बेळगाव पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव का झाला?

फोटो स्रोत, SWATI PATIL
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी
देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांची उत्सुकता असताना बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचा निकालही तितकाच उत्कंठावर्धक ठरला.
भाजप खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक होती. यात अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी या 3 हजार 986 इतक्या मतांनी निवडून आल्या. मंगला अंगडी यांनी काँग्रेसचे सतिश जारकीहोळी आणि शिवसेना पुरस्कृत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांचा पराभव केला.
बेळगाव लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तरुण उमेदवारामुळे चांगलीच रंगत आली होती. कर्नाटकातील बेळगाव हा जिल्हा 1956 पासून सीमावादाच्या लढ्यासाठी कायम चर्चेत असतो.
इथला मराठी भाषिक हा कडव्या हिंदुत्वासाठी झगडणारा वर्ग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून सीमाभागातील लोक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत असतात. पण मधल्या काळात या समितीमध्ये गटातटाचं राजकारण आल्यानं समिती संपणार अशी चर्चा सुरू झाली.
त्यामुळं या पोटनिवडणूकीच्या निमित्तानं हाच विखुरलेला मराठी भाषिक एकत्र येणार का याची उत्सुकता होती. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही शिवसेना नेते संजय राऊत तसंच महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी इथे सभा घेऊन ही निवडणूक आणखी प्रतिष्ठेची केली होती.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात 8 विधानसभा मतदारसंघ येतात. यात बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण , बेळगाव ग्रामीण, गोकाक, आरभावी , सौंदत्ती यल्लमा , रामदूर्ग आणि बैलहोंगळ यांचा समावेश होतो. या 8 पैकी बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण हा मराठी भाषिकांचा मतदार संघ आहे. तर उरलेले 5 हे कन्नड भाषिक मतदार आहेत.
कडवी लढत
रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळं बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक होती. यावेळी भाजपकडून अंगडी यांच्या पत्नी मंगला यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी यांनी लढत दिली. पण शेवटच्या क्षणी महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी देत निवडणुकीत रंगत आणली.
शुभम शेळके हा 26 वर्षांचा तरुण युवा समितीचा अध्यक्ष आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जातो. लहानपणापासून सीमावादातील लढ्यात अग्रभागी असणारा आणि तरुण चेहरा म्हणून शिवसेनेने शेळके यांना पाठिंबा दिला होता.

फोटो स्रोत, Mangala Angadi/twitter
भाजपच्या मंगला अंगडी यांना 436868 इतकी मतं मिळाली तर कॉंग्रेसच्या सतिश जारकीहोळी यांना 432882 इतकी मतं मिळाली. पण या निवडणुकीत लक्षवेधी मतं शुभम शेळके यांना पडली.
शेळके यांना 1,24,648 इतकी मतं पडली. विशेष म्हणजे शेळके यांनी इतकी मतं मिळवून समितीच्या इतिहासातील मतांचा विक्रम मोडला. 1989 साली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ए. पी. पाटील यांना 1 लाख आठ हजार मतं पडली होती. त्यांचा हा विक्रम शेळके यांनी मोडला.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीत समितीच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी या निवडणुकीच्या निमित्ताने बेळगावातील मराठी तरुण पुन्हा लढायला शिकला हा आमचा सर्वात मोठा फायदा झाला, असं मत समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितलं.
मधल्या काळात मराठी युवा वर्ग विखुरला अशी चर्चा होती. तो तरुण पुन्हा एकदा समितीच्या माध्यमातून लढण्यासाठी संघटित झाला हे आमचं यश आहे. आज हरलो असलो तरी पुन्हा लढण्यासाठी सज्ज आहोत हे या निवडणुकीतून दाखवून दिलं असं दळवी पुढे म्हणाले.
प्रचाराचे मुद्दे
या निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा हा मराठी अस्मिता हाच राहिला. महाराष्ट्र एकीकरण समितीने याच मुद्द्यावर मराठी जनतेला साद घातली . प्रचाराच्या केंद्रस्थानी विकासाचा मुद्दा फारसा राहिला नाही असं मुगळी सांगतात.
याचं कारण अंगडी यांनी रेल्वेमंत्री असताना बेळगाव धारवाड हा रेल्वेमार्ग तसंच इतर विकास कामं करून घेतली होती. त्याचाच प्रचार भाजपकडून करण्यात आला. तर कॉंग्रेसकडे महागाई व्यतिरिक्त इतर मुद्दा नव्हता.

