नासा मंगळ ग्रहावर ऑक्सिजन बनवण्यात यशस्वