विजय रुपाणी यांच्याकडे अमित शहांचे पूर्वीचे सेक्रेटरी का काम करायचे?

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे रुपाणी यांनी आपलं राजीनाम्याचं पत्र सोपवलं.

राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी यांनी माध्यमांशी संवादही साधला.

"राजीनाम्यासाठी कुणाचाही दबाव नव्हता. मी माझ्या मर्जीने राजीनामा दिला आहे, आता संघटनेसाठी काम करण्याची इच्छा आहे. मला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद," असं रुपाणी यावेळी म्हणाले.

"संघटनेतील कुणासोबतच माझी तक्रार नाही. आम्ही संघटनेत एकत्र मिळूनच काम केलेलं आहे. नवं नेतृत्व तयार करण्याची भारतीय जनता पक्षात परंपरा आहे," असं रुपाणी यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीत भाजपला जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला. यामुळे मला काम करत राहण्यासाठी मोठी ऊर्जा मिळाली. पक्षासह जनतेचं आतापर्यंत मला मोठं सहकार्य मिळालं."

"लसीकरणाच्या कार्यक्रमातही गुजरात पुढे राहिला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रशासनाला जाणून घेण्यासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. जे पी नड्डा यांचंही सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. गुजरातच्या नव्या नेतृत्त्वाला माझं कायम सहकार्य लाभेल," असं रुपाणी म्हणाले.

अमित शहांचे पूर्वीचे सेक्रेटरी विजय रुपाणींकडे का काम करायचे?

विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याबद्दल बीबीसी गुजरातीचे संपादक अंकुर जैन यांनी सांगितले, "विजय रुपाणी यांची कारकीर्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या छायेखालीच राहिली. पक्षातील नेते आणि सनदी अधिकाऱ्यांना कोण निर्णय घेतंय याची चांगलीच कल्पना होती. रुपानी यांचे स्वीय सचिव शैलेश मांडवीय हे पूर्वी अमित शाह यांचे सचिव होते. सचिव अशाप्रकारे शेअर करण्याची प्रथा राजकारण्यांमध्ये नसते."

निवडणुकीआधी एक वर्ष रुपाणी यांना बदललं जाईल अशी अफवा याआधीच पसरली होती असंही जैन यांनी सांगितलं.

विजय रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागण्यामागे त्यांचा कमी असलेला लोकसंपर्क असल्याचंही जैन यांनी सांगितलं. "ते कधीच मासलिडर म्हणून ओळखले गेले नाहीत. रुपाणी मुख्यमंत्री असताना झालेल्या निवडणुकीत भाजपाची संख्या 115 वरुन 99 वर आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं," असंही अंकुर जैन यांनी सांगितलं.

अनेक भाजपशासित राज्यांमध्ये नेतृत्वबदल

गेल्या काही काळात भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. गेल्या पाच महिन्यातच भाजपने चार राज्यांमधील मुख्यमंत्री बदलले.

कर्नाटकात येदीयुरप्पा, उत्तराखंडमध्ये तिरथसिंह रावत आणि त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याशिवाय आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांनी नुकताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

उत्तराखंड येथे तर दोनवेळा मुख्यमंत्री बदलण्यात आले. त्यानंतर आता याठिकाणी पुष्करसिंह धामी यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली आहे.

ईशान्येकडील राज्य आसाम येथे सर्वानंद सोनोवाल यांच्यानंतर हिमंता बिस्वा सरमा यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. तर कर्नाटकात येदीयुरप्पा यांनी राजीमाना दिल्यानंतर त्यांच्याठिकाणी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)