You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंकजा मुंडेच्या कार्यकर्त्यांनी 'अंगार-भंगारची' घोषणाबाजी केली कारण...
"काय अंगार-भंगार घोषणा लावलीय, दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरू आहे का?" असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्याच कार्यकर्त्यांवर ओरडल्या.
केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी आजपासून (16 ऑगस्ट) भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. परळीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची यात्रा सुरू होण्याआधीच मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली.
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. तेव्हा पंकजा मुंडे भडकल्या आणि म्हणाल्या, "काय अंगार-भंगार घोषणा लावलीय, दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरू आहे का? मला शोभत नाही हे वागणं. माझ्या उंचीची लायकी ठेवा नाहीतर यायचं नाही मला भेटायला."
एवढंच नाही तर 'असं वागायला मी शिकवलं का?' असाही प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. "ही पद्धत आहे का वागायची? घरंदाज माणसं आहे आपण. मी शिकवलं तुम्हाला असं वागायला? मला असं चालणार नाही," असंही त्या म्हणाल्या.
आज (16 ऑगस्ट) सकाळी भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. त्याठिकाणी मुंडेंचे कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. भाजपची यात्रा सुरू होण्यापूर्वीच भागवत कराड यांना मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
6 ते 21 ऑगस्टदरम्यान भाजपची जनआशिर्वाद यात्रा करणार असल्याची माहिती भागवत कराड यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.
मुंडे कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे का?
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा सुरू होती. मात्र शपथविधीच्या दिवशी त्यांचं नाव यादीमध्ये नसल्याचं समजलं.
तसंच प्रीतम मुंडे दिल्लीत होत्या अशीही चर्चा झाली. त्यावेळी त्यांची बहीण पंकजा मुंडे यांनी मात्र असं काहीही झालं नसल्याचं स्पष्ट करत प्रीतम मुंबईतच असल्याचे ट्वीटरवरून स्पष्ट केलं होतं.
"खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतमताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत," असं ट्वीट त्यांनी केलं होतं.
परंतु यानिमित्ताने भागवत कराड यांची कारकीर्द आणि त्यांच्या मंत्रिपदामुळे भाजपने ओबीसी, वंजारी समाजाच्या नेत्याला प्रतिनिधित्व देण्याची संधी साधली का? तसंच पंकजा मुंडे यांना हा शह आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
हे वाचलंत का?
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)