फोटो स्रोत, SWATI PATIL
पण या निवडणुकीत जात हा फॅक्टर महत्वाचा ठरला. या मतदारसंघात जातीचं समीकरण मोठ्या प्रमाणात चालतं. त्याचाच फटका सतीश जारकीहोळी यांना बसला. ते लिंगायत नसल्यानं त्या समाजाची अपेक्षित मतं त्यांना मिळू शकली नाही. याउलट लिंगायत समाजाची एकगठ्ठा मतं ही केवळ लिंगायत समाजातील उमेदवाराला मिळतात हा इतिहास आहे.
येदियुरप्पा हे लिंगायत समाजाचे नेते असल्यानं त्याचा फायदा भाजपला होतो. एकीकडे कोरोनामुळे अपयशी ठरवत विरोधकांनी कर्नाटक सरकारला चहुबाजुंनी वेढलं होतं. त्यामुळं ही पोटनिवडणूक येदियुरप्पा यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. असं इंडियन एक्सप्रेसचे उपसंपादक नौशाद यांनी सांगितलं.
महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव का झाला?
गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने इथल्या मराठी भाषिकांवर अन्याय होत होता. अशा वेळी समितीची ताकद दाखवून देण्यासाठी समितीने आपला उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवला असं समितीकडून सांगण्यात आलं.
बेळगाव लोकसभा मतदार संघात 8 पैकी 3 मतदारसंघ हे मराठी बहुल आहेत. त्यामुळं समितीचा उमेदवार निवडून येणार नाही अशी परिस्थिती होती. त्यातच बेळगाव लोकसभा मतदार संघातून मराठी उमेदवार निवडून येऊ नये यासाठी कर्नाटक सरकारने आधीपासूनच व्यवस्था केल्याचं चित्र आहे.
खानापूर हा संपूर्ण मराठी भाषिक तालुका बेळगावमधून काढत कारवार लोकसभा मतदार संघात जोडला आहे. त्यामुळं गेल्या काही वर्षात समितीला आलेलं अपयश यामागे विधानसभा मतदारसंघांची पुर्नरचना हे कारण असल्याचं दीपक दळवी सांगतात.

फोटो स्रोत, SWATI PATIL
गेल्या काही महिन्यातील घटनांमुळं मराठी जनतेमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना वाढू लागली होती. त्यामुळं समिती संपली आणि सोबतच सीमावादाचा लढा संपला अशी चर्चा सुरू झाली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी समितीने ही निवडणूक लढवली, असं दैनिक सकाळ बेळगाव आवृत्तीचे मुख्य प्रतिनिधी मल्लिकार्जून मुगळी यांनी सांगितलं.
गेल्या काही वर्षातला इतिहास पाहता समितीची पीछेहाट झाल्याचं चित्र आहे. सध्या बेळगावात समितीचा एकही आमदार नाही. त्यामुळं सीमावादाच्या लढ्याची धग कमी झाल्याचं बोललं जात होतं. त्यातच गेल्या काही महिन्यात वारंवार बेळगावातील मराठी जनतेवर अन्यायाची अनेक प्रकरणं समोर आली.
त्यात बेळगाव महापालिकेसमोर लालपिवळा ध्वज उभारणं, मणगुत्ती गावात शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणं, मराठी फलकांवर काळं फासणं, शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर हल्ला होणं अशा घटना घडल्या त्यामुळं कन्नड संघटना, लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासन यांनी एकत्र येत मराठी भाषिकावर अन्याय केल्याची भावना इथल्या मराठी जनतेला जाणवू लागली होती. त्याला या निवडणुकीत उत्तर देण्याचा हा प्रयत्न असल्याचं मुगळी सांगतात.
बेळगावची ही निवडणूक महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी अस्मिता या मुद्यावर लढवली. त्यासाठी प्रचारसभा, रोड शो घेण्यात आले. यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत बेळगावात आले होते. प्रचारसभेला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी रोड शो घेत शेळके यांचा प्रचार केला. त्यामुळं शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर इथली मराठी जनता एकवटली.
भाजप जिंकली मात्र आव्हान तगडं
कर्नाटक मंत्रिमंडळातील चार मंत्री बेळगाव जिल्ह्यातील आहेत. विधानपरिषद सदस्य, खासदार अशी तगडी फळी बेळगावात असतानाही या निवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी यांना खूपच कमी मताधिक्य मिळाले आहे.
सुरेश अंगडी या मतदार संघात सलग चार वेळा निवडून आले होते. ही त्यांची चौथी टर्म होती. गेल्या निवडणुकीत अंगडी यांनी 3 लाखाचं मताधिक्य मिळवलं होतं. मात्र त्यांच्या मृत्युमुळे ही पोटनिवडणूक झाली.

