चीनच्या भिंतीसारखी भारतात झुडपांची भिंत होती, मग ती नष्ट कशी झाली?

फोटो स्रोत, Alamy
- Author, कमला त्यागराजन
- Role, बीबीसी फ्युचर
'माणसाला किंवा पशूंनाही पार करता येणार नाही' अशी ख्याती असलेला हा नैसर्गिक अवरोधक (अडथळा) सिंधू नदीपासून ते महानदीपर्यंत भारतभरात पसरलेला होता. मग तो आता विस्मृतीत कसा गेला?
लंडनमधील सेकंडहँड पुस्तकं विकणाऱ्या एका दुकानात 1994 सालच्या अखेरीला रॉय मॉक्सहॅम यांना एक पुस्तक सापडलं.
इंग्रजांच्या वसाहतीच्या काळात, 1894 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक तळटिपांनी भरलेलं होतं.
भारतीय इतिहासाच्या एका विस्मृतीत गेलेल्या कप्प्याविषयीचं हे विलक्षण पुस्तक होतं. रॉय यांची त्यानंतरची तीन वर्षं या विस्मृतीतल्या कप्प्याचा शोध घेण्यात गेली.
'रॅम्बल्स अँड रिकलेक्शन्स ऑफ अॅन इंडियन ऑफिशिअल' या मेजर जनरल डब्ल्यू. एच. स्लीमन यांच्या पुस्तकात 'ट्रान्झिट ड्यूटीज् इन इंडिया- मोड ऑफ कलेक्टिंग देम' असं एक प्रकरण आहे.
त्यात 'जकातमार्गावरील एका झुडुपांच्या कुंपणा'चा उल्लेख आहे.
हा नैसर्गिक अवरोधक "हळूहळू महाकाय व्यवस्थेचं रूप धारण करत असून इतर कोणत्याही बऱ्यापैकी सुसंस्कृत देशामध्ये असं उदाहरण सापडणं जवळपास अशक्य आहे," असं स्लीमन यांनी लिहिलं होतं.
खुद्द या झुडुपांच्या कुंपणाविषयीचा तपशील तुरळक स्वरूपात उपलब्ध होता, पण त्याबद्दल ज्या काही दस्तावेज रूपातील नोंदी पाहायला मिळाल्या, त्याने मॉक्सहॅम कोड्यात पडले.
तोवर ते पाच वेळा भारतात येऊन गेले होते, पण त्यांनी कधी या झुडुपांच्या प्रदेशाविषयी ऐकलं नव्हतं.
हे झुडुपांचं कुंपण कथितरित्या एका जकातमार्गावर उभारण्यात आलं. पुस्तकात नमूद केल्यानुसार 1869 साली उभारण्यात आलेलं हे कुंपण भारतभर 2300 मैलांवर पसरलं.
त्यावर 12 हजार ब्रिटिश अधिकारी पहारा देत असत आणि त्यासाठी 16 लाख 20 हजार रुपये वार्षिक खर्च होत होता.

फोटो स्रोत, Alamy
हे कुंपण पूर्णतः देशी अभेद्य काटेरी झुडुंपांनी बनलेलं होतं. तस्करांना किनारपट्टीवरील प्रदेशांमधून ब्रिटिश अधिपत्याखालील राज्यांमध्ये मीठ चोरून नेण्यापासून थोपवण्याकरता या कुंपणाची रचना करण्यात आली. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये मिठावर खूप जास्त कर लावला जात होता.
"आरोग्यासाठी मीठ किती महत्त्वाचं आहे, हे लोकांच्या क्वचितच लक्षात येतं," असं मॉक्सहॅम सांगतात. "पण त्या काळी लोकांवर इतका प्रचंड अन्याय होत असूनही इतिहासाचा हा वेदनादायी भाग पूर्णपणे विस्मृतीत कसा गेला, याचं मला आश्चर्य वाटतं."
हा झुडुपांच्या कुंपणाचा उल्लेख चुकीने झाला असावा, असं मॉक्सहॅम यांना पहिल्यांदा वाटलं. असं कुंपण अस्तित्वात असेल, ही बाबच अशक्य वाटत होती. असा काही उल्लेख इतर वासाहतिक काळातील पुस्तकांमध्ये आहे का, याचा शोध ते घेऊलागले. एप्रिल 1996 मध्ये त्यांना या कुंपणाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणारे इतर काही तपशील दुसऱ्या एका पुस्तकात सापडले.
