तैमूर-जहांगीरच्या नावाने ट्रोल होण्यावर सैफ-करिनाला नेमकं काय वाटतं?

बॉलिवूड मधील स्टार कपल म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर यांना अनेकदा मुलांच्या नावावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. या ट्रोलिंग किंवा ट्रोल्सबद्दल ते नेमका काय विचार करतात, हे या दोघांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे.

सैफ अली खान आणि करिना कपूर खान या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. तैमूर आणि जहाँगीर अशी त्यांची नावं आहेत. पण या नावांमुळं या जोडप्याला अनेकदा ट्रोल केलं जातं.

तैमूरचा जन्म झाल्यानंतर त्याचं नाव ठेवलं त्यावेळी सैफ आणि करिनाला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या मुलाचं नाव जहाँगीर आहे असं समजल्यानंतरही त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला.

तैमूर हा सोशल मीडियावर अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याच्या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असते. पण त्याचवेळी ट्रोलर्सच्या निशाण्यावरही तैमूर असतो.

मात्र या ट्रोल्सचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा सैफ आणि करिनाला काय वाटते किंवा ते याबाबत काय विचार करतात, याबाबतची त्यांची मतं नुकतीच मुलाखतींमधून समोर आली आहे.

"वेळ वाया घालवण्याचा प्रकार"

सैफ अली खाननं नुकतंच त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या प्रश्नाचं अगदी थेट आणि स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. ई टाइम्सबरोबर बोलताना सैफ अली खाननं, याबाबत विचार करणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं असल्याचं म्हटलं.

''मला वाटतं संपूर्ण जग हे काही सारखंच नाही. सगळीकडे लोक सारखेच आनंदीही नाहीत. आमच्यासारखे कलाकार प्रामाणिकपणे काम करत असतात. अत्यंत परिश्रम घेऊन आम्ही लोकांचं मनोरंजन करत असतो.''

"मनोरंजनाच्या माध्यमातून आम्ही एकप्रकारे समाजात सकारात्मकता पसरवत असतो. पण हे करत असताना अशाप्रकारे नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांबाबत (ट्रोल्स) बोलणं म्हणजे, केवळ आपला वेळ वाया घालवण्यासारखं आहे," असं सैफनं सांगितलं.

अशा प्रकारचे लोक हे कायम समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं अशा गोष्टी वाचणं मी टाळतो, मी त्यापासून दूर राहतो आणि दुसरीकडं कुठं तरी लक्ष केंद्रीत करतो, असं सैफनं सांगितलं.

मुलांना कसं ट्रोल करू शकतात

मुलांच्या नावावरून होणारं ट्रोलिंग तर आहेच. पण काही जण मुलांनाही ट्रोल करतात, याबाबत करिनानं नाराजी व्यक्त केली आहे. द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत करिनानं नुकतंच याबाबत मत मांडलं.

''खरं सांगायचं तर, ही अशी नावं आहेत जी आम्हाला अगदी आवडलेली होती. त्यामागं दुसरं काहीही कारण नव्हतं. ही अत्यंत सुंदर नावं आहेत, आणि त्यापेक्षाही सुंदर माझी मुलं आहेत," असं करिना म्हणाली.

"पण मुलांना कोणी अशाप्रकारे कसं काय ट्रोल करू शकतं हे अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे."

"मला याबाबत अत्यंत विचित्र अशी भावना आहे. मात्र मला याचा सामना करावाच लागणार आहे. कारण ट्रोल्सच्या नजरेतून मी माझ्या आयुष्याकडं पाहू शकत नाही," असं करिनानं म्हटलं आहे.

2012 मध्ये झालं होतं लग्न

करिना कपूर आणि सैफ अली खान 2012 मध्ये विवाहबद्ध झाले होते. त्याआधी अनेक वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केल्याचंही समोर आलं होतं.

सैफ आणि करिना यांना 2016 साली पहिला मुलगा झाला. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळं करिना आणि सैफ यांच्यावर खूप टीकाही झाली होती.

त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात करीना कपूरने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव जहाँगीर असून ते त्याला प्रेमानं 'जेह' असं म्हणतात.

मात्र जहाँगीरच्या नावावरूनही सैफ आणि करिना यांच्यावर टीका झाली ट्रोलर्सनी त्यांना ही नावं ठेवण्यावरून पुन्हा एकदा प्रचंड ट्रोल केलं होतं.

सोशल मीडियावर आलेल्या काही प्रतिक्रियांमध्ये ज्या जहांगीरच्या आदेशावरून शीख गुरू अर्जन देव यांची हत्या करण्यात आली त्या जहांगीरच नाव आपल्या मुलाला का दिलं, असा सवाल करण्यात आला आहे.

ऐकावे जनाचे...

लोक दोनशे-तीनशे वर्षं मागे कसे जाऊ शकतात? मी माझ्या मुलाचं नाव आक्रमणकर्त्यांच्या नावावरून ठेवलं असं त्यांना का वाटतं? या नावाचा जो अर्थ आहे, त्यामुळं आम्ही हे नाव ठेवलं, असं करिना कपूरनं यापूर्वीच म्हटलं आहे.

जो अतिशय सक्षम आहे, असा तैमूर या नावाचा अर्थ असल्याचं करिनानं म्हटलं होतं. तर जहांगीरचा अर्थ जगावर राज्य करणारा असा असून तो, फारसी भाषेतला शब्द आहे.

"मी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मला वाटतं ऐकावे जनाचे करावे मनाचे. आतापर्यंत मी असंच करत आले आहे आणि यापुढेही तेच करणार जे मला करायचं असेल," असं करिनानं आधीच स्पष्ट केलं आहे.

हे दाम्पत्य त्यावर ठाम असून ट्रोल्सना टाळून त्यांनी पुढं जायचं ठरवलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)