भीमा कोरेगाव प्रकरण : 15 जणांविरोधात देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाचा प्रस्ताव #5मोठ्या बातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1) भीमा कोरेगाव प्रकरण : 15 जणांविरोधात देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाचा प्रस्ताव

एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या 15 जणांविरोधात 'देशाविरुद्ध युद्ध पुकारण्या'चा आरोप लावण्याचा निर्णय राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) घेतला आहे. हा आरोप सिद्ध झाल्यास याची कमाल शिक्षा मृत्यूदंडाची असते.

देशाविरोधात युद्ध पुकारण्यासह राष्ट्रद्रोह, समाजात वैर पसरवणं, गुन्ह्याचा कट रचणं, तसंच यूएपीएअंतर्गत असलेले कलमांअन्वये सुद्धा आरोप ठेवण्यात आले आहेत.

इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. NIA ने या महिन्याच्या सुरुवातीलाच विशेष कोर्टासमोर आरोपांचा मसुदा सादर केला होता.

या आरोपांच्या मसुद्यानुसार, 'आरोपींनी सार्वजनिक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हत्या किंवा तशी स्थिती निर्माण करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र जमवण्याचा कट रचला.'

प्राथमिक चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांनी त्यांच्या प्रस्तावित आरोपपत्रात म्हटलं होतं की, 'हे शस्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.

NIA च्या अधिकाऱ्याने सांगितलं की, या मसुद्यात अचूक आरोप लावण्यात आलेले नाही आणि या प्रकरमात गोळा करण्यात आलेले पुरावे सुनावणीचा भाग असतील. पुणे पोलिसांनी एक पत्र सापडल्याचंही सांगितलं होतं.

NIA ने आरोप ठेवला आहे की, 15 आरोपी बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेशी संबंधित आहेत.

31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदेचा उद्देश दलित आणि इतर जातींमध्ये भावना भडकवून महाराष्ट्र, भीमा कोरेगाव आणि पुणे जिल्ह्यात जातीच्या नावावर हिंसा, अस्थिरता आणि आराजकता पसरवणं हा होता, असा आरोप NIA ने लावला आहे.

तसंच, "M-4 (अत्याधुनिक शस्त्र) साठी 8 कोटी रुपये जमवण्याचा कट रचला होता. त्याचसोबत, देशातील सर्व विद्यापीठांमधून दहशतवादी कारवायांसाठी विद्यार्थ्यांना जोडलं गेलं."

ज्येष्ठ विचारवंत आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुरावे मिटवण्याचा आरोपही लावण्यात आलाय. या आरोपांच्या मसुद्यात फादर स्टेन स्वामी यांचाही उल्लेख आहे. स्वामी यांचं गेल्या महिन्यात पोलीस कोठडीतच मृत्यू झाला.

2. जनआशिर्वाद यात्रेतले मंत्री बाटगे; सामनातून राणेंना टोला

मोदी सरकारने त्यांच्या मंत्र्यांची जन आशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्या जत्रेत विरोधकांना शिव्याशाप देण्याचं काम सुरू आहे. या जनआशिर्वाद यात्रेतले अर्धे मंत्री हे विचार आणि आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल परवा भाजपमध्ये घुसले आणि मंत्रिपदाची हळद लावून बोहल्यावर चढले. हे उपरे भाजपचा प्रचार करत आहेत. वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते या जत्रेत येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत. 'सामनाच्या अग्रलेखातून' केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

2024चे लक्ष्य ठीक आहे पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे प्रयोग विरोधकांनाही करावे लागतील. मोदीनामाची जादू उतरली आहे. 2024चा जय पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची रंगीत तालीम करावी लागेल. नाहीतर जनआशिर्वादाच्या जत्रा लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील.

