मैत्री : 'जवळच्या' लोकांपेक्षा फारशी ओळख नसलेल्यांशी तुम्हाला जास्त बोलावं वाटतं का?

फोटो स्रोत, Alamy
- Author, इआन लेस्ली
- Role, लेखक
घनिष्ठ मैत्री महत्त्वाची असते, पण प्रासंगिक ओळखींची जाळी आनंद, ज्ञान व आपुलकीच्या जाणिवेला चालना देणारी ठरतात, असं संशोधनातून दिसतं.
जवळपास 10 वर्षं मी दर सोमवारी संध्याकाळी हौशी गीतगायन मंडळामध्ये तालमींना जातो आहे. सोमवार हा काही माझा आवडता वार नाही.
अनेकदा मी बिघडलेल्या मनस्थितीत तालमीला जातो, पण तालीम संपताना मला नव्याने उत्साह आलेला असतो. गाण्यातून माझ्यावर सकारात्मक परिणाम होतो. तसंच लोकांमुळेही मला ऊर्जा मिळते.
काही अपवाद वगळता या गीतगायन मंडळातले बहुतांश सहसदस्य माझे घनिष्ठ मित्र अथवा मैत्रिणी नाहीत. त्यातील बहुतेकांना तर मी जेमतेम ओळखतो. आम्ही थोड्याफार गप्पा मारतो, एकमेकांकडे पाहून स्मित करतो आणि क्वचित हास्यविनोद होतो- पण माझ्या मनात जगाबद्दल थोडी चांगली भावना निर्माण होण्यासाठी एवढंसं पुरतं.
सध्या या गाण्याच्या तालमी होत नाही आणि आता दीर्घ काळ त्या होणारही नाहीत. मला त्यामुळे चुकचुकल्यासारखं वाटतं. टाळेबंदीच्या काळात मला ममत्व किंवा भावनिक आधाराचा तुटवडा वाटला नाही, पण स्नेहशील चेहरे आणि अनपेक्षितपणे सहजगत्या होणाऱ्या संभाषणांची उणीव मात्र जाणवते. थोडक्यात मला ओझरत्या अनुबंधांची (weak-ties) उणीव भासते.

फोटो स्रोत, Alamy
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक मार्क ग्रॅनोव्हेटर यांनी 1973 साली 'द स्ट्रेन्थ ऑफ वीक टाइज' (ओझरत्या अनुबंधांचं सामर्थ्य) या शीर्षकाचा एक शोधनिबंध प्रकाशित केला. समाजशास्त्रामधील आत्तापर्यंतच्या सर्वांत प्रभावी शोधनिबंधांमध्ये त्याची गणना केली जाते. व्यक्तीचं स्वास्थ्य मुख्यत्वे घनिष्ठ मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय यांच्यासोबतच्या संबंधांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं, असं अभ्यासकांनी तोवर गृहित धरलं होतं. ग्रॅनोव्हेटर यांनी संबंधांची संख्याही अर्थपूर्ण असल्याचं दाखवून दिलं.
कोणत्याही व्यक्तीच्या सामाजिक जगाचा विचार करताना दोन वर्तुळं समोर येतात. अंतर्गत वर्तुळामधील लोकांशी आपण अनेकदा बोलतो आणि त्यांना आपण जवळचे मानतो, तर बाह्य वर्तुळामध्ये आपल्याला अधूनमधून किंवा ओझरते दिसणारे परिचित लोक असतात. ग्रॅनोव्हेटर यांनी या गटांना "सक्षम अनुबंध" आणि "ओझरते अनुबंध" असं संबोधलं आहे. नवीन माहिती आणि कल्पनांसाठी सक्षम अनुबंधांपेक्षा ओझरते अनुबंध अधिक महत्त्वाचे असतात, ही त्यांनी दिलेली प्रमुख मर्मदृष्टी आहे.
ग्रॅनोव्हेटर यांनी बोस्टनस्थिती 282 कामगारांचं सर्वेक्षण केलं आणि यातील बहुतांश कामगारांना ओळखीच्या कोणातरी व्यक्तीमार्फत नोकरी मिळाल्याचं त्यांना आढळलं. पण केवळ मोजक्याच कामगारांना जवळच्या मित्रमैत्रिणीमुळे नोकरी मिळाली होती- 84 टक्के कामगारांना त्यांच्या ओझरत्या अनुबंधांमधील व्यक्तींमुळे, म्हणजे क्वचितप्रसंगी भेटणाऱ्या व ओझरता संपर्क असलेल्या लोकांमुळे काम मिळालं होतं. आपण ज्या लोकांसोबत अधिक वेळ घालवतो ते आपल्यासारखीच माहिती राखून असतात, याकडे ग्रॅनोव्हेटर लक्ष वेधतात. आपल्या निकटवर्तुळापलीकडच्या संधींबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपण स्नेहशील परक्यांवर अवलंबून असतो- त्यामुळे अशा आपल्या परिचयातील लोकांची संख्या जितकी जास्त असेल तितकं चांगलं.
कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमुळे लोकांच्या ओझरत्या अनुबंधांवर आणि त्यातून त्यांना मिळणाऱ्या लाभांवर थेट परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. या संकटामुळे स्वतःची कार्यपद्धती बदलणं भाग पडलेल्या कंपन्या कदाचित कायमस्वरूपी घरातून काम करण्याची आणि आभासी कार्यस्थळांची रचना स्वीकारतील, अशी शक्यता दिसते. याचा कामगारांना अनेक अंगांनी लाभ होईल, कामाची लवचिकता वाढेल, पण याचा एक संभाव्य तोटा असा आहे की, त्यांची सामाजिक जाळी आकुंचित होतील.
प्रत्यक्षातील कार्यालयांमुळे समोरासमोरच्या औपचारिक बैठकी शक्य होतातच, शिवाय आपले व्यावसायिक ओझरते अनुबंध असलेल्या व्यक्तींशी योगायोगाने भेटी होतात- निराळ्या शब्दांत सांगायचं तर, प्रत्यक्ष कामावेळी आपला ज्या लोकांशी फारसा जवळून संबंध येत नाही, पण ज्यांच्या कामाचा आपल्या कामावर परिणाम होत असतो असे लोक भेटण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Alamy
काही कंपन्यांमध्ये निरनिराळ्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या एकमेकांशी योगायोगाने भेटी व्हाव्यात अशा रितीने जाणीवपूर्वक कार्यालयाची रचना केलेली असते. स्टीव्ह जॉब्स यांच्या देखरेखीखाली ज्या पिक्सर इमारतीची रचना करण्यात आली, त्यामागची कल्पनादेखील हीच होती. या इमारतीमध्ये एका मोठा मध्यवर्ती हॉल आहे आणि दररोज सर्व कर्मचाऱ्याना तिथून अनेकवेळा जा-ये करावी लागते. आपल्या सहकाऱ्यांच्या एकमेकांशी अवचित भेटीगाठी व्हाव्यात, त्यांनी सोबत कॉफी प्यावी आणि सहज गप्पागोष्टी कराव्यात, असं जॉब्स यांना वाटत होतं. या सहजगत्या होणाऱ्या संभाषणांमधूनच सर्जनशीलतेला वाव मिळतो, अशी त्यांची धारणा होती.
ओझरते अनुबंध असलेल्या व्यक्तींशी भेटीगाठी होणं आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठीही चांगलं असतं. गिलियन सँडस्ट्रॉम मानसशास्त्रात पदवी करत असताना टोरान्टोमध्ये राहत होत्या, तेव्हा त्यांना अनेकदा विद्यापीठाच्या दोन इमारतींमध्ये ये-जा करावी लागत होती आणि वाटेत त्यांना एक हॉटडॉग स्टँड लागायचा. "त्या स्टँडवर हॉटडॉग विकणाऱ्या महिलेकडे पाहून मी नेहमी स्मित करायचे आणि तिला 'हाय' म्हणायचे," असं सँडस्ट्रॉम सांगतात. "आमच्यात कधीच संभाषण झालं नाही, पण माझी दखल घेतली जातेय, आपण कुठेतरी जोडलेले आहोत अशी जाणीव मला त्यातून व्हायची- आणि त्याने मला चांगलं वाटायचं."
सँडस्ट्रॉम सध्या एसेक्स विद्यापीठात मानसशास्त्राच्या वरिष्ठ व्याख्यात्या आहेत. विद्यार्थीदशेतल्या वरच्या घटनेतून प्रेरणा घेत त्यांनी ओझरत्या अनुबंधांमधून लोकांना किती प्रमाणात आनंद मिळतो याचा शोध घेतला. अनेक वेगवेगळ्या दिवशी घडणाऱ्या आपल्या सामाजिक अन्योन्यक्रियांच्या नोंदी ठेवण्याची सूचना त्यांनी संबंधित प्रतिसादकांच्या समूहाला केली. ओझरत्या अनुबंधांची व्यापक जाळी असलेले प्रतिसादक एकंदरित अधिक आनंदी होते, असं त्यांना आढळलं. स्थानिक कॉफीविक्रेता, शेजारी, योगा शिकवणीतील सहभागी सदस्य- यांसारख्या ओझरत्या अनुबंधांच्या पातळीवरील संपर्क ज्या दिवशी अधिक यायचा त्या दिवशी ते अधिक आनंदी असायचे, आणि एकंदरित त्यांच्यात आपुलकीची जाणीवही जास्त होती.