फोटो स्रोत, SWATI PATIL
या निवडणुकीत सहानुभूती म्हणून मताधिक्य वाढेल असा भाजपचा कयास होता मात्र तसं झालं नाही. अगदीच कमी फरकाने भाजपला ही जागा टिकवता आली. त्या तुलनेत कॉंग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांनी चांगली लढत दिली असं बोललं जात आहे. यामागे जारकीहोळी यांचा अफाट जनसंपर्क हे कारण असल्याचं मुगळी सांगतात.
3 वेळा मंत्री राहिलेले जारकीहोळी हे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायतीत जारकीहोळी यांचा जनसंपर्क होता. त्याचा त्यांना या निवडणुकीत फायदा झाला. सोबतच महाराष्ट्र एकीकरण समितीमुळे भाजपचं मताधिक्य कमी झालं त्याचाही फायदा जारकीहोळी यांना झाला त्यामुळं ही लढत जोरदार झाली.
आजवर हिंदुत्वाच्या मुद्यावर इथला मराठी वर्ग हा भाजपला मतदान करत आला आहे. मात्र गेल्या काही घटनांमुळे कर्नाटक भाजप सरकारवर इथली मराठी जनता रोष व्यक्त करते. सरकारचं पाठबळ असल्यानं कन्नड संघटना मराठी भाषिकांवर अत्याचार करतात असं इथल्या मराठी भाषिकांचं मत आहे. तो राग व्यक्त करत समितीने उमेदवार दिला.
त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कधीही समितीच्या विरोधात जाणार नाही अशी भूमिका घेतली असताना यावेळी मात्र त्यांनी समितीच्या विरोधात प्रचार केल्यानं मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट होती. त्याला बहुसंख्येने मतदान करत करत मराठी जनेतेनं उत्तर दिलं. त्यामुळं मतांचं धृवीकरण झालं असं मुगळी सांगतात.
सतीश जारकीहोळी यांचा पराभवासाठी त्यांचा सख्खा भाऊ भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना मुगळी सांगतात की भाजपचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे वादग्रस्त सीडी प्रकरणावरून गोत्यात आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
तर त्यानंतर प्रचाराच्या काळात कोरोना झाल्यामुळे ते प्रचारात सहभागी झाले नव्हते. पण सुरूवातीपासूनच सतीश जारकीहोळी यांच्या रमेश आणि भालचंद्र दोन्ही भावांना भाजपने अंगडी यांच्या प्रचारासाठी कार्यरत राहण्यासाठी सूचना दिल्या होत्या.
एकुणच मराठी मताचं धृवीकरण, जातीचं समीकरण आणि मराठी जनतेकडे दुर्लक्ष या मुद्यांमुळे भाजपला ही निवडणूक जिंकणं अवघड झालं होतं. पूर्वीपासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात 2004 पासून अंगडी यांच्या माध्यमातून भाजपने जम बसवला.
पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या राजकारणातून भाजपची मराठी मतं फुटावीत यासाठी शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून राजकारणाचा डाव टाकला ज्याचा फायदा कॉंग्रेसला झाल्याचं बोललं जातंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








