नवी मुंबईत मुलीने आईची हत्या करण्याचं कारण काय?

हत्या

फोटो स्रोत, coldsnowstorm

अभ्यासाचा सारखा तगादा लावते, म्हणून रागाच्या भरात नवी मुंबईत, 15 वर्षांच्या मुलीने आईची हत्या केली. तर, नाशिकमध्ये लहान मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नाही, म्हणून आईने मुलाचा खून करून, आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीये.

नवी मुंबई पोलिसांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा आरोप असलेली मुलगी अल्पवयीन असल्याने, तिला ज्युवेनाईल कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, आई-वडिलांच्या अपेक्षांचा भार आणि अभ्यासासाठी टाकण्यात येणारा दबाव, ही मुलं सहन करू शकत नाहीत. यामुळे, मुलांच्या मनावर परिणाम होतो. ज्याचं रूपांतर आई-वडील विरुद्ध मूल अशा मानसिक संघर्षात होतं.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात, "पालक विरुद्ध मूल या संघर्षात, 75 टक्के प्रकरणात आई-वडीलांचं समुपदेशन करावं लागतं."

अभ्यासाचा तगादा लावते म्हणून आईची हत्या?

नवी मुंबई पोलिसांनी आईची हत्या करण्याच्या आरोपाप्रकरणी 15 वर्षांच्या मुलीवर हत्येचा गुन्हा दाखल केलाय.

पण, आईच्या हत्येमागे अभ्यासाचा सारखा तगादा लावणं हेच खरं कारण आहे? यालाच कंटाळून रागाच्या भरात तिने हे पाऊल उचललं? याबाबत आम्ही नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांच्याशी संपर्क केला.

ते म्हणाले, "या मुलीची आई, अभ्यास कर असं सारखं सांगायची. त्यामुळे, मुलगी आणि आई यांच्यात कुरबुरी व्हायच्या हे खरं आहे."

ही मुलगी अल्पवयीन असल्याने, पोलिसांनी तिला अद्याप अटक केलेली नाही.

हत्या, कायदा, मानसिक आरोग्य, महिला
फोटो कॅप्शन, या सोसायटीत हा प्रकार घडला

पोलीस अधिकारी योगेश गावडे पुढे सांगतात, "या मुलीने कराटेसाठी वापरण्यात येणाऱ्या बेल्टने, आईचा गळा आवळून हत्या केली. ही मुलगी अल्पवयीन असल्याने तिला ज्युवेनाईल कोर्टासमोर हजर केलं जाईल."

वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात, या मुलीचं समुपदेशन करून तिला विश्वासात घेतल्यानंतर या मुलीने घडलेली पूर्ण घटना पोलिसांना सांगितली.

नक्की काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात 30 जुलैला घडली.

मुलीने आई दरवाजा उघडत नाही असं वडिलांना सांगितलं. वडील कामानिमित्त बाहेर असल्याने महिलेचा भाऊ घरी आला. तर, महिला घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती कराटेत वापरण्यात येणारा बेल्ट गुंडाळला होता.

हत्या

फोटो स्रोत, Peter Dazeley/getty

मृत महिलेच्या भावाने, बहिणीने पाठवलेला शेवटचा मेसेज पोलिसांना दाखवला. यावरून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली. पण, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिलेच्या डोक्यावर जखम असून, गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.

त्यानंतर, पोलीस चौकशीत या मुलीने, आई अभ्यासासाठी तगादा लावत असल्याने सारखी भांडणं होत असल्याची माहिती दिली. अभ्यास करत नाही म्हणून आईने मारलं होतं, अशी माहिती या अल्पवयीन मुलीने चौकशी दरम्यान दिली.

पोलीस अधिकारी सांगतात, "भांडण झाल्यानंतर मुलीने आईला ढकललं. आईच्या डोक्याला मार लागला. आई पुन्हा मारायला येईल या भीतीने, मुलीने आईच्या हातातील कराटेचा बेल्ट हिसकावून कथितरीत्या गळा आवळून हत्या केली."

अभ्यासावरून आई आणि मुलीत या आधीदेखील भांडण झालं होतं. प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं. पोलिसांनी आई आणि मुलगी दोघींचं समुपदेशन केलं, अशी माहिती नाव न घेण्याच्या अटीवर पोलीस अधिकारी देतात.

अभ्यास करत नाही म्हणून मुलाचा खून, आईची आत्महत्या

नाशिकमध्ये, साडेतीन वर्षांचा मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नाही, म्हणून रागाच्या भरात आईने मुलाचा खून करून आत्महत्या केल्याची घटना घडलीये.

हत्या

फोटो स्रोत, PsychoBeard/getty

या घटनेची माहिती देताना इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश माईनकर सांगतात, पोलीस तपासात समोर आलंय की, "लहान मुलगा अभ्यास करत नसल्याचा राग आईला होता. त्यामुळे, त्यांची खूप चीडचीड होत होती. त्यातूनच, त्यांनी मुलाचा खून करून आत्महत्या केली."