ब्रिटिशकालीन भारतातील प्रशासकीय अधिकारी असलेल्या जॉन व रिचर्ड स्ट्रॅची या दोघा भावांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं नाव होतं- 'द फायनान्सेस अँड पब्लिक वर्क्स ऑफ इंडिया (1869-81)' हे कुंपण 110 भागांमध्ये विभागलेलं होतं.
त्यातील प्रत्येक भाग 10 ते 30 मैलांचा (16-48 किलोमीटर) होता आणि त्यावर गस्त घातली जात असे- पहाऱ्यासाठी 1,727 चौक्या होत्या.

फोटो स्रोत, Alamy
या जकातमार्गावर प्रत्येक मैलावर पहाऱ्यासाठी 10 माणसं पाळीवर काम करत होती, त्या-त्या दिवशी कामावर आल्यानंतर पहारेकऱ्यांना आपल्या अधिकाराखालील भाग 'झाडावा' लागत असे, त्यासाठी ते गवताळ चिवा किंवा मोठी फांदी वापरत असत, अशी माहिती मॉक्सहॅम यांनी विविध ठिकाणांवरून गोळा केली.
आपापली पाळी संपल्यानंतर सापडलेल्या पाऊलखुणांची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे त्याची खातरजमा करण्यासाठी ही पद्धत पडली होती. ब्रिटिशांनी भारतावर अधिकाधिक नियंत्रण मिळवल्यावर या झुडुपांच्या कुंपणाची सीमा सरत्या वर्षांगणिक कशी बदलत होती याचं वर्णन मॉक्सहॅम यांनी 'द ग्रेट हेज ऑफ इंडिया' या पुस्तकात केलं आहे. "हा अवरोधक अधिकाधिक प्रचंड होत गेला," असं ते म्हणतात.
या काळातील भारताचे एक विख्यात 'प्रशासक-इतिहासकार' जेम्स ग्रॅन्ट डफ यांनी या कुंपणाची तुलना चीनमधील महाकाय भिंतीशी केली होती. या कुंपणापाशी दिवस-रात्र खडा पहारा दिला जात असे.
यामागचा हेतू स्पष्ट होता: मिठावर परिणामकरकरित्या कर लावून ब्रिटिशांना अधिक नफा मिळावा. या कुंपद्वरे ब्रिटिशांच्या अखत्यारितील राज्यं आणि किनारपट्टीवरील मीठउत्पादक प्रदेश यांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यात आलं.
1600 साली स्थापन करण्यात आलेली ईस्ट इंडिया कंपनी ही जगातील पहिल्या काही बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक मानली जाते. या कंपनीला दीर्घ काळ महसूल मिळवून देणारा स्त्रोत मीठ हा होता.
केवळ भारतातच नव्हे, तर आशियात इतरत्रही मिठातून मिळणाऱ्या या महसुलातून पुढे ब्रिटिश साम्राज्य अवतरलं. मिठाची गरज लक्षात घेऊन राज्यसंस्थेचा वित्तसाठा वाढवण्यासाठी त्यावर बराच कर लादणं शक्य होतं.
या कुंपणाच्या बांधणीचं श्रेय बहुतांशाने एका माणसाला जातं. ब्रिटिश मुलकी अधिकारी व वनस्पतीशास्त्रज्ञ अॅलन ओक्टेव्हिअन ह्यूम यांना जकात आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं.
त्यांनी बरीच संसाधनं वापरून जकात मार्गावर नियंत्रण प्रस्थापित केलं आणि स्वतःच्या वनस्पतीविषयक ज्ञानाचा उपयोग करून तस्करीविरोधातील परिणामकारक अवरोधक म्हणून या झुडुपांच्या कुंपणाची निर्मिती केली.

फोटो स्रोत, Alamy
1869 साली हे झुडुपांचं क्षेत्र हिमालयाच्या पायथ्यापासून ओडिशापर्यंत पसरलेलं होतं, आणि मग बंगालच्या उपसागराकडे वळताना त्याला वाटेत छेद देण्यात आला.
गुजरात व ओडिशा इथले किनारपट्टीवरील मीठउत्पादक प्रदेश ब्रिटिश राजवटीखालील उर्वरित संस्थानांपासून तोडणं, हा यामागचा उद्देश होता. यामुळे मीठ ही अमूल्य क्रयवस्तू बनली. त्यावर इतका प्रचंड कर लादण्यात आला की बहुतांश भारतीयांना मीठ परवडेनासं झालं.
'भारत मीठ अधिनियम, 1881' या कायद्यानुसार ब्रिटिशांना मिठावर पूर्ण मक्तेदारी मिळाली आणि भारतीयांना मीठ गोळा करण्याला व विकण्याला प्रतिबंध करण्यात आला.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून महात्मा गांधींनी काढलेली दांडी यात्रा याच कायद्याला धुडकावणारी होती.
या झुडुपांच्या कुंपणाची सरासरी उंची आठ फूट आहे. इतका प्रचंड अवरोधक असूनही मिठाची तस्करी निर्धोकपणे सुरू राहिली.
सशस्त्र टोळ्या या कुंपणाला पार करून मिठाची पोती लादलेल्या उंटांनी दोन्ही बाजूंनी प्रवास करत. पहारा नसलेल्या भागांमध्ये तस्कर मीठ नेत. यामुळे अनेकदा हिंसक चकमकी झडायच्या.
"जकात अधिकारी सर्वसामान्य लोकांना छळून लाच उकळत असत," असं मॉक्सहॅम यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे. "भारतीयांसाठी अन्याय्य ठरलेल्या ब्रिटिश करांची सततची आठवण म्हणून हा अवरोधक उभा होता."
लंडनस्थित कलावंत शैला घेलानी यांनी अलीकडेच सहकलावंत स्यू पाल्मर यांच्या सोबत 'कॉमन सॉल्ट' या पुस्तकाचं लेखन केलं, त्यात या झुडुपांच्या कुंपणाविषयी लिहिलेलं आहे. हे कुंपण सामर्थ्यवान नैसर्गिक अवरोधक ठरू शकतं, "पण ते एका अर्थी अदृश्यही होतं. ते सहजपणे दिसण्याजोगं नव्हतं," असं त्या सांगतात.
मॉक्सहॅम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्यानुसार, "स्थानिक देशी काटेरी झुडुपांनी हे कुंपण बनलेलं होतं." काही कोरड्या प्रदेशांमध्ये खडकाळ जमिनीचा संपूर्ण वरचा स्तर खणून काढून झुडुपं जगण्यासाठी त्या जागी माती टाकावी लागत असे.
काटेरी पिअर (Opuntia ficus-indica), काटेरी अकाशिआचे थर (Vachellia nilotica) आणि काटेरी बोरं (Ziziphus mauritiana) ही झुडुपं त्यावर लावली जात.

फोटो स्रोत, Alamy
पण यातील करोंदा (Carissa carandas) हे झुडुप बागकामाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक कुतूहलजनक आहे, असं रीमा गुप्ता म्हणतात.
पूर्वी इन्व्हेस्टमेन्ट बँकर म्हणून काम केलेल्या रीमा आता सेंद्रीय शेती करतात. २०१४ साली त्यांनी बंगळुरूजवळ 'सस्टेनेबल, लोकल, ऑरगॅनिक, होलसम' (स्लो) या नावाने शेत उभारलं.
"उत्तर भारतात करोंदा हा एक मसाल्याचा पदार्थ होता", असं त्या सांगतात. करोंदा झाडाच्या लहान लाल फळांपासून रीमा यांची आजी लोणचं करत असे, तर त्या आता या फळांपासून मुरांबा करतात. हे फळ कच्चं खाल्लं तरी लिंबासारखी त्याची आंबटगोड चव लागते. या देशी वनस्पतींसंबंधीचं ज्ञान किती वेगाने लुप्त होतं आहे, याची तीव्र जाणीव रीमा यांना आहे.
भारतातील सेंद्रीय शेतकऱ्यांमध्येही मोजक्याच लोकांना हे देशी झुडुप आणि त्याची ऐतिहासिक भूमिका माहिती आहे.
"हे दणकट झुडुप असतं. ते वेगाने वाढतं, वेगाने पसरतं आणि त्याची सातत्याने कटाई करावी लागते. शिवाय, त्याला विषारी काटे येतात. भारतातल्या त्या महाकाय कुंपणासाठी हे झुडुप का वापरलं गेलं असेल, याची सहज कल्पना करता येते," असं त्या म्हणतात.
मग हे लुप्त का झालं?
मॉक्सहॅम यांच्या मते, ब्रिटिशांनी राजस्थानातील सांभर सरोवरावर ताबा मिळवला आणि पर्यायाने भारतातील सर्व मीठउत्पादन त्यांच्या नियंत्रणाखाली आलं, त्यानंतर हे झुडुपांचं कुंपण निरुपयोगी झालं.
आता उत्पादनाच्या टप्प्यावरच मिठावर कर लावणं शक्य झाल्यामुळे तस्करांना आळा घालणंही शक्य होतं. आता जकातमार्गाची किंवा महागड्या कुंपणाची गरज उरली नव्हती, त्यामुळे 1 एप्रिल 1879 रोजी या कुंपणाचा वापर थांबला. पण लोक त्यानंतरची वर्षंही मिठावर प्रचंड कर भरत होते. मार्च 1947 पर्यंत हा कर सुरू होता.

फोटो स्रोत, Alamy
कदाचित देशी वनस्पतींच्या लुप्त होणाऱ्या ज्ञानामुळे आधुनिक भारतात या महाकाय कुंपणाकडेही दुर्लक्ष होत गेलं असावं.
या कुंपणाची आठवण असणारं कुणीतरी सापडेल किंवा कुंपणाच्या अस्तित्वाचा काही भौतिक पुरावा सापडेल, या आशेने 1990 च्या दशकाच्या मध्यात मॉक्सहॅम भारतात तीन वेळा येऊ गेले. त्यांनी जुने नकाशे पाहिले, उपग्रहांनी टिपलेल्या प्रतिमा पाहिल्या, लहान शहरांमध्ये जाऊन आले, गावकऱ्यांशी व या प्रदेशातील स्थानिकांशी बोलले.
अनेक ठिकाणी हे कुंपण नुसतंच विरून गेल्याचं मॉक्सहॅम यांना आढळलं. अनेक झाडांची आयुर्मर्याता साठ वर्षांची होती, त्यामुळे ती तशीही मरूनच गेली असती. इतर काही झाडं रस्तेबांधणीसाठी कापून टाकण्यात आली. हे कुंपण ज्या भागातून जात होतं, त्या भागावर अतिक्रमण करण्यासाठी लोकांनी स्वतःच्या शेतांची सीमा वाढवली होती.
अखेरीस 1998 साली मॉक्सहॅम यांना या कुंपणाच्या काही खुणा सापडल्या. उत्तर प्रदेशातील इटवाह या जिल्ह्यात एका 40 फुटी बंधाऱ्याशेजारी काटेरी झुडुपं वाढलेली होती.
इथल्या झुडुपांच्या कुंपणाची उंची काही ठिकाणी 20 फुटी आहे, आणि हे मूळच्या कुंपणाचाच भाग आहे की नंतर वाढलेली ही झाडी आहे, याचा अंदाज बांधणं अशक्य आहे, असं मॉक्सहॅम म्हणतात.
या महाकाय कुंपणाची 1876 साली पहिल्यांदा कागदोपत्री नोंद झाली, तेव्हाचं त्याचं स्थान मॉक्सहॅम यांना सापडलेल्या भागाशी भौगोलिकदृष्ट्या जुळणारं होतं. हे झुडुपांचं कुंपण म्हणजे "इंग्रजांच्या विक्षिप्तपणाचा निरुपद्रवी तुकडा" असेल, असं मॉक्सहॅम यांना अभ्यासाला सुरुवात करताना वाटलं होतं, पण अखेरीस हे कुंपण म्हणजे "ब्रिटिशांच्या दडपशाहीचं भयंकर साधन" होतं, असा निष्कर्ष त्यांनी काढला.
लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज इथे 'द बार्टलेट स्कूल ऑफ आर्किटेक्चर'मध्ये लँडस्केप आर्किटेक्चर शिकवणाऱ्या आणि पीएच.डी. करणाऱ्या एझलिंग ओ'कॅरोलसुद्धा या कुंपणाचा शोध घेत आले.
हद्द म्हणून या कुंपणाचा वापर कसा होत होता, याच्या तपासापासून ओ'कॅरोल यांचं संशोधन सुरू झालं. या कुंपणाच्या काही रचनात्मक, पायाभूत वा सांस्कृतिक खुणा सापडतात का, आणि त्याचा परिणाम काय झाला, याचा शोध त्या घेत आहेत.
"एखादं जिवंत झुडुपांचं कुंपण हद्द म्हणून इतक्या प्रचंड प्रमाणात कसं राखता आलं, हे मला समजून घ्यायचं होतं. सर्वसाधारणतः झुडुपांचं कुंपण उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा दोन्ही बाजूच्या भूप्रदेशाचा चिवटपणा टिकवण्यासाठी, मातीची झीज थोपवण्यासाठी वापरलं जातं, पण इथे या कुंपणामागचा हेतू हिंसक होता, प्रत्यक्ष भूभाग विभागण्यासाठी आणि प्रत्येक प्रांतातील लोकांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ते वापरलं गेल," असं ओ'कॅरोल सांगतात.
डॅनिश आर्ट्स कौन्सिलकडून मिळालेल्या निधीच्या सहाय्याने ओ'कॅरोल यांनी 2017 ते 2018 या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशात संशोधन केलं. "अनेक ठिकाणी कुंपणाचा मार्ग अनेक भागांना जोडणारा ठरला आहे- या कुंपणाच्या कडेचा भाग रस्त्याची वाट म्हणून उपयोगात आला आहे, हे मला विशेष रोचक वाटलं," असं ओ'कॅरोल म्हणतात.
मॉक्सहॅम यांना अलीकडेच या झुडुपांच्या कुंपणाबद्दल बोलण्यासाठी व्हर्दान, फ्रान्स इथे अणुऊर्जेवरील एका परिषदेत निमंत्रित करण्यात आलं होतं. "इतका मोठा प्रकल्प इतक्या कमी वेळेत विस्मृतीत कसा गेला, याचं त्यांना कुतूहल वाटलं," असं मॉक्सहॅम सांगतात.
आण्विक युद्धासाठी मोजावी लागणारी किंमत किंवा किरणोत्सारी कचऱ्याची अयोग्य रितीने विल्हेवाट लावल्याने होणारे गंभीर धोके, अशा गोष्टीही जग विसरून जाऊ शकतं, याचा पुरावा म्हणून त्या परिषदेतील प्रतिनिधी मॉक्सहॅम यांच्या संशोधनाकडे पाहत होते. आण्विक क्षेत्रासंबंधीचे असे गंभीर धोके लोकस्मृतीमधून पुसले गेले तर त्याचे भयंकर परिणाम उद्भवू शकतात.
आज हे कुंपण बहुतांशाने अज्ञात असणं, हा ब्रिटिश साम्राज्यवादाविषयीचं शिक्षण अचिकित्सक राहिल्याचा पुरावा आहे, असं घेलानी व पाल्मर म्हणतात. साम्राज्यवाद्यांच्या अशा प्रयत्नांची किती मोठी किंमत माणसांना मोजावी लागली, किती वेदना व दुःख उत्पन्न झालं, याकडे अशा शिक्षणात कमी लक्ष दिलं जातं, असं त्या म्हणतात.
"आमच्या (ब्रिटिश) इतिहिसाच्या पुस्तकांमध्येसुद्धा हा (भारतातील महाकाय झुडुपांच्या कुंपणाचा) इतिहास नव्हता. आम्हाला त्याचा काहीही संदर्भ सापडला नाही," असं पाल्मर म्हणतात.
ही लोकस्मृती जागी ठेवणं, हे सततचं आव्हान आहे. पण पाल्मर व घेलानी यांना ते स्वीकारावंसं वाटतं. अलकडे त्यांनी साउथ लंडन बोटॅनिकल इन्स्टिट्यूटमध्ये या संदर्भात सादरीकरण केलं, आणि विशेष म्हणजे या संस्थेची स्थापना सदर कुंपणाच्या निर्मितीमध्ये कळीची भूमिका निभावणाऱ्या ए. ओ. ह्यूम यांनी केली होती.
"ते कुंपण परिपूर्ण आणि अभेद्य व्हावं, असं खास ब्रिटिश पछाडलेपण त्यांच्यात होतं," असं पाल्मर सांगतात. "आम्ही सादरीकरण करत होतो, तेव्हा ह्यूम यांचं छायाचित्र तिथल्या भिंतीवर होतं. हे असं असं घडल्याचं आपण मान्य करणं गरजेचं आहे, आपण याकडे लक्ष द्यायला हवं, असं आम्ही इतक्या वर्षांनी सांगायचा प्रयत्न करत होतो."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








