बेळगाव महापालिकेची आज निवडणूक, पक्षीय उमेदवारांसमोर मराठी अस्मिता टिकणार?

मतदान

फोटो स्रोत, MANJUNATH KIRAN

    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठीसाठी

अखेर कार्यकाळ संपल्याच्या दोन वर्षांनी बेळगाव महापालिकेसाठी आज निवडणूक होतेय. आज बेळगाव महापालिकेसाठी मतदान होतंय.

एकूण 58 जागांसाठी ही निवडणूक होतेय. यासाठी तब्बल 358 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसह सर्वपक्षीय उमेदवार आपापल्या पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

जवळपास ४ लाखांहून अधिक मतदार यासाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोनाच्या संसर्गाचा धोका पाहता यावेळी प्रचारादरम्यान अनेक गोष्टींची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रचाराचा धडाका सर्वच पक्षांना आवरता घ्यावा लागल्याचं पाहायला मिळालं.

पहिल्यांदाच राजकीय पक्ष थेट मैदानात

बेळगाव महापालिका निवडणूक ही कायम भाषिक अस्मितेच्या मुद्यावर लढवली गेली आहे. पण यावेळी भाषिक मुद्द्यासह राजकीय पक्षांनी उघडपणे आपल्या पक्षाचे उमेदवार थेट निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

यात भाजपने सर्व 58 जागांवर उमेदवार उभे केलेत. तर कॉंग्रेस 49, आम आदमी पार्टी 24, एमआयएम 6, शिवसेना 4 जनता दल सेक्युलर 12 आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने 23 जागावर आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरली आहे.

बेळगाव हे सीमालढ्यात अग्रस्थानी राहिलं आहे. त्यामुळे इथली निवडणूक ही मराठी विरुद्ध कन्नड अशीच लढली गेली आहे. बेळगाव महापालिकेची स्थापना 1976 साली झाली. पण तब्बल 8 वर्ष इथलं कामकाज प्रशासकाने सांभाळलं.

बेळगाव

फोटो स्रोत, BBC/SWATI PATIL-RAJGOLKAR

पुढे 1984 पासून इथं निवडणूक लढवली गेली. तेव्हापासून चार वेळेचा अपवाद सोडला तर बेळगाव महापालिका ही कायम मराठी भाषिकांच्या हातात राहिली आहे. त्यामुळे काही वेळेसच कन्नड महापौर आले. अन्यथा कायम बेळगाव महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यात महाराष्ट्र एकीकरण समितीला यश आलं आहे.

पण यावेळी मात्र राजकीय पक्ष थेट रिंगणात उतरल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. याबाबत सकाळचे स्थानिक पत्रकार मल्लिकार्जून सांगतात, "आजवर बेळगाव महापालिका निवडणूक ही कन्नड-उर्दू विरूद्ध मराठी भाषिक अशी लढली गेली. त्यावेळी या दोन्ही भाषिकांना राजकीय पक्ष छुपा पाठिंबा देत होते. पण यावेळी राजकीय पक्ष थेट निवडणूक रिगणात उतरल्याने मराठी भाषिक अधिक संघटीत झाल्याचं चित्र आहे."

त्यामुळेच महाराष्ट्र एकीकरण समिती पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने जरी 23 जागावर उमेदवार दिले असले तरी निवडून आलेल्या मराठी भाषिकांना समिती एकत्र आणेल असं दिसतंय. त्याचं कारण 58 जागांपैकी 23 जागा सोडल्या तर इतर प्रभाग समितीने खुले ठेवले आहेत.

त्यामुळे या ठिकाणी उभे असलेले इतर राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून आल्यानंतर समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊ शकतात.

महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी अस्तित्वाची लढाई?

सीमालढ्याचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याने बेळगावमध्ये नेहमी कन्नड विरुद्ध मराठी असा वाद पाहायला मिळाला आहे. त्याचे पडसाद महापालिका निवडणूकीत कायम उमटले आहेत. पण अस्मितेची ही लढाई मराठी भाषिक बहुतांश वेळा जिंकल्याचं चित्र आहे.

बेळगाव

फोटो स्रोत, BBC/Swati Patil

फोटो कॅप्शन, बेळगाव

यावेळी राष्ट्रीय पक्ष त्यांच्या चिन्हावर लढल्याने ही निवडणूक अधिक सोपी झाल्याचं बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील यांचं म्हणणंय. भाजप, कॉंग्रेस सारखे पक्ष आपली संपूर्ण ताकद त्यांच्या उमेदवारांपाठी लावणार आहेत. त्यामुळे बेळगाव महापालिकेवर एकीकरण समितीचा मराठी महापौर बसणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्याचं पाटील याचं म्हणणं आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांना सव्वा लाख मतं मिळाली होती. त्यामुळे बेळगावमध्ये मराठी भाषिक एकत्र असल्याचं अधोरेखीत झाल्याचं दिसत आहे. असं समितीचे मालोजी अष्टेकर यांना वाटतं.

सीमालढा सूरू असताना महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव महापालिकेवर मराठी झेंडा फडकवत ठेवला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने बेळगावात येऊन मराठी भाषिंकाना नैतिक पाठिंबा द्यायला हवा, असं मत अष्टेकर व्यक्त करतात.

पुन्हा भगवा फडकेल - राऊत

बेळगाव महानगर पालिकेवर पुन्हा एकदा मराठी संघटना शिवाजी महाराजांचा भगवा फडकावतील, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

"बेळगावमधल्या कार्यकर्त्यांशी माझी चर्चा सुरू आहे. मी स्वतःदेखील बेळगावला प्रचाराला जाणार होतो, पण आम्ही प्रचाराला गेल्यामुळे एकिकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर परत कर्नाटक सरकारची दहशत नको, म्हणून इथूनच आम्ही मदत करायचं ठरवलं," असंही राऊत म्हणाले.

यावेळी बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक आठ वर्षांनी होत आहे. बहुमतामध्ये मराठी सत्ता असलेली महानगर पालिका कर्नाटक सरकारनं द्वेषबुद्धीनं बरखास्त केली होती, असा आरोप राऊत यांनी केला.

"या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकिकरण समिती आणि इतर सगळे मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू आणि पुन्हा बेळगाव महापालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवू असं वातावरण तिथं पाहायला मिळत आहे. त्यासाठी मराठी म्हणून एकजुटीनं मतदान करा," असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)