टाळेबंदीमुळे अशा संपर्कांच्या शक्यता कमी झाल्या आहेत. आपण बाहेर वावरत असतो तेव्हा ओझरत्या अनुबंधांच्या शक्यता निर्माण होतात, विशेषतः गाणं म्हणणं किंवा सायकल चालवणं यांसारख्या कृती करत असताना या अन्योन्यक्रिया घडतात. इटली आणि स्कॉटलंडमधील प्रतिसादकांच्या आधारे 2016 साली मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं की, एखाद्या खेळासाठीचा संघ किंवा चर्चमधील समुदाय यांसारख्या गटांचे सदस्य असलेल्या लोकांना अधिक अर्थपूर्ण आणि सुरक्षित वाटत होतं. राष्ट्रीयत्व किंवा वय यांच्या अलाहिदा हे निष्कर्ष दिसून आले. कोणतीही व्यक्ती जितक्या अधिक गटांची सदस्य होती तितकं तिला अधिक अर्थपूर्ण व सुरक्षित वाटत असल्याचंही त्यातून स्पष्ट झालं.

फोटो स्रोत, Alamy
सध्या बहुतांश क्लब व सांप्रदायिक संघटनांना कार्यक्रम घेण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे, आणि नजीकच्या काळात असे कार्यक्रम सुरू होण्याची शक्यताही कमी आहे. आता आपण नियमितपणे गर्दीच्या रस्त्यांवरून भटकत नाही किंवा कॅफेत आणि बारमध्ये लोकांशी आपल्या अचानक भेटीगाठी होत नाहीत. म्हणजे कमी खर्चिक, कमी जोखमीच्या संभाषणांची उणीव आपल्या सर्वांनाच जाणवते आहे. "काही वेळा आपल्या चांगल्या ओळखीच्या लोकांशी बोलणं अवघड जातं, कारण अशा संभाषणांमध्ये भावनिक ओझंही बाळगावं लागतं," असं स्टँडस्ट्रॉम म्हणतात. "ओझरते अनुबंध असलेल्या लोकांशी बोलणं हलकंफुलकं आणि कमी तणावदायक असतं."
सर्व दिवस एकसारखेच वाटत असताना अशी संभाषण नावीन्याचा स्त्रोतही ठरू शकतात. सँडस्ट्रॉम यांची एक सहकारी व्यक्ती दर आठवड्याला तिच्या कुटुंबीयांसोबत व्हिडिओ-चॅट करते. "पण आता त्यांच्यात बोलण्यासारखे विषय कमी-कमी होत चालले आहेत, कारण कोणीच सध्या काही विशेष करत नाहीये," असं स्टँडस्ट्रॉम सांगतात.
ग्रॅनोव्हेटर यांच्या अभ्यासातून दिसून आल्यानुसार, आपल्याला आपली बहुतांश नवीन माहिती ओझरत्या अनुबंधांमधून मिळते. त्यातून आपल्याला उत्तेजना मिळतेच, शिवाय अस्थिर काळामध्ये कसं वागावं याचं मार्गदर्शनही मिळतं. उदाहरणार्थ, ओझरत्या अनुबंधांच्या अवकाशात विविध प्रकारची संभाषणं केल्याने लोकांना टाळेबंदीच्या काळात जीवनातील विविध अडचणींशी कसं जुळवून घ्यायचं हे शिकता येतं.
या सर्व कारणांचा विचार करता आपण टाळेबंदीमध्ये आणि त्यानंतरही ओझरते अनुबंध विकसित करण्यासाठी प्रयत्न करत राहायला हवेत. सामाजिक अंतर राखणं अनिवार्य असलेल्या परिस्थितीतही आपले अधिक दूरचे स्नेही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. "इतर लोक परिस्थितीशी कसे जुळवून घेत आहेत, ते काय करतायंत, याबद्दल आपल्या सर्वांनाच कुतूहल वाटतं. कसं वागावं हे ठरवण्यासाठीही आपल्याला याची मदत होते," असं स्टँडस्ट्रॉम सांगतात.
ओझरत्या अनुबंधांमधील संभाषणांना समाजमाध्यमं हा उपयुक्त पर्याय ठरू शकतो, असं त्या म्हणतात. हलक्याफुलक्या पण अर्थपूर्ण संभाषणांसाठी आपण ओझरता परिचय असलेल्या लोकांशी समाजमाध्यमांद्वारे संपर्क साधू शकतो. सक्षम अनुबंध असलेल्या व्यक्तींशीही आपण ओझरत्या अनुबंधांच्या शैलीत अधिक संवाद साधू शकतो. पूर्ण संभाषण करायचं नसेल तर लोक कसे वागतात, हे यातून ताडता येतं. जास्त वेळ, ऊर्जा किंवा लक्ष खर्च न करता इतरांविषयी आपल्याला काय वाटतं हे त्यांना सांगणं, हे यामागचं उद्दिष्ट असावं, असं सँडस्ट्रॉम सांगतात.
कोरोनाची जागतिक साथ ओसरल्यावर आपण प्रासंगिक परिचयाची जाळी पुन्हा तयार करायला घेणं आवश्यक आहे. आपली फारशी ओळखही नसलेल्या लोकांशी बोलून आपल्याला बरंच काही शिकता येतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








