जेफ बेझोस यांच 'स्पेस टुरिझम', कशी असेल ही अंतराळवारी?

जेफ बेझोस

फोटो स्रोत, BLUE ORIGIN

अमेरिकन अब्‍जाधीश बिझनेसमन आणि 'अमेझॉन'चे संस्थापक जेफ बेझोस मंगळवारी (20 जुलै) इतर तीन जणांसोबत अंतराळात झेपावले.

या अंतराळ वारीमध्ये बेझोस यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क बेझोस, 82 वर्षांचे माजी पायलट व्हॅली फ्रॅंक आणि 18 वर्षांचा विद्यार्थी ऑलिव्हर डायमन हे आहेत.

बेझोस यांची कंपनी 'ब्ल्यू ओरिजन' च्या न्यू शेफर्ड या अंतराळयानाने हे सगळेजण अंतराळात झेपावले. स्पेस टुरिझम म्हणजे अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी हे अंतराळ यान डिझाईन करण्यात आले आहे. या न्यू शेफर्ड अंतराळयानाला असणाऱ्या मोठ-मोठ्या खिडक्यांच्या द्वारे या यानातल्या लोकांना अंतराळातून पृथ्वीचं सुंदर दृश्य पाहता येईल.

उड्डाणापूर्वी सीबीएस न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत बेझोस म्हणाले, " लोक मला विचारतात मी नर्व्हस आहे का? खरं सांगायचं तर मी नर्व्हस नाही. मी उत्साहात आहे. यातून काय शिकायला मिळतं, हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे."

जेफ बेझोस अंतराळयात्रा

फोटो स्रोत, BLUE ORIGIN

बेझोस पुढे म्हणाले," आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, अंतराळ यान तयार आहे, क्रू तयार आहे आणि आमची टीम अद्भुत आहे. या सगळ्याबद्दल मला खरंच छान वाटतंय."

व्हीडिओ कॅप्शन, अंतराळात 90 मिनिटांची सफर, स्वतःच्या रॉकेटमधून!

झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव

या यानातून जाणाऱ्या व्हॅली फ्रॅंक यांनी सांगितलं," अखेर हे सगळं प्रत्यक्षात येतंय...मी यासाठी खूप वाट पाहिली आहे आणि हे माझं दीर्घकाळापासून स्वप्न आहे."

अंतराळामध्ये शून्य गुरुत्वाकर्षण म्हणजे झिरो ग्रॅव्हिटीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या हालचाली करून पाहायच्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

1960 च्या दशकामध्ये मर्क्युरी 13 नावाचा एक गट तयार करण्यात आला होता. यामध्ये व्हॅली फ्रॅंक यांचाही समावेश होता. पुरुष अंतराळ प्रवाशांप्रमाणेच या महिलांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आणि स्क्रिनींगची प्रक्रिया पार पाडावी लागली. पण त्यांना अंतराळात जाण्याची संधी देण्यात आली नव्हती.

जेफ बेझोस अंतराळयात्रा

फोटो स्रोत, BLUE ORIGIN

भारतीय वेळेनुसार मंगळवारी (20 जुलै) संध्याकाळी साडेसहा वाजता न्यू शेफर्ड यान अमेरिकेच्या टेक्सास मधून उड्डाण करेल. जेफ बेझोस यांची खासगी लॉन्च साईट असणाऱ्या वॅन हॉर्न येथून, एका रॉकेटच्या माध्यमातून हे यान लॉन्च करण्यात येईल.

जेफ बेझोस, त्यांचा भाऊ मार्क बेझोस, वॅली फ्रॅंक आणि ऑलिव्हर डायमन यांना घेऊन ही स्पेस कॅप्सूल त्यांच्या बूस्टरपासून जवळपास 76 किलोमीटरच्या उंचीवर असताना वेगळी होईल. त्यानंतर हे रॉकेट लॉन्च पॅड पासून दोन मैल अंतरावर त्याच्या पायांवर लँड होईल. तर कॅप्सुल अंतराळात 106 किलोमीटरपर्यंत आपला मार्ग कापत राहील.

जेफ बेझोस यांनी सीबीएस न्यूजला सांगितलं," आम्ही जवळपास चार मिनिटांपर्यंत झिरो ग्रॅव्हिटीमध्ये असू. आम्हाला आमच्या सीट वरून उठता येईल, तरंगता येईल आणि आकाशातून पृथ्वीकडे बघता येईल."

