नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा संपताच समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश : #5मोठ्याबातम्या

शिवसेना

फोटो स्रोत, Uday Samant

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश,नितेश राणे म्हणाले,'येड्यांची जत्रा'

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत असताना सिंधुदुर्गात राणेंना धक्का बसला आहे. सिंधुदुर्गातील नारायण राणे समर्थक समजले जाणाऱ्या देवगड नगरपालिकेतल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हर्षदा ठाकूर आणि प्रकाश कोयडे या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक उपस्थित होते.

सिंधुदुर्ग हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला समजला जातो. केंद्रीय मंत्री बनल्यानंतर जिल्ह्यात त्यांनी नुकतीच जनआशीर्वाद यात्रा काढली. पण याचा फार परिणाम झाला नाही, अशी टीका शिवसेनेकडून केली जात आहे.

मात्र नितेश राणे यांनी हे नगरसेवक शिवसेनेचेच असल्याचा दावा केलाय. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं असून ते म्हणाले, "आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून कॉलवर उगाच आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेडं बनवायचं. यालाच म्हणतात 'येड्यांची जत्रा"

2. MPSC उमेदवारांना लोकलमधून प्रवास करता येणार, 'हे' आहेत नियम

शनिवारी (4 सप्टेंबर) राज्यात लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा आहे. त्यामुळे उमेदवारांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक काढलं आहे. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

रेल्वे लोकलमधून प्रवास करण्यासाठी सध्या केवळ मासिक पास देण्यात येत आहे. त्यासाठी कोरोना प्रतिंबधक लशीचे दोन डोस आणि दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस पूर्ण झाले की लोकल पास मिळू शकतो.

परीक्षा

फोटो स्रोत, Getty Images

परंतु MPSC च्या उमेदवारांना 4 ऑगस्टसाठी या नियमातून मुभा देण्यात आली आहे. परीक्षेसाठीचं हॉलतिकीट आणि ओळखपत्र दाखवून उमेदवारांना तिकीट कढता येणार आहे.

3. JEE MAINS परीक्षेत अनियमितता आढळल्याने सीबीआयची छापेमारी

आयआयटी आणि तंत्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स (JEE Main) परीक्षेत अनियमितता आढळल्याचं समोर आलं आहे. याची चौकशी करण्यासाठी गुरुवारी (2 ऑगस्ट) सीबीआयने (CBI) पुणे आणि दिल्लीत छापेमारी केली आहे.

JEE Mains परीक्षेच्या वेळापत्रकानुसार चौथ्या सत्राची परीक्षा 26, 27, 31 ऑगस्ट आणि 1, 2 सप्टेंबरला पार पडली. या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा संशय असल्याने सीबीआयने छापे टाकले आहेत. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना सीबीआयने ताब्यात घेतलं. परीक्षेत अनियमितता आणण्यासाठी उमेदवारांकडून 15 लाख रुपये घेण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

तसंच एक कंपनी, शिक्षण संस्थेचे संचालक आणि काही सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

4. ओबीसी आरक्षणप्रश्नी ठाकरे सरकार काय तोडगा काढणार?

स्थानिक स्वराज्य संस्थेतील इतर मागासवर्गीयांच्या (OBC) राजकीय आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (3 सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक होणार आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यतात याव्या अशी मागणी राजकीय पक्षांची आहे.

ओबीसी

फोटो स्रोत, Twitter

आगामी काळात महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांची निवडणूक आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तोडगा निघेपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. आरक्षण पूर्ववत करायचं असेल तर राज्य सरकारला ओबीसींचं राजकीय मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे.

त्यामुळे यासंदर्भात महाविकास आघाडी सरकार काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च या काळात मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत.

5. 'यांना मेंदूच नाहीय', केरळच्या राज्यपालांची तालिबान समर्थक भारतीय मुस्लिमांवर टीका

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर भारतात काही मुस्लीम संघटनांकडून तालिबानचं समर्थन केल्याचं समोर आलं. यावरुन अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी टीका केल्यानंतर आता केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनीही संताप व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, "डोक्यात मेंदू नसलेले हे लोक आहेत. सनातनी म्हणण्याच्या लायकीचे नाहीत. पण भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गाकडून तालिबानसाठी होणारं समर्थन पाहून लाज वाटते." महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

यात काही नवीन नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, "इतिहास वाचा, यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. महिला जीवनाच्या प्रत्येक पावलावर भागीदार होत्या. तालिबान समर्थकांची वायफळ वक्तव्य पाहून लाज आणि खेद वाटतो."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)