आशा कंडारा : स्वच्छता कर्मचारी ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास

    • Author, सुशिला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं, असं म्हणणाऱ्या आशा कंडारा स्वतःच त्याचं मूर्तीमंत उदाहरणही आहेत.

राजस्थानच्या जोधपूरमधील 40 वर्षांच्या आशा कंडारा यांनी जुलै 2021 मध्ये राजस्थानच्या प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत 728 वा क्रमांक मिळवला. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी पुन्हा शेयर करत आहोत.

आशा कंडारा यांचे वडील राजेंद्र कंडारा फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अकाऊंट ऑफिसर होते. तर त्यांच्या आई गृहिणी होत्या, असं त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

घरात शिक्षणाला महत्त्व दिलं जात होतं. पण एकत्र कुटुंब आणि सामाजिक दबावामुळं बारावीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लग्न करण्यात आलं.

आशा यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलण्याची इच्छा नाही. पण त्यांचा घटस्फोट झाला तेव्हा त्यांचं वय 32 होतं आणि त्यांना दोन मुलं झालेली होती, असं त्यांनी सांगितलं.

त्या माहेरी परतल्या तेव्हा कुटुंब त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं होतं. पण या वयात दोन मुलं झाल्यानंतर घटस्फोट घेणं नातेवाईक आणि समाजाला मात्र पटत नव्हतं.

घटस्फोटाला नातेवाईकांचा विरोध

''आयुष्यं जणू एकाच ठिकाणी अडकलं होतं, असं वाटत होतं. घटस्फोटाच्या मुद्द्यावरुन नातेवाईक आमच्या विरोधात उभे ठाकले. कुटुंबाचं नाव खराब केलं असं म्हणत होते. पण ही वेळच वाईट आहे, ती निघून जाईल असं मला कुटुंबीय समजावत होते. माझं कुटुंब माझ्या निर्णयाच्या पाठिशी उभं होतं,'' असं त्या सांगतात.

"मध्यमवर्गीय कुटुंबात घटस्फोट ही मोठी बाब असते. त्यामुळं मला काय सहन करावं लागलं असेल ते तुम्ही समजू शकता," असं आशा सांगतात.

आशा यांनी 2013 मध्ये पुन्हा एकदा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये त्यांनी पदवी पूर्ण केली.

''मी नोकरी मिळण्यासाठी परीक्षा देत होते, तेव्हा लोक मला टोमणे मारायचे, तु कलेक्टर बनणार का? तुझ्या खानदानात कोणी बनलंय का? असं म्हणायचे.

कलेक्टर कुणाला म्हणतात ते मला माहितीही नव्हतं. मी गुगलवर सर्च केल्यानंतर कलेक्टर कोण असतं ते कळलं. लोक टोमणे मारत आहे, कुणीच प्रोत्साहन देणार नाही, हे मला माहिती होतं. त्याचवेळी प्रशासकीय सेवेत जायचं असं ठरवलं. त्यासाठी माझं वय तेव्हा जास्त होतं. त्यामुळं मी राजस्थान प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली. यात घटस्फोटीत महिलांसाठी वयाचं बंधन नसतं,'' असं आशा यांनी सांगितलं.

आशा यांनी 2018 मध्ये राजस्थानच्या प्रशासकीय सेवेसाठी अर्ज केला होता.

'2018 मध्ये मी जेव्हा पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला तेव्हा त्यात मला यश मिळालं. त्यानंतर मी मुख्य परिक्षेसाठी फॉर्म भरला. त्याचवेळी महानगर पालिकेतही माझी नियुक्ती झाली. त्यासाठी मी आधीच फॉर्म भरला होता. मी त्याठिकाणी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम सुरू केलं होतं,' असं त्या सांगतात.

मुलांची काळजी घेऊन घरखर्च भागवण्यासाठी मला मदत हवी होती. त्यामुळं नोकरी करणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं होतं.

'झाडू मारण्याचं काम मला कधीही लहान वाटलं नाही,' असं आशा म्हणतात.

"माझ्या हाती महानगर पालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी होती, पण प्रशासकीय सेवेच्या मुख्य परीक्षेचा निकाल आलेला नव्हता."

''सकाळी सहा वाजता निघायचं. स्वच्छता करून घरी परतायचं हे फार कठीण होतं. नोकरीनंतर अभ्यास करणं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याही थकवणारं होतं. पण कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळं मी परिश्रम करत राहिले. घरचे मला आराम करायला सांगत होते. पण मी शरीराला कमी झोपण्याची सवय लावली होती. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे आणि पहाटेच कामाला निघून जात होते,'' असं आशा सांगतात.

त्यांच्या प्रयत्नांना फळ आलं. त्यांनी मुख्य परीक्षेतही यश मिळवलं. त्यामुळं मुलाखतीतही यश मिळेल याची प्रेरणा त्यांना मिळाली आणि झालंही तसं.

आशा यांनी अद्याप स्वच्छता कर्मचारी म्हणून मिळालेल्या नोकरीचा राजीनामा दिलेला नाही. त्या यशस्वी होऊ शकतात तर कोणतीही महिला यशस्वी होऊ शकते, असं त्यांचं मत आहे.

आशा यांच्याकडून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे, असं जोधपूर महानगर पालिकेच्या महापौर विनिता सेठ म्हणतात.

'स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करताना नोकरीवरून घरी गेल्यानंतर घरची काम करायची आणि नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणं हे अत्यंत कठीण होतं. त्या सकाळपासून बाहेर गेलेल्या असायच्या. त्यामुळं आजूबाजूचे लोक त्याबद्दलही बोलायचे. पण आशा यांनी सर्वांची तोंडं बंद केली आहेत,' असं सेठ म्हणाल्या.

त्यांच्या मते, एका महिलेनं जीवनात अनेक संघर्षांचा सामना केल्यानंतर, तिनं असं यश मिळवणं ही मोठी बाब आहे. चूल आणि मूल यालाच आपलं नशीब मानून आयुष्य घालवणाऱ्या महिलांसाठीही आशा यांचं जीवन हे अत्यंत प्रेरणादायी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)