बेझोस यांना अंतराळात नेणारं 'न्यू शेर्फड' यान

  • या स्पेस कॅप्सूलमधून दिसणारं दृश्य हे अनोखं असेल आणि या प्रवासादरम्यानचा झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव अविस्मरणीय असेल, असं जेफ बेझोस यांची कंपनी 'ब्ल्यू ओरिजिन' ने म्हटलं आहे.
  • सर्वोच्च उंचीवरती पोहोचल्यानंतर ही कॅप्सूल खाली येऊ लागेल आणि प्रवाशांना पॅराशूटच्या मदतीने रेती असलेल्या प्रदेशात लँड करण्यात येईल.
  • अंतराळ यानातल्या प्रवाशांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटर जास्त उंचीवर नेऊन, यांना मायक्रो ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण अतिशय कमकुवत असण्याची परिस्थिती अनुभवता यावी अशी योजना आहे.
  • हा संपूर्ण प्रवास दहा मिनिटात पार पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय आणि हे सगळे प्रवासी पॅराशूट च्या मदतीने पृथ्वीवर परत येतील.

श्रीमंतांमधली अंतराळ प्रवासाची स्पर्धा

जेफ बेझोस

फोटो स्रोत, Blue Origin

'न्यू शेर्फड' अंतराळयानाचा लॉन्च म्हणजे अब्जाधीशांमधली स्पेस रेस - अंतराळात जाण्यासाठीची स्पर्धा असल्याचं म्हटलं जातंय. गेल्याच आठवड्यामध्ये ब्रिटिश उद्योगपती सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी देखील अंतराळात यशस्वी उड्डाण केलं होतं. सर रिचर्ड ब्रॅन्सन यांचं व्हर्जिन गॅलॅक्टिक रॉकेट अंतराळ कक्षेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलं होतं.जेफ बेझोस यांना हरवण्याचा आपला हेतू नव्हता, असं रिचर्ड ब्रॅन्सन यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. "अंतराळात गेल्यानंतर फक्त बाहेर पहात रहा, ही आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे," असा सल्ला देखील त्यांनी बेझोस यांना दिला होता.

व्हर्जिन गॅलॅक्टिक रॉकेट प्लेनने प्रवास करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अडीच लाख डॉलर्स खर्च करावे लागू शकतात.

'न्यू शेफर्ड'च्या तिकीटांचे दर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.

जेफ बेझोस हे जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. 2000 साली त्यांनी 'ब्लू ओरिजिन' कंपनी सुरु केली. या अंतराळ सफरीची घोषणा त्यांनी गेल्या महिन्यात केली होती. आपण आणि आपला भाऊ या अंतराळ सफरीला जाणार असल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

जेफ बेझोस यांचे 53 वर्षांचे बंधू मार्क बेझोस हे एका अॅडव्हर्टायझिंग एजंन्सीचे संस्थापक असून न्यूयॉर्कमधल्या रॉबिन हुड या समाजसेवी कंपनीचे सिनीयर व्हाईस प्रेसिडंट आहेत.

तर 18 वर्षांचा ऑलिव्हर डायमन हा 'सॉमरसेट कॅपिटल पाटर्नर्स' कंपनीचे CEO जोएस डायमन यांचा मुलगा आहे.

बेसुमार खर्च आणि टीका

या अंतराळ सफरीसाठी एका अज्ञात व्यक्तीने जाहीर लिलावामध्ये 28 दशलक्ष डॉलर्सची अंतिम बोली लावत ही संधी मिळवली होती. त्या व्यक्तीच्या जागी प्रवास करण्याची संधी ऑलिव्हर डायमनला मिळतेय.

ब्लू शेफर्ड

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, ब्लू शेफर्ड यान

या लिलावादरम्यान सर्वोच्च बोली लावणारी ही व्यक्ती वेळेअभावी या मिशनवर जाऊ शकत नसल्याचं 'ब्लू ओरिजिन' कंपनीने म्हटलंय.

जोएस डायमन यांनी दुसऱ्या फ्लाईटसाठी सीट बुक केली होती, पण पहिल्या विजेत्यांनी नाव मागे घेतल्यानंतर डायमन यांना संधी देण्यात आल्याचं 'ब्लू ओरिजिन'ने म्हटलंय. जोएस डायमन यांनी आपल्या मुलाला या सफरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.

ऑलिव्हर डायमन भौतिकशास्त्राचा विद्यार्थी आहे. तर व्हॅली फ्रँक या प्रवासानंतर अंतराळा जाणाऱ्या सर्वात जास्त वयाच्या व्यक्ती ठरतील.

पण अंतराळ सफरीसाठी बेसुमार खर्च करण्यासवरुन जेफ बेझोस आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यावर टीकाही केली जातेय.अब्जाधीशांनी याच पैशांचा वापर हवामान बदलाच्या विरोधातल्या लढाईमध्ये किंवा जागतिक साथीचा मुकाबला करण्यासाठी करायला हवा होता, असं अनेकांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)