राज ठाकरे-चंद्रकांत पाटीलः राज ठाकरेंनी 'ही' भूमिका बदलल्याशिवाय युतीची चर्चा नाही

राज ठाकरे, मनसे, भाजप, चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, MNS

फोटो कॅप्शन, राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील
    • Author, दीपाली जगताप, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर पोहोचले आहेत. यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि मनसेमध्ये युती होण्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा झाली असं स्पष्ट केलं.

सध्या कोणत्याही युतीचा प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेण्यासाठी ही बैठक होती. राज ठाकरे यांची परप्रांतियांविषयीची भूमिका बदलल्याशिवाय त्यांच्याशी युतीची चर्चा होऊ शकत नाही असं चंद्रकांत पाटील या भेटीनंतर म्हणाले.

राज ठाकरे यांची एक जुन्या भाषणांची क्लिप त्यांनी मला ऐकवली होती, त्यावंतरही काही मुद्दे माझ्या मनात शिल्लक होते, ते मुद्दे घेऊन चर्चा झाली असंही पाटील यांनी स्पष्ट केले. राजकीय चर्चा युतीवर झाली नाही तर ती एकमेकांच्या भूमिकेवर झाली असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

ही सदिच्छा भेट असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं असलं तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे यांनी नुकताच पुणे आणि नाशिकचा दौरा केला. कोणत्याही पक्षाकडून युतीसाठी प्रस्ताव नसल्याचं आतापर्यंत मनसेकडून सांगण्यात येत होतं. पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज ठाकरेंची भेट घेत असल्याने मनसे आणि भाजपमध्ये युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "राज ठाकरे यांची परंप्रांतियांविषयी असलेल्या भूमिकेबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यांनी व्यापक भूमिका घ्यावी . राजकारणात कोणत्याही पर्यायावर कायमस्वरुपी फुली मारता येत नाही."

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

फोटो कॅप्शन, चंद्रकांत पाटील राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर जाताना...

उत्तर प्रदेशात काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे मनसेची राज्यातील परप्रांतियांबाबत असलेली भूमिका भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे युतीचा निर्णय घेण्यापूर्वी भाजप पक्षश्रेष्ठी याबाबत विचार करतील असं जाणकार सांगतात. त्यामुळे दोन्ही नेत्यांची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

भाजप-मनसे युती होणार?

ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांसंदर्भातील भूमिका जाहीर आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांआधी राज ठाकरेंसोबत जाताना भाजपचे नेतृत्व विचार करेल. पण अप्रत्यक्ष युतीची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. मनसेच्या प्रबळ जागा आहेत त्याठिकाणी भाजप प्रबळ उमेदवार देणार नाही आणि भाजपच्या जागांसाठी मनसे सुद्धा उमेदवार देणार नाही अशा पद्धतीने एकत्र येणं शक्य आहे का? असा विचार होऊ शकतो."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

ते पुढे सांगतात, "भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांना भेटत आहेत. त्याअर्थी युतीचा निर्णय सकारात्मकदृष्टीने पुढे जात असल्याचं सध्यातरी चित्र आहे. दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. भाजप आणि मनसे यांच्या अनेक भूमिका एकसमान आहे. राज ठाकरे यांची वाढ हिंदुत्ववादी पक्षातच झालीय. मराठी माणसाच्या मुद्याची अडचण एवढे वर्षं शिवसेनेसोबत असताना भाजपला कधीही झाली नाही. त्यामुळे आताही ती अडचण येणार नाही."

युती केली तर सगळ्याच ठिकाणी करावी लागेल. परंतु भाजपसोबत गेल्यानंतर मात्र मनसेला परप्रांतियांची तीव्र भूमिका सौम्य करावी लागणार असंही ते सांगतात.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली

मराठी माणसाने मुंबईत घर सोडून जाऊ नये असं आवाहन नुकतेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी दोन्ही पक्ष एकत्र तयारी करत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे. काही जागांच्या बाबतीत महाविकास आघाडीत समन्वय असू शकतो असाही अंदाज वर्तवला जात आहे.

खरं तर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून राज ठकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे. गेल्या दीड वर्षांत मनसे हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकल्याचंही दिसून आलं. पक्षाच्या वर्धापनदिनी मनसेने पक्षाचा झेंडा सुद्धा बदलला.

अयोध्या राम मंदिर पायाभरणीनंतर ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं. गेल्यावर्षी मार्च महिन्यात राज ठाकरे यांनीही अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले होते. यामुळे मनसे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली.

कोरोना काळात विरोधक म्हणून भाजपसोबत मनसेनेही ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमधील निर्बंधांवरून मुंबई मनसे आक्रमक होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून कारभार चालवतात अशी टीका सुद्धा मनसे नेत्यांकडून करण्यात आली.

युतीचा फायदा कोणाला होणार?

भाजपानं मनसेला सोबत घेतलं तर तीन मुद्द्यांवर फायदा होऊ शकतो असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात,

राज ठाकरे-उद्धव ठाकरे
फोटो कॅप्शन, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस एकाच छायाचित्रात

एक म्हणजे गेल्या दोन मुंबई महापालिकेच्या निवडणुका जर पाहिल्या तर दोघांच्या मतांमधलं अंतर लक्षणीय कमी झालं आहे. तो जो फरक आहे, तो भाजपाला कमी करायचा आहे. त्यासाठी मनसेची त्यांना मदत होऊ शकते.

दुसरं म्हणजे, जर 2017 ची गेली निवडणूक पाहिली तर भाजपाला पश्चिम आणि पूर्व उपनगरांत मोठं यश मिळालं होतं. पण मध्य मुंबईत कमी मतं मिळाली होती. तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता त्यावर जर हल्ला करायचा आहे तर मनसेच्या मदतीचा त्यांना फायदा होईल.

भाजपाला आणखी एक गरज आहे ती म्हणजे मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर काम करायची. मराठीचबद्दलच्या जुन्या भूमिकांमुळे ते मराठीविरोधी अशी प्रतिमा तयार झाली आहे आणि त्याचा सेना कायम फायदा घेत आली आहे. आता जर मनसेसारखा संपूर्ण एक मराठीवादी पक्ष त्यांच्यासोबत आला तर ही जुनी प्रतिमा बदलण्यास भाजपाला फायदा होईल.

मनसेला भाजपमुळे नवसंजीवनी मिळवण्याची संधी असल्याचंही जाणकार सांगतात. युतीमुळे केंद्रात सत्ता असलेल्या राष्ट्रीय पक्षाची साथ मनसेला मिळेल. भाजपकडे शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फौज आहे, केंद्रात सरकार असल्याने आर्थिक बाजू भक्कम आहे याचाही मनसेला फायदा होईल असं संदीप प्रधान सांगतात.

त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात आज नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)