उदयनराजेः मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा टाईमपास आता बंद करा #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा टाईमपास आता बंद करा - उदयनराजे

"राज्य सरकारने आता थापा मारणं, मराठा समाजाला भूलथापा देणं बंद करावं. राज्य सरकारने मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा टाईमपास बंद करून प्रत्यक्ष कृती करावी," अशा शब्दात राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

उदयनराजे यांनी एक भलीमोठी पोस्ट फेसबुकवर लिहून राज्य सरकारवर निशाणा साधला.

"केंद्राने 127 व्या घटनादुरुस्तीचं विधेयक मंजूर केलं. यामध्ये राज्याला आरक्षणाचे अधिकार दिले आहेत. त्यासंदर्भातील कायदा राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवला असून, लवकरच त्याला मंजूरी मिळून कायदा अस्तित्वात येईल.

या घटनादुरूस्तीमुळे राज्य सरकारला एखाद्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता थापा मारणे बंद करून मराठा समाजाला भूलथापा देणं बंद करावं," असं उदयनराजेंनी म्हटलं.

तसंच, "केंद्राकडे बोट न दाखवता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रत्यक्ष कृती सुरू करावी. राज्य सरकारने मराठी आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याची सवय आता बंद करावी," असं उदयनराजे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका - उद्धव ठाकरे

"राज्यातील कोव्हिड संसर्ग संपलेला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलिकडे वाढू दिला नाही.

आता केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावं, म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावं लागणार आहे.

या परिस्थितीत आपल्या कोणत्याही वर्तणुकीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका," असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केलं आहे.

आगामी काळात सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना यासंदर्भात इशारा दिला.

"राज्यातील पहिल्या दोन कोरोना लाटा रोखण्यात आपण यशस्वी ठरलो. यात आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे," असं ठाकरे म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. भाजपची जनआशीर्वाद यात्रा नव्हे तर जन-छळवणूक यात्रा - पेडणेकर

केंद्रात नव्याने मंत्री झालेले महाराष्ट्रातील चार नेते राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत.

पण ही जनआशीर्वाद यात्रा नसून जन-छळवणूक यात्रा असल्याची टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन 19 ऑगस्ट रोजी जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

"भाजप कोरोना काळात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहे. पण जनता त्यांना कंटाळलेली असल्याने त्यांना आशीर्वाद मिळणार नाही.

त्यामुळे ही जन-छळवणूक यात्रा ठरेल. राज्यातील मंदिरे उघडण्यात आलेली नाही. तिथंही काळजी घेतली जात आहे.

त्यामुळे मंदिरे उघडण्याऐवजी भाजपने दिल्लीतून लशी आणण्यासाठी प्रयत्न करावेत," असं पेडणेकर यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.

4. तामिळनाडूत मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी नेमल्यानंतर वाद

तामिळनाडूत अनेक मंदिरांमध्ये सरकारकडून ब्राह्मण वगळता इतर समाजातील पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने वादाला तोंड फुटलं आहे.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत.

दरम्यान, कोणत्याही ब्राह्मण पुजाऱ्यांना त्यांच्या जागेवरून हटवण्यात आलं नसून केवळ रिक्त ठिकाणी नव्या पुजाऱ्यांची नेमणूक केल्याचं स्पष्टीकरण स्टॅलिन यांनी विधानसभेत दिलं.

विविध मंदिरांमधील पुजाऱ्यांच्या नियुक्ती करताना सर्व जातींना प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्टॅलिन यांनी म्हटलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

5. पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB च्या छाप्यामुळे खळबळ

भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने कारवाई केली.

ACBने थेट महापालिका भवनातील स्थायी समिती कक्षात छापा टाकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

स्थायी समितीची बैठक सुरू होताच छापा टाकण्यात आला. स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायक कक्षात सध्या 'एसीबी'चे अधिकारी ठाण मांडून असून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

तसेच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षामध्येही एसीबीचे अधिकारी झडती घेतल्याची माहिती समोर आली. पण संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

या प्रकारामुळे पुण्यात खळबळ माजल्याचं दिसून आलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)