पेगाससचा हल्ला आणीबाणीपेक्षाही भयंकर- सामनातून टीका #5मोठ्याबातम्या

पेगासस, इस्रायल, भारत, अमित शहा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सायबर हल्ला

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. पेगाससच हल्ला आणीबाणीपेक्षाही भयंकर- सामना

पेगासस हा निवडक भारतीयांवर झालेला सायबर हल्ला आहे आणि तो केंद्र सरकारच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

पेगासस प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार? या सर्व प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी ही पहिली मागणी. सर्वोच्च न्यायालयाने स्यू मोटो दाखल करून घेऊन स्वतंत्र चौकशी करावी.

त्यातच राष्ट्रहित आहे. पण राष्ट्रहित वगैरे गोष्टींची कोणाला पडली आहे का? पेगाससचा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. पेगाससचे खरे बाप आपल्याच देशात आहेत. त्यांना शोधा असं अग्रलेखात पुढे म्हटलं आहे.

इस्रायल भारताचा मित्र असल्याचं आपण समजत होतो. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात ही मैत्री जास्तच घट्ट झाली. त्याच इस्रायलच्या पेगाससने आपल्याकडच्या दीड हजारहून प्रमुख लोकांचे फोन चोरून ऐकल्याचं हे प्रकरण आहे.

उद्योगपती, राजकारणी, पत्रकार अशा लोकांचे फोन टॅप करण्यात आले. अमेरिकेत वॉटरगेट प्रकरण घडलं तेव्हा त्यांचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना पद सोडावं लागलं. वॉटरगेटपेक्षा पेगासस गंभीर आणि भयंकर आहे.

राजकीय शत्रूंवर पाळत ठेवण्यासाठी पेगाससची सेवा भारतात कुणी विकत घेतली होती? देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं.

राष्ट्राचे चार स्तंभ आहेत त्यांच्यावरच पाळत ठेवण्यात आली. स्वातंत्र्य आणि नितीमत्ता नसलेल्या मूठभर लोकांनी केलेलं हे कृत्य आहे, असं सामनाने म्हटलं आहे.

2. मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणार; अदानी समूहाचं स्पष्टीकरण

मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणार असल्याचं अदानी समूहाने स्पष्ट केलं आहे.

मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचं मुख्यालय अहमदाबादला स्थलांतरित केलं अशा बातम्या येत होत्या.

अदानी उद्योगसमूह, मुंबई विमानतळ, गौतम अदानी

फोटो स्रोत, IAN HITCHCOCK

फोटो कॅप्शन, अदानी उद्योगसमूह

मुख्यालाय अहमदाबादला हलवण्याबाबतच्या केवळ अफवा आहेत. मुंबईबाबत आम्हाला सार्थ अभिमान आहे, मुंबईच्या रोजगार निर्मितीसाठी अदानी समूह कायम प्रयत्नशील राहणार असल्याचंही समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 'झी न्यूज'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा संकटात आलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहाने स्वत:कडे घेतला आहे. तसेच नव्याने नवी मुंबई विमानतळाचा ताबाही एएचएलकडे आहे.

3. राज्यात घरगुती मीटर स्मार्ट होणार

राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलत आहे.

मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

मीटर रीडिंग घेण्यासाठी प्रत्यक्ष कर्मचारी पाठवण्याची गरज राहणार नाही. वापरलेल्या विजेची डेटा हिस्ट्री एका क्लिकवर मिळेल. वीज चोरीला आळा बसेल. मीटरसोबत छेडछाड होत असेल तर ती लगेच पकडता येईल.

मोबाईलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल.

वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रि पेड मीटरमध्ये तर जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल.परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल.

4. भगवा रंग आणि शिवमुद्रा- मनसे सैनिकांना मिळणार नवी ओळख

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 'मनसेसैनिक' आता नव्या नावाने ओळखले जाणार आहे. आता यापुढे मनसेसैनिक 'महाराष्ट्र सैनिक' म्हणून ओळखले जाणार आहेत.

तसा बॅच लावूनच राज ठाकरे यांनी या नव्या पक्षीय अभियानाची सुरूवात आज पुण्यातून केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या मनसेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 'लोकमत न्यूज18' ने ही बातमी दिली आहे.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Facebook@mns Adhirkrut

राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाचा पहिला बिल्ला लावून घेण्याचा पहिला मान हा मनसेचे शहराध्यक्ष आणि पक्षाचे कार्यक्रम नगरसेवक वसंतराव मोरे यांना मिळाला.

खरंतर पक्षाचा असा हा बिल्ला छातीवर लावण्याची परंपरा आजवर फक्त शेतकरी संघटनेत होती. पण मनसेत देखील महाराष्ट्र सैनिकाचा बिल्ला अभिमानाने मिरवला जाणार आहे.

या भगव्या बिल्ल्यावर मध्यभागी शिवमुद्रा वरती पक्षाचं नाव आणि खालती 'महाराष्ट्र सैनिक' असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलंय.

5. दीपक चहरची शानदार खेळी, भारतीय संघाचा श्रीलंकेवर विजय

फास्ट बॉलर दीपक चहरने केलेल्या 69 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात तीन विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने हे वृत्त दिलं आहे.

दीपक चहर, भारत, श्रीलंका, वनडे क्रिकेट

फोटो स्रोत, ISHARA S. KODIKARA

फोटो कॅप्शन, दीपक चहर

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 275 धावांची मजल मारली. चरिथ असालंकाने 65 धावांची खेळी केली. अविष्का फर्नांडोने 50 तर चमिका करुणारत्नेने 44 धावा केल्या. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाची अवस्था 193/7 अशी झाली होती. मात्र दीपक चहरने 7चौकार आणि एका षटकारासह नाबाद 69 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने 53, मनीष पांडेने 37 तर कृणाल पंड्याने 35 धावा केल्या. भुवनेश्वर कुमार-दीपक चहर जोडीने आठव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)