विरोधी पक्षांची मोट बांधून ठोस कार्यक्रम घेऊन जाणं गरजेचं आहे. मोदी-शहा पराभूत होऊ शकतात हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. बिहारमध्ये रडीचा डाव नसता तर तेजस्वी यादव भारी पडलाच असता. देशातील वातावरण विरोधी पक्षांना अनुकूल होत आहे. भारतात मोदी आहेत म्हणून तालिबान नाही. हा असला प्रचार करणाऱ्या जत्रा मंत्री-संत्री करत आहेत. त्या सगळ्या नौटंकीविरोधात एकत्र येणं गरजेचं आहे.

3. मंत्रालयात विष प्यायलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

मंत्रालयात एका शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या गेटवर कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

सुभाष जाधव असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं राहत होते. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 च्या बेतात सुमारास सुभाष जाधव मंत्रालयाच्या परिसरात आले होते. त्यानंतर गार्डन परिसरात पोहोचल्यानंतर त्यांनी कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कीटनाशक प्राशन केल्यानंतर सुभाष जाधव जमिनीवर कोसळले. याच परिसरात तैनात असणाऱ्या पोलिसांच्या लक्षात ही बाब आली.

सुभाष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिले होते. सावकराने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली होती असं त्या पत्रात म्हटलं होतं. याबद्दल त्यांनी मंचर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पण, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. सावकराने त्यांच्या जमिनीवर कब्जा केला आणि राहते घर सुद्धा पाडून टाकले. त्यांनी मुद्दल देण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असं सुभाष जाधव यांनी पत्रात नमुद केलं होतं.

काही वर्षांपूर्वी धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.

4. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या

पारनेरच्या ती देवरे यांच्या बाजूने उभे राहण्यावरून महसूल कर्मचाऱ्यांत फूट पडली आहे. देवरे यांच्यावरील अन्यायाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी 23 ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांच्या संघटनेनं दिला आहे.

देवरे यांची बदली करा किंवा आमची तरी तालुक्याबाहेर बदली करा, अन्यथा 25 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पारनेर तालुका तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दिला आहे. तहसीलदार देवरे राजकीय दृष्टया सक्रीय असल्यासारख्या वागतात, असा गंभीर आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

पारनेर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदार देवरे यांच्या मनमानी कारभाराविरोधात 15 मे 2020 रोजीच निवेदन दिलं होतं. त्यानंतर प्रांताधिकारी सुधाकर भोसले आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. करोनाची परिस्थिती असल्याने आंदोलन करून नये, अशी विनंती केली होती. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित ठेवले. मात्र, त्यात आम्ही अपेक्षित केलेल्या कारभारातील सुधारणा अद्याप झालेल्या नाहीत.

लोकसभा-विधानसभा निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक तसंच कोविड सेंटरसाठी कर्मचाऱ्यांनी खिशातून केलेल्या खर्चाची बिले अद्याप मिळालेली नाहीत. देवरे यांची महिलांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दडपशाहीचं धोरण आहे. दबाव टाकून चुकीची कामे करून घेतात. नियोजन शून्य आणि राजकीय दृष्टया सक्रीय होऊन त्या कामकाज करतात. त्यामुळे पूर्वीपासून कर्मचारी त्यांच्या कारभाराला वैतागलेले आहेत, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी देवरे यांची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लोकप्रतिनिधींच्या दबावाला कंटाळून आत्महत्येचा इशारा त्यांनी दिला होता. या क्लिपमध्ये त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचं नाव घेतलं नाही मात्र संशयाची सुई राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यादिशेने होती.

5. शैली सिंगला रौप्यपदक

World U-20 athletics championship स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमासह भारताच्या शैली सिंगने देशाला वर्ल्ड अंडर 20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून दिले. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.

झाशीच्या शैली सिंगने 6.59 या नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक जिंकले. ती भारताची दिग्गज अॅथलेटिक अंजू बेबी जॉर्जच्या बेंगळुरू येथील अकादमीत सराव करते. या स्पर्धेत स्वीडनच्या 18वर्षीय माजाने 6.60 मीटर सह सुवर्णपदक जिंकले. या चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक जिंकणारी शैली तिसरी भारतीय खेळाडू आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)