You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणेंविरोधात मातोश्रीने युवा सेनेला रस्त्यावर उतरवण्याची ही आहेत कारणं...
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टिका केली आणि युवासेनेनं मुंबईत रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं. शिवसेना सत्तेत आहे तरीसुद्धा वेळआल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राडा केल्याच दिसून आलंय.
अयोध्येतल्या रामंदिर भूमी खरेदी प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून जूनमध्ये शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेली हणामार हे त्याचं ताजं उदाहरण आहे.
पण राणेंच्या विरोधाल्या आंदोलनात मात्र शिवसेनेनं युवासेनाला पुढे केलं. शिवसेनेचे मुंबईतले नगरसेवक, आमदार, नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनापासून थोडे दूरच राहीले. असं का? काय आहेत त्याची कारणं? या आंदोलनात युवासेनेलाच पुढे का करण्यात आलं? याचीच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहेत.
युवासेनेचा जन्म कसा झाला?
युवासेनेचा जन्म झाला 2010 साली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना राजकारणात लॉंच केलं. युवासेनेची धुरा आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर सोपवण्यात आली. त्याचवेळी शिवसेनेची तरुणांची आघाडी असलेली भारतीय विद्यार्थी सेना विसर्जीत केली.
युवासेनेच्या जन्माआधी राज ठाकरेंच्या नेतृत्वात स्थापन झालेली भारतीय विद्यार्थी सेनाच (BVS) शिवसेनेची तरुण आघाडी होती.
राजकीय विश्लेषक सांगतात, शिवसेनेची आधीची ही तरुण आघाडी प्रचंड आक्रमक होती. रस्त्यावर राडा, आंदोलनं आणि मोर्चासाठी त्यांचे कार्यकर्ते नेहमीच तयार असायचे.
याउलट युवासेनेचा स्थापनेपासूनच चेहरा मवाळ दिसून आला आहे. युवासेनेने शिक्षण, नागरीसुविधांसारख्या मुद्द्यांना हात घालत राजकारणात हातपाय पसरायला सुरूवात केली.
राणेंविरोधातील आंदोलनाने युवासेनेला उभारी मिळाली?
नारायण राणेंविरोधातील आंदोलनात शिवसेना कार्यकर्ते, नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसून आले नाहीत. नारायण राणेंच्या घराबाहेर युवासेनाच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
राजकीय जाणकर सांगतात, पहिल्यांदाच राजकीय आंदोलनात युवासेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
वरिष्ठ राजकीय विश्लेषक अतुल कुलकर्णी म्हणतात, "राणेंच्या आंदोलनामुळे युवासेनेचं पुनरूज्जीवन झालंय."
आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ आणि युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर आंदोलन केलं. शिवाय मुंबईत ठिकठिकाणी पोर्स्टर लाऊन राणेंचा विरोध केला.
याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर सांगतात, "युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण झालंय. राणेंवरील कारवाईमुळे शिवसैनिकांमध्ये पुन्हा जोश निर्माण झालाय."
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात युवासेनेला कॉरपोर्ट लूक मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी रंगते. शिवसेनेचा हिंसक चेहरा अशी ओळख पुसून टाकण्याचा आदित्य ठाकरेंचा प्रयत्न आहे, असं शिवसेना नेते नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात.
"राणेंविरोधातील आंदोलनात फक्त जुहूमध्ये युवासेना आक्रमक झाली. पण, दादरला आंदोलन झालं का? आंदोलनाचा कॉल संपूर्ण युवासेनेचा होता का?" असा सवाल राजकीय विश्लेषक संजीव शिवडेकर विचारतात.
संजीव शिवडेकर पुढे म्हणतात, राणेंविरोधात आंदोलन हा युवासेनेचा स्व:तची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
राणेंविरोधात मातोश्रीने युवा सेनेलाच पुढे का केलं?
नारायण राणेंविरोधातील आंदोलनात शिवसेना नेते, कार्यकर्ते, आमदार, नगरसेवक दिसून आले नाहीत. रस्त्यावर आंदोलन करताना युवासेनेचे कार्यकर्ते दिसून येत होते.
राजकीय विश्लेषक याची 3 प्रमुख कारणं सांगतात,
1) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
2) युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री आहेत.
3) शिवसेना सत्तेत असल्याने पक्षावर आंदोलन करण्यासाठी बऱ्याच मर्यादा आहेत.
याबाबत रवींद्र आंबेकर सांगतात, "युवासेनेच्या माध्यमातून आंदोलन केल्यामुळे शिवसेनेला पक्षाचा आक्रमकपणा टिकवता आला. नारायण राणेंना हे प्रकरण किती गांभीर्याने घेतलं गेलंय असा संदेशही देण्यात आला."
