करिना आणि सैफ अली खान दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर का ट्रोल होत आहेत?

अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांना दुसरा मुलगा झाला आहे.

रविवारी (21 फेब्रुवारी) सकाळी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि करिना कपूरची चुलतबहीण रिधिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियावर सैफ आणि करिना यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

ऑगस्ट 2020 मध्ये करिना कपूरनं दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. 'आमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येत असल्याचं' करिनानं म्हटलं होतं.

2012 साली करिना कपूर आणि सैफ अली खान विवाहबद्ध झाले होते. 2016 साली त्यांना पहिला मुलगा झाला. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे करिना आणि सैफ यांच्यावर खूप टीकाही झाली होती.

सोशल मीडियावर सैफ अली खान आणि करिना कपूर यांचं अभिनंदन केलं जात असतानाच आता या मुलाचं नाव काय ठेवणार हा प्रश्नही विचारला जात आहे.

अनेकांनी सैफ अली खान आणि करिना कोणत्या मुघल शासकाचं नावं ठेवणार असं म्हणत त्यांना ट्रोल केलं आहे.

काहीजणांनी इतरही मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तैमूरला आता प्रसिद्धीमध्ये वाटेकरी आला, असं काहीजणांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्याबद्दल ट्रोल झालेल्या करिनानं एका मुलाखतीत याबद्दल प्रतिक्रिया दिली होती.

लोक दोनशे-तीनशे वर्षं मागे कसे जाऊ शकतात? मी माझ्या मुलाचं नाव आक्रमणकर्ता तैमूरवरून ठेवलं असं का त्यांना वाटतं? या नावाचा जो अर्थ आहे, त्यामुळे आम्ही हे नाव ठेवलं, असं करिना कपूरनं म्हटलं होतं.

जो अतिशय सक्षम आहे, असा तैमूर या नावाचा अर्थ असल्याचंही करिनानं म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.