पोलिसांच्या माहितीनुसार, 9 ऑगस्टला नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली. मुलाचा खून केल्यांतर या महिलेने गळफास लावून आत्महत्या केली.

वृत्तसंस्थेशी बोलताना या मुलाचे वडील म्हणाले, "साडेतीन वर्षांचा मुलगा केजीमध्ये शिकत होता. शाळा ऑनलाईन होती. पण, मुलगा ऑनलाईन क्लासला बसत नव्हता. शाळेकडून सतत विचारणा होत होती. याचा मोठा मानसिक दबाव आईवर होता."

"75 टक्के प्रकरणात करावं लागतं पालकांचं समुपदेशन"

अभ्यासावरून पालक आणि मुलांमध्ये होणारा हा संघर्ष काही नवीन नाही. पण, गेल्याकाही वर्षात हा संघर्ष वाढत गेल्याचं दिसून येतंय.

हत्या

फोटो स्रोत, Giles Clarke/getty

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात, "पालकांकडून मुलांवर टाकला जाणारा अपेक्षांचा भार, मुलं आणि पालकांमध्ये दुरावा निर्माण होण्याचं प्रमुख कारणं आहे. गेल्याकाही वर्षात पालक आणि मुलांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने हा दुरावा अधिक जास्त वाढलाय."

स्पर्धात्मक युगात मुला-मुलीने सर्वोत्तम करावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. तज्ज्ञ म्हणतात, आई-वडिलांची ही इच्छा चुकीची नक्कीच नाही. पण, पालकांनी आपली इच्छा-अपेक्षा मुलांवर थोपवणं किंवा जबरदस्ती लादणं योग्य ठरणार नाही.

पालक आणि मुलांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची अनेक प्रकरणं आपण समाजात पहातो.

मानसोपचारतज्ज्ञांकडे अशी अनेक प्रकरणं समुपदेशनासाठी येतात. ज्यात पालकांची तक्रार असते, मुलगा-मुलगी अभ्यास करत नाही किंवा त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही.

डॉ. सागर पुढे सांगतात, "बहुतांश प्रकरणात दिसून येतं की, मुलांवर पालकांच्या अपेक्षांचा भार फार जास्त असतो. पालक आणि मुलांची अपेक्षा वेगळी असते. त्यामुळे 75 टक्के प्रकरणात, पालकांचं समुपदेशन करणं महत्त्वाचं असतं."

तज्ज्ञ सांगतात, "काही पालक आपल्या मुलाने हेच केलं पाहिजे असा तगाधा लावतात. आपल्या अपेक्षेत फेरबदल करण्याची त्यांची तयारी नसते, त्यावेळी मुल आणि पालक यांच्यात संघर्ष सुरू होतो आणि हळूहळू वाढत जातो. ज्यामुळे असे प्रकार घडतात."

लॉकडाऊनमुळे वाढला मुलांवर तणाव

मित्र-मैत्रिणींची भेट नाही. आपल्या समवयीन मुलांशी संपर्क नाही, खेळ नाही. बाहेर जाणं नाही, त्यामुळे मुलांमध्ये एकटेपणा वाढल्याचं दिसून येतंय.

पालक

फोटो स्रोत, Getty Images

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपा म्हणतात, "कोरोनामुळे मुलांना शाळेत जाता येत नसल्याने त्यांची चीडचीड होतेय. त्यामुळे पालकांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा. मुलांशी संवाद साधला पाहिजे. त्यांची भावनिक गरज समजून त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे."

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन, निर्बंध, शाळा बंद असल्याने गेले वर्षभरापासून मुलं घरीच आहेच. यामुळे, मुलांच्या मानसिक स्वास्थावर परिणाम होऊ लागलाय.

डॉ. हरिष शेट्टी मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते म्हणतात, "कोरोना संसर्ग, निर्बंध, लॉकडाऊन, ऑनलाईन शिक्षण आणि आर्थिक नुकसान यामुळे आपण सर्व प्रेशर-कूकरसारखं आयुष्य जगत आहोत."

मुलांमध्ये चीडचीडेपणा वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे, शाळा बंद असणं, डॉ. शेट्टी म्हणाले. मुलांच्या मानसिक आरोग्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे, असं ते पुढे म्हणतात.

वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर सांगतात, "काही मुलं जास्त हट्टी असतात. त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पालक जास्त कठोर होतात. पण, यामुळे विषय अधिक चिघळतो. पालकांनी मुलांचे लाड आणि कठोरता यात समतोल साधायला हवा."

त्या पुढे म्हणतात, "अभ्यासावरून मुलांचा इतरांसमोर अपमान केला जातो. काही पालक मुलांना मारतात. याचा मुलांवर परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी मुलांशी सौम्य भाषेत संवाद साधला पाहिजे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)