राज ठाकरे - देवेंद्र फडणवीस भेटीनंतर मनसे हिंदुत्वाच्या मार्गाने भाजपबरोबर जाणार का?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

'राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो,' अशी विधानं करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी सध्या 'धुरळा' उडवलाय.

मंगळवारी संध्याकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. आणि मनसे-भाजप अशी नवी सोयरिक महाराष्ट्राच्या राजकारणात घडून येण्याचे संकेत दिले.

शिवसेनेनं भाजपची साथ सोडणं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घेणं, इथेच मनसे स्वत:साठी नवी राजकीय संधी शोधते आहे. ती संधी साधण्यासाठीच आता मनसे हिंदुत्वाकडे झुकेल आणि भाजपचा राज्यातला नवा पार्टनर होईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

23 जानेवारीच्या मेळाव्यात राज ठाकरे आपल्या पक्षाची नवी राजकीय भूमिका स्पष्ट करतील, असं म्हटलं जातंय.

'मनसेसाठी एका तपानंतर आवश्यक आमूलाग्र बदल केले जातील', 'राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो', अशा आशयाची विधानं बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मनसे नेते माध्यमांशी बोलतांना गेल्या काही दिवसांमध्ये करत आहेत.

भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यावर नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेनं भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेटही घेतली होती.

अशा अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांची शक्यता वर्तवली जाते आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"नांदगावकर म्हणाले ती खरीच गोष्ट आहे. राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू वा कायमचा मित्र नसतो," असं मनसे नेते संदीप देशपांडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले. "महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपण हे पाहिलं आहे - काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी एकत्र आले. महाराष्ट्रात शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र येताना आपण पाहिलं. जो काही निर्णय असेल तो राजसाहेब जाहीरपणे सांगतील," देशपांडे म्हणाले.

अर्थ स्पष्ट आहे, मनसेनं सगळे पर्याय खुले ठेवले आहेत आणि भाजपसोबत जाण्याचं ते नाकारत नाही आहेत.

भाजपसोबत जाण्याच्या या पर्यायासोबतच त्याला सुसंगत अशा हिंदुत्ववादाकडेही 'मनसे' वळणार असल्याची चिन्हं आहेत. त्याचाच एक भाग म्हणून निळा, भगवा आणि हिरवा अशा तीन रंगांचा तिरंगा असणारा या पक्षाचा झेंडा आता संपूर्ण भगवा होणार असल्याचं सांगितलं जातंय.

अर्थात 'मनसे'चा कोणताही नेता हे अधिकृतरीत्या सांगत नाहीये, पण मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलच्या फोटोतून हा झेंडा आता गायब झाला आहे आणि त्या जागी केवळ त्यांचं निवडणूक चिन्ह 'रेल्वे इंजिन' ठेवण्यात आलं आहे. नव्या झेंड्यात भगव्या रंगाच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्राही दिसणार असल्याचीही चर्चा आहे.

राज ठाकरे, मनसे, राजकारण

फोटो स्रोत, Getty Images

भाजप असेल वा हिंदुत्व, मनसे आता शिवसेना महाविकास आघाडीत समावेशानंतर तयार झालेली राजकीय संधी घेण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेनेला पर्याय म्हणून मनसे आता राजकीय भूमिका बदलेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ती प्रत्यक्षात येते आहे.

ही शक्यता दोन मुद्द्यांवर आधारित आहे - त्यातला एक म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व. शिवसेनेनं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यावर त्यांना स्वत:च्या आक्रमक हिंदुत्वापासून फारकत घ्यावे लागते आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांना नरमाईची भूमिकाही घ्यावी लागत असल्याचं दिसतंय. त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे शिवसेनेकडे गेलेला आणि आता बदललेल्या भूमिकेमुळे नाराज झालेला मतदार आणि कार्यकर्ता आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न मनसे करत असल्याचं दिसतं आहे.

राज ठाकरेंनी आपण हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नसल्याचं वारंवार म्हटलं आहे आणि मनसेच्या झेंड्यातला भगवा रंग त्याच हिंदुत्वाचा असल्याचंही म्हटलं होतं. आता ती हिंदुत्ववादी भूमिका अधिक प्रकर्षानं पुढे येऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न होईल, असं म्हटलं जातं आहे.

शरद पवार-राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

दुसरा मुद्दा हा की, शिवसेनेमुळे रिकामी झालेल्या भाजपच्या मित्रपक्षाची जागा घेणं. भाजपला शिवसेनेला उत्तर देण्यासाठी 'मनसे'सारखा मित्र हवा आहे. दुसरीकडे वारंवार येणाऱ्या निवडणुकांतल्या अपयशातून बाहेर पडण्यासाठी मनसे नव्या मित्राच्या शोधात आहे, असं गेल्या काही काळापासून दिसतं आहे.

त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळेस मोदी-शाहांविरोधात प्रचार करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात आघाडीत ते सामील होतील, अशी शक्यता होती. मनसे आघाडीत तर गेली नाही, मात्र काही जागांवर त्यांनी एकमेकांना पाठिंबा दिला.

या काळात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात वाढलेली जवळीक हाही चर्चेचा मुद्दा ठरला. कधी काळी त्यांची भाजपच्या नेत्यांशी असलेली जवळीक हाही अशा चर्चांना निमित्त ठरली होती. पण तेव्हा सेना भाजपच्या सोबत होती. आता मनसेसाठी राजकीय मित्र मिळवण्याची नेमकी संधी निर्माण झाली आहे.

राज्यात 105 आमदार असलेला आणि केंद्रात सत्ता असलेला भाजपसारखा मित्रपक्ष मनसेला संघटनात्मकदृष्ट्याही बळ देऊ शकतो.

पण गेल्या काही काळात, विशेषत: लोकसभा निवडणुकीदरम्यान, राज ठाकरेंनी मोदी-शाह आणि भाजपविरोधी जाहीर भूमिका घेतली होती. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी राज्यभर केलेल्या सभा आणि भाषणं भाजपाचा जिव्हारी लागली होती. त्यामुळेच नंतर त्यांना 'कोहिनूर' प्रकरणात 'ईडी'ची नोटीस आल्याचं म्हटलं गेलं होतं. ती टीका आता भाजप आणि मनसेच्या होऊ घातलेल्या मैत्रीत बाधा ठरेल का?

मनसेच्या नेत्यांना असं वाटत नाही. त्यांच्या मते स्थानिक पातळीवरचे निर्णय वेगळ्या प्रश्नांवर केले जातात. "लोकसभेच्या वेळेस केलेली टीका ही भाजपवर केलेली टीका नव्हती तर मोदींवर केलेली टीका होती. राजसाहेबांनी त्यावेळेस भाषणात 'मोदीमुक्त भारत' झाला पाहिजे असं म्हटलं होतं. ते एका व्यक्तीबद्दल होतं. पक्षाबद्दल आम्ही काही म्हटलं नव्हतं. स्थानिक पातळीवर प्रश्न वेगळे असतात, समीकरणं वेगळी असतात. त्यादृष्टीनं स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात. जर युतीसारखा मोठा निर्णय घ्यायचा असेलच तर तो राजसाहेबच घेतील," संदीप देशपांडे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंनी मोदी-शाह आणि भाजपविरोधी जाहीर भूमिका घेतली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंनी मोदी-शाह आणि भाजपविरोधी जाहीर भूमिका घेतली होती.

जर 23 जानेवारीच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी अशी नवी भूमिका घेतलीच तर त्याचा मनसेच्या राजकारणावर परिणाम कसा होईल?

पत्रकार धवल कुलकर्णी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर The Thackeray Cousins हे पुस्तक लिहिलंय. त्यांच्या मते हिंदुत्वाचं राजकारण मर्यादा आणतं आणि त्याचा फटका इतिहासाकडे पाहिलं तर शिवसेनेलाही बसला आहे.

"अशी भूमिका जर राज ठाकरेंनी घेतली तर सातत्याचा अभाव जो त्यांच्यात दिसतो, तो पुन्हा एकदा दिसेल. दुसरं म्हणजे, हिंदुत्वाची भूमिका तात्कालिक फायदा मिळवून देते, पण त्यामुळे तुम्हाला ताकदीचा स्थानिक पक्ष होण्याला मर्यादा येतात. शिवसेनेनं त्यांच्या मध्यात ही भूमिका घेतल्यानं त्यांना 'DMK' सारखा पक्ष होता आलं नाही. त्यांनी एक संधी गमावली. राज यांच्या पक्षाची स्थापना भाषिक मुद्द्यांतून झाली. पण तेही आता शिवसेनेच्याच रस्त्यावर जाताना दिसताहेत," धवल कुलकर्णी म्हणतात.

मनसेनं भाजपसोबत जाण्याबाबतही त्यांना तसंच वाटतं. "जणू इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. शिवसेनाही अनेक पक्षांच्या वेळोवेळी पाठिंबा देत, सोबत घेऊन पुढे जात राहिली. राज यांनीही अगोदर मोदींना पाठिंबा दिला होता, नंतर त्यांच्या विरोधात प्रचार केला. मला वाटतं, भाजपसोबत जाण्यासारख्या कोणताही निर्णय त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करेल," धवल म्हणतात.

राज ठाकरे, मनसे, राजकारण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे

ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते दर कालांतरानं नवीन भूमिका घेणं हे 'मनसे'च्या मतदाराला पटणं अवघड जाईल. "अनपेक्षितपणे या विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे मनसेला मतं मिळाली आहेत, ती पाहता लोकांना वाटतंय की राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरून पाय रोवावेत. एक पर्याय तयार करावा, पण ते जर कोण्या एका पक्षाच्या आघाराला जाणार असतील तर त्याचे काही तात्कालिक फायदे असतात, पण मर्यादा अनेक असतात," नानिवडेकर म्हणतात.

"भाजपच्या बाजूनं पाहिलं तर ते परत सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जिथे मतं शिवसेनेच्या विरोधात जातील तिथं भाजपापेक्षा मनसेला ते मतदार निवडतील. त्यांना मनसे अधिक जवळची वाटेल. ही भाजपची व्यूहरचना आहे आणि म्हणून त्यांना मनसे सोबत हवी आहे. राज ठाकरेंना हेही समजून घ्यावे लागेल," नानिवडेकर म्हणतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)