चिपळूण पूर : पर्यावरण मंत्री असून तुम्ही काय केलं? चिपळूणकरांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात... #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. पर्यावरण मंत्री असून तुम्ही काय केलं? चिपळूणकरांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात...

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काल (29 जुलै) चिपळूण दौऱ्यावर गेले होते. पण तिथं त्यांना संतप्त चिपळूणकरांच्या थेट प्रश्नांचा सामना करावा लागल्याचं दिसून आलं.

यादरम्यान नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय नम्रपणे उत्तर देत आदित्य ठाकरे यांनी त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला.

गेल्या आठवड्यात महापुराशी दोन हात करणाऱ्या चिपळूणकरांचं जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण यादरम्यान त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर गेले होते.

त्यानंतर काल आदित्य ठाकरे यांनी चिपळूणचा दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी एका नागरिकाने त्यांना थेट प्रश्न विचारला. "तुम्ही नुसतेच पर्यावरण मंत्री, इकडे काय घडलं ते पाहायला तुम्ही येत नाही. पूल वाहून गेला. वशिष्ठी नदीत गाळ साचला आहे. पर्यावरण मंत्री असून तुम्ही काय केलं?" असं या नागरिकाने म्हटलं.

या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनीही शांतपणे उत्तर दिलं. "मला आमदारांनी त्याबाबत सांगितलं आहे. मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. लवकरच ते काम होऊन जाईल. मी आता येत राहील," असं उत्तर देत आदित्य ठाकरे तिथून पुढे निघाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. पुढील चार दिवस कोकणात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

आगामी चार दिवस कोकणासह पश्चिाम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.

गेल्या 23 तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.

त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असं वेधशाळेने म्हटलं.

पण पावसाचा इशारा देण्यात आलेला असला तरी कोणत्याही प्रकारचं अलर्ट जारी करण्यात आलं नाही. चार दिवसांनी म्हणजेच ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होईल, असं हवामान विभागाने सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात हायकोर्टात धाव, 25 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

पॉर्नोग्राफी प्रकरणात उद्योजक राज कुंद्रा यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांवर निशाणा साधला आहे.

माध्यमांनी आपल्याविरोधात बदनामीकारक आणि तथ्यहीन वृत्त प्रकाशित केली. त्यामुळे सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांवर प्रकाशित होणाऱ्या बातम्यांवर अंकुश लावण्याची मागणी शिल्पा शेट्टी यांनी केली आहे.

शिल्पा शेट्टी यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये यामध्ये फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह काही वेब चॅनल आणि वर्तमानपत्रांनाही प्रतिवादी केलं गेलं आहे.

या प्रकरणामुळे माझी प्रतिष्ठा आणि चारित्र्यहनन होत असून माझ्या व्यावसायिक, कौटुंबिक आणि सामाजिक सन्मानाचा भंग केला जात आहे, असा आरोप या याचिकेतून केला गेला आहे.

मानहानी करणाऱ्या वृत्तांकनावर अंकुश लावावा, शिवाय अशा प्रकारच्या बातम्या देणाऱ्या माध्यमांकडून 25 कोटींची नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणीही शिल्पा शेट्टीने केली. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

4. विमा कंपन्यांना 72 तासांची सक्ती करता येणार नाही - कृषी आयुक्त

एखाद्या संकटामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासांतच द्यावी लागेल, अशी सक्ती विमा कंपन्यांना करता येणार नाही, अशी ठाम भूमिका महाराष्ट्राचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी घेतली आहे.

झालेल्या नुकसानीची माहिती वेळेत न दिल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम अनेकवेळा टाळली जाते. या समस्येवर आयुक्त धीरज कुमार यांनी लक्ष वेधलं.

राज्यात सतत पावसामुळे खंडित वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा यांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांना 72 तासांचा आग्रह धरता येणार नाही. शेतकरी आपल्या पीकाच्या नुकसानीची माहिती कोणत्याही कृषी कार्यालयात देऊ शकतात, असं धीरज कुमार म्हणाले. ही बातमी अॅग्रोवनने दिली आहे.

5. भास्कर जाधवांना 2024 ला दाखवून देऊ - निलेश राणे

कोकणातील पूरस्थिती आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून चिपळूणचे आमदार भास्कर जाधव आणि राणे कुटुंबीयांमध्ये जुंपली आहे.

याप्रकरणी भास्कर जाधव यांना 2024 च्या निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला.

"नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं कुणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असंच प्रत्येक आई-बापाला वाटत असेल", असं भास्कर जाधव म्हणाले होते.

त्याला प्रत्युत्तर देताना निलेश राणे म्हणाले, "मदत मागायला आलेल्या महिलेला मारायला जाणाऱ्या भास्कर जाधव यांनी कुणाच्या संस्कृतीबद्दल बोलू नये." ही बातमी लोकसत्ताने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)