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर नारायण राणेंनी थेट आदित्य ठाकरेंवर आरोप केला होता. मात्र, त्यावेळी शिवसेनेला राणेंना उत्तर देता आलं नव्हतं.
"वरूण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ असल्याने घरातीलच व्यक्ती आहेत. त्यामुळे शिवसेना किंवा महिला आघाडीवर रस्त्यावरील आंदोलनाची जबाबदारी न देता वरूण यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असं स्पष्ट दिसतंय," असं आंबेकर पुढे म्हणाले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवसेना सत्तेत आहे. शिवसेनेने आंदोलन केलं असतं तर टिका झाली असती. त्यामुळे युवासेनेला राणेंविरोधातील आंदोलनात पुढे करण्यात आलं.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप आचार्य सांगतात की, "शिवसेना सत्तेत असल्याने राणेंविरोधातील आंदोलन शिवसेनेच्या अंगावर न घेता युवासेनेच्या अंगावर टाकण्यात आलं."
राणेंविरोधातील आंदोलनानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राजकीय जाणकाराचं मत आहे की आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे शिवसेना युवासेनेला वेगळं म्हणू शकत नाही.
संजीव शिवडेकर याबाबत सवाल उपस्थित करतात, "युवासेनेला शिवसेना वेगळी कसं म्हणू शकते? विद्यार्थी सेना असं कसं म्हणू शकते?"
शिवसेनेत आंदोलन करण्यासाठी नेता नाही?
या आंदोलनात शिवसेनेचा एकही मोठा नेता उतरलेला दिसून आला नाही. ठाण्यातले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे तर या दरम्यान त्यांच्या शेतात काम करत असल्याचं वृत्त काही वाहिन्यांवर झळकलं.
यावर संदीप आचार्य म्हणतात, "शिवसेनेत आता ताकदवान नेते नाहीत. शाखा हा शिवसेनेचा आत्मा होती. पण शाखा आणि विभागप्रमुख स्तरावर पक्षाकडून ताकद देण्यात आलेली नाही. त्यामुळे, युवासेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर दिसले."
"एककाळ असा होता की, आंदोलनासाठी शिवसेना शाखेतून शिवसैनिक वारूळासारखे बाहेर पडायचे. आता ते शिवसैनिक नाहीत. ते शिवसैनिक कुठे गेले?" असा सवालही ते उपस्थित करतात.
राज ठाकरेंच्या मनसेचं आव्हान?
शिवसेनेची मुंबई महापालिकेवर गेली 30 वर्षं सत्ता आहे. पण, 2017 च्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली.
मुंबईत भाजपची झालेली वाढ शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसमोर एक मोठं आव्हान आहे.
शिवसेना आणि मनसे या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढतात. दोन्ही पक्षांचा मतदार सारखाच असल्याने मतांची विभागणी होते. ज्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होतो.
त्यात, मनसे आणि भाजपचं सख्य जमल्याची चर्चा सुरू झालीये. भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.
यावर राजकीय विश्लेषक रवींद्र आंबेकर म्हणाले, "राणेंच्या अटकेमुळे शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना होईल. 'वोट कटुआ पार्टी' म्हणून भाजप, मनसेचा निश्चित वापर करेल. राज ठाकरेंनी शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकेल."
मनसेची स्थापना केल्यापासून तरूणवर्ग राज ठाकरेंकडे आकर्षित झालेला दिसून येतो. राजकीय जाणकार म्हणतात, तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे.
"तरूणाईचा जोश आणण्यासाठी शिवसेनेला युवासेनेला अधिक आक्रमक करून मैदानात उतरवणं कधीही फायद्याचं राहिल," असं रवींद्र आंबेकर यांना वाटतं.
तरुण विरुद्ध प्रस्थापित असा संघर्ष?
युवासेनेने नारायण राणेंविरोधात रस्त्यावर उतरून केलेल्या आंदोलनाकडे तरुण विरुद्ध प्रस्थापित असा संघर्ष म्हणून पाहायला पाहिजे, असं संजीव शिवडेकर यांना वाटतं.
पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. 2017 च्या निवडणुकीत युवासेनेच्या पदरी फार काही पडलं नव्हतं. त्यामुळे युवासेना नाराज होती.
राजकीय विश्लेषक म्हणतात, मुंबईतील शिवसेनेच्या 92 नगरसेवकांपैकी फासरे कुणी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरला नाहीत.
संजीव शिवडेकर म्हणतात, येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत युवासेना प्रस्थापित नेत्यांना तिकीटासाठी टक्कर देईल.
या आंदोलनाच्या माध्यमातून युवासेनेला आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ आहोत, हे दाखवण्याची संधी मिळालीये असं राजकीय जाणकारांच मत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)