You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनुष्का नाही, विराटला करियर सोडण्याचा सल्ला का मिळतो आहे?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
'दिवस राहिलेत, आता जरा जपून…'
'आता काही वर्ष काम बंद ठेवावं लागेल. लग्नानंतर तडजोड ही आलीच.'
'बाळाकडेच पूर्ण लक्ष द्यायला हवं, करियर बाजूला राहणार आता…'
एखाद्या महिलेनं 'गोड बातमी' सांगितली, की अशा प्रतिक्रिया तिला ऐकायला मिळतात. पण अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असल्याचं समजल्यावर तिला नाही, तर तिचा पती विराट कोहलीला अशा सूचनांना सामोरं जावं लागतंय.
त्याचं झालं असं की, अनुष्का आणि विराटनं त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचं जाहीर केलं आणि दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. पण त्यातही काहींनी अनुष्काचं करियर आता संपलं असा सूर लावला. अनुष्काला असा सल्ला देणारे लोक, विराटचं मात्र फक्त अभिनंदन करत होते.
अनेक महिलांना (आणि पुरुषांनाही) अर्थातच ही गोष्ट रुचली नाही. त्यांनी ट्विटरवर उपहासात्मक प्रतिक्रिया लिहिल्या आणि एक महिला आणि एका पुरुषाला एकाच गोष्टीवरून कशी वेगळी वागणूक मिळते, याकडे लक्ष वेधून घेतलं.
'विराट कर्णधारपद कसं सांभाळणार?'
शिवकामी शिवकुमार यांचं हे ट्विट पाहा. "विराट आता वडील झाल्यावर, कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकेल? त्याला आपल्या कामावर लक्ष देता येईल का? करियर संपवणारं पाऊल आहे हे..."
या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय.
ऊर्जा दोशी लिहितात, "आपलं कुटुंब घरी सोडून तो बाहेर जाऊन कसा काय खेळू शकतो? मग जेवण कोण बनवणार? मुलांना शिकवणं, अंघोळ घालणं, कपडे घालणं, वाढवणं हे सगळं कोण करणार? त्यांच्यावर कसं वागायचं हे संस्कार कोण करणार? घराऐवजी कामावर लक्ष दिलं तर थोडं इकडे-तिकडे होणारच ना…"
तर कामिनी म्हणतात, "अनुष्कानं पण थोडी मदत करावी. किमान बाळाचे लंगोट, नॅपीज तरी बदलावेत."
मानसी अगदी मूळ मुद्द्यावर बोट ठेवत लिहितात, "कर्णधारांना लग्नानंतर तडजोड करावीच लागते, शेवटी कामापेक्षा कुटुंब महत्त्वाचं आहे. कर्णधाराची जागा शेवटी आपल्या घरातच असते."
तर "विराटनं काम करावं, पण अनुष्कानं त्याला परवानगी दिली तरच.." असं शिवांगी लिहितात. अनु म्हणतात, "विराट बाबा बनल्यावर क्रिकेटमधलं करियर सुरू ठेवणार आहे का? आता तो मुलं आणि खेळातलं करियर हे दोन्ही कसं सांभाळणार?"
पण फक्त महिलाच नाही, तर पुरुषांनीही विराटला उद्देशून महिलांना काय त्रास सहन करावा लागतो, यावर टिप्पणी केली आहे. कुणी म्हणतं, की 'विराटनं अनुष्काला विचारायला हवं, की बाळाच्या जन्मानंतर तो काम करू शकतो का?' तर कुणी सल्ला देतं की, 'मुलं मोठी होईपर्यंत विराटनं कामातून 'ब्रेक' घ्यायला हवा.'
महिला आणि पुरुषांना वेगळी वागणूक का?
अनुष्काच नाही, तर करियर आणि स्वतंत्र ओळख असलेल्या कुठल्याही महिलेला तिनं लग्न केलं किंवा मुलांना जन्म द्यायचा निर्णय घेतला, की अशा सूचनांना सामोरं जावं लागतं. अनेकींना खरोखरच करियर सोडावंही लागतं. पण पुरुषांना मात्र असे प्रश्नही विचारले जात नाहीत, हा विरोधाभास सोशल मीडियावरच्या कमेंट्सनी पुन्हा समोर आणला आहे.
अर्थात काहींना यातला उपहास कळला नाही, आणि त्यांनी लग्नाचा किंवा मुलांच्या जन्माचा क्रिकेटरच्या खेळावर परिणाम होत नाही, अशी टिप्पणी केली. त्यांना कुणी सानिया मिर्झाची आठवण करून दिली.
विराटच्या करियरवर मुलाच्या जन्मानं परिणाम होणार नाही, असं म्हणणार्या समाजानं सानिया मिर्झाच्या करियरवर मात्र प्रश्नचिन्ह उभं केलं होतं.
सानियानं शोएब मलिकशी लग्न केलं तेव्हा आणि नंतर तिच्या मुलाचा म्हणजे इझान मिर्झा मलिकचा जन्म झाला, तेव्हा तिला अशाच सूचना आणि ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.
बाळाच्या जन्माची बातमी आल्यावर उमटलेल्या या विरोधाभासी प्रतिक्रिया, महिला आणि पुरुषांच्या वाट्याला येणारी ही वेगवेगळी वागणूक आणि समाजातला दुटप्पीपणा पुन्हा दाखवून देतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)