या मते, कोणी आपल्या अधिकारक्षेत्रात बळकट स्थान निर्माण करावं, अशी खुद्द मोदींचीच इच्छा नाही.
ते म्हणतात, "मोदी कोणालाही आपल्या अधिकारक्षेत्रात स्थिरस्थावर होऊ देत नाहीत, याचा पुरावा म्हणून विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याकडे पाहता येईल. कोणत्याही नेत्याची प्रतिमा पक्षासाठी अडचणीची ठरू नये, असा मोदींचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री बदलण्याचे डावपेच वापरले आहेत."
"इतर कोणाचं राजकीय स्थान आपल्यासाठी आव्हानात्मक ठरू नये, यासाठी इंदिरा गांधीसुद्धा त्यांच्या कार्यकाळात हा डावपेच वापरत असत. सत्ता राखणारे हात सतत बदलते ठेवायचे, असं त्यांचं धोरण होतं. भाजप आणि मोदीसुद्धा आता हेच करत आहेत."
गुजरातमधील राजकारणात 'बंडखोरी'
गेली 20 वर्षं गुजरातमधील राजकारणात घडलेल्या घडामोडींचा परिणाम देशभर पाहायला मिळाला आहे. 3 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी राजीनामा दिला.
आता कोण मुख्यमंत्री होईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, तेव्हा भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करून त्यांना दिल्लीहून गुजरातला पाठवलं.
नरेंद्र मोदी यांना 'विकासपुरुष' म्हणून प्रस्थापित करणाऱ्या प्रक्रियेची ही सुरुवात होती. यानंतर अनेक अडचणी व राजकीय वावटळींना सामोरं जात नरेंद्र मोदी यांनी 2014 सालापर्यंत गुजरातमधील राजकारणात शिखर गाठलं.
'गुजरात मॉडेल' आणि 'विकासपुरुष' हे शब्दप्रयोग याच काळात वापरात आले. काँग्रेस पक्षाबद्दल लोकांमध्ये खदखदणारा असंतोष व नाराजीची भूमिका मोदींच्या प्रतिमानिर्मितीला खतपाणी घालणारी ठरली.
अशा रितीने 2014 साली भारतीय मतदारांनी दीर्घ काळानंतर भाजपच्या रूपात एकाच पक्षाला पूर्ण बहुमत देऊन केंद्रात सरकार स्थापण्याची संधी दिली.
नरेंद्र मोदी यांच्या नंतर आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या गुजरातच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या, पण पदभार स्वीकारल्यावर दोनच वर्षांनी, 1 ऑगस्ट 2016 रोजी वाढत्या वयाचं कारण देऊन 75 वर्षीय आनंदीबेन यांनी राजीनामा दिला.
वास्तविक पक्षांतर्गत बंडामुळे आणि पाटीदार समुदायाच्या आंदोलनामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
गुजरातमधील पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, हे यानंतर अनेक दिवस स्पष्ट झालं नव्हतं. मग नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी खुद्द अमित शाह गुजरातला आले. नितीन पटेल पुढील मुख्यमंत्री असतील, असं अनेक जाणकारांना वाटत होतं. पण भाजपने विजय रुपाणी यांच्याकडे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली.
रुपाणी यांचं सरकार कुठपर्यंत तग धरेल, याबद्दल कायमच साशंकता व्यक्त केली जात होती. डिसेंबर 2017मध्ये ही शंका प्रत्यक्षात येण्याची चिन्हं होती. पण मोदी व शहा यांनी अखेर रुपाणी यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री केलं.
यानंतरही पक्षांतर्गत कलह सुरूच होता आणि उप-मुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याशी मुख्यमंत्र्यांचा संघर्षही होत होता, त्यामुळे रुपाणी यांना लवकरच पद सोडावं लागेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.
शेवटी 11 सप्टेंबर 2021 रोजी मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच रुपाणी यांनी राजीनामा दिला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)