You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींचा 71 वा वाढदिवस भव्यदिव्य साजरा करण्यामागचे राजकीय अर्थ काय?
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं भाजपने तीन आठवडे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशभरात त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी केलीय. हे कार्यक्रम आजपासून (17 सप्टेंबर) 7 ऑक्टोबरपर्यंत चालतील.
इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात सर्वप्रथम प्रकाशित करण्यात आलेल्या या वृत्तानुसार सामान्य नागरिकांना नरेंद्र मोदींचे फोटो असलेल्या 14 कोटी प्लास्टीकविरहित राशन बॅगचं वाटप केलं जाईल.
'धन्यवाद मोदीजी' अशी 5 कोटी पोस्टकार्ड पाठवली जातील. सोशल मीडियावरही या कार्यक्रमांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जाईल.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या काळात रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जाईल, मोफत आरोग्य तपासणी शिबिरं होतील, लसीकरण मोहिमेला अधिक वेग दिला जाईल. तसंच इतरही अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल, असंही अरुण सिंह म्हणाले.
उत्तर प्रदेशात आगामी काळात महत्त्वाच्या निवडणुका होत आहे. कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत सरकारी उपाययोजना, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं होणारे मृत्यू या विषयांवर नरेंद्र मोदी सरकारवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड टीका झाली आहे. तसेच 'इंडिया टुडे'च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणात नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटल्याचे संकेत मिळाले आहेत. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.
भारतात आतापर्यंत कोव्हिडनं चार लाख 40 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी प्राण गमावले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही भारतातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पण या सर्वेक्षणाचा विचार करता केवळ 24 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्यासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये हे प्रमाण 66 टक्के आणि या जानेवारी 38 टक्के एवढं होतं.
या सर्वेक्षणानुसार 54 टक्के नागरिकांनी मोदी सरकारची कामगिरी चांगली आणि उत्तम असल्याचं म्हटलं आहे. जानेवारीमध्ये हाच आकडा 74 टक्के होता.
इंडिया टुडेच्या या सर्वेक्षणापूर्वी मे मध्ये झालेल्या इतर दोन सर्वेक्षणांमध्येही नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटल्याचा दावा करण्यात आला होता.
'पंतप्रधानांची लोकप्रियता वाढली आहे'
भाजपा नेते अरुण सिंह यांनी इंडिया टुडेचं सर्वेक्षण चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. "पंतप्रधानांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. आम्ही जनतेचं सर्वेक्षण पाहत आहोत. आमच्या निवडणुकांचे निकालही येत आहेत. स्थानिक पातळीवरही भाजपला मोठं यश मिळत आहे," असं सिंह बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.
राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कामाबाबत भाजपच्या केंद्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील कार्यालयांमध्ये प्रदर्शनाचं आयोजन केलं जाईल. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय आणि पुरंदेश्वरी यांचीही महत्त्वाची भूमिका असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मंत्रिमंडळात अनेक बदल केले आहेत. एका नव्या टीमसह सरकार लोकांसमोर आणणं, हा त्यामागचा उद्देश होता, असं म्हटलं जात होतं.
तीन आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमांबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार राधिका रामसेशन यांनी यापूर्वीच्या पंतप्रधानांचे वाढदिवस कसे साजरे व्हायचे, याच्या आठवणींना उजाळा दिला.
"मनमोहन सिंग यांचा वाढदिवस कधी आहे, हेच कळत नव्हतं. तर अटलजीदेखील अगदी छोट्या प्रमाणात रक्तदान शिबिरात रक्त देऊन वाढदिवस साजरा करायचे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत नव्हते," असं राधिका सांगतात.
'स्वतःच्या प्रतिमेबद्दल मनात शंका असल्याचे संकेत'
राजकीय विश्लेषक कुमार दुबे यांनी या कार्यक्रमांच्या टायमिंगकडे इशारा केला आहे.
"सध्या अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. शेतकरी आंदोलन शिगेला पोहोचलं आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. यापूर्वी कधीही पेट्रोल किंवा डिझेल एवढं महाग झालेलं नाही. अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना (पंतप्रधान नरेंद्र मोदींना) पुन्हा एकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडता यावी म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे," असं ते म्हणाले.
"पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती केंद्रीत असलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून 21 दिवस जर वाढदिवस साजरा केला जात असेल, तर त्यावरून त्यांना स्वतःच्या प्रतिमेबाबत मनात शंका असल्याचं स्पष्ट होतं. इंडिया टुडेच्या सर्वेक्षणातील तथ्य समोर आली नसती तरीही हे घडलंच असतं. कारण सध्या समस्या अत्यंत बिकट आहेत," असं अभय दुबे म्हणाले.
कोव्हिड कंट्रोल
कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये कोव्हिडची परिस्थिती हाताळण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थही नाराज होते. पक्षातही योगी सरकारच्या विरोधात नाराजीचे सूर उमटले होते.
कोव्हिडचे रुग्ण ऑक्सिजन आणि आयसीयू बेडच्या अभावी कशाप्रकारे तडफडून जीव सोडत आहेत, याचं चित्र भारतासह संपूर्ण जगभरात पोहोचलं.
मात्र अरुण सिंह यांच्या दाव्याचा विचार करता, "उत्तर प्रदेशात योगीजींनी कोव्हिड असतानाही चौथ्या दिवशी बाहेर पडत, प्रत्येत जिल्ह्याचा दौरा केला. आशा वर्करना कामाला लावलं. घरोघरी औषधी पोहोचवली. उत्तर प्रदेशात जितक्या वेगानं परिस्थिती नियंत्रणात आली, तेवढ्या वेगानं कुठंही परिस्थिती निवळली नाही," असा दावा अरुण सिंग यांनी केला आहे.
तीन आठवडे चालणारा कार्यक्रम म्हणजे "सेवा आणि समर्पण अभियान" असल्याचं अरुण सिंह म्हणाले. "पंतप्रधानांनी गरिबांना राशन देण्याचं काम केलं आहे. ऑक्सिजनसाठी 24 तास काम केलं आहे. भूमी, जल, वायू तिन्ही माध्यमांद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. पंतप्रधान करत असलेल्या कामावर, लोकांना पूर्ण विश्वास आहे," असंही ते म्हणाले.
कोणते कार्यक्रम होणार?
"ज्यांना लस मिळाली आहे, ज्यांना राशन मिळतं, ज्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला आहे, ज्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला, ज्यांच्या घरी नळानं पाणी येतं, ज्यांची खाती उघडून पैसे पोहोचवले आहेत ते पतप्रधानांचे आभार मानतील. त्यात पंतप्रधानांनी आमच्या कल्याणासाठी ही कामं केली असल्याचं ते सांगतील," असं ते म्हणाले.
या कार्यक्रमांसाठी पक्षाचे कार्यकर्ते एका ठिकाणी गोळा होणार नाहीत, किंवा सभांसारखे मोठे, कार्यक्रमही होणार नाही. सर्व कार्यक्रम कोव्हिड नियमांचं पालन करून होतील, असंही अरुण सिंह यांनी स्पष्ट केलं.
"संकट कोणीही टाळू शकत नाही. पण संकटामध्ये पक्ष, संघटना, सरकार कशाप्रकारे काम करातात, ते जनता पाहते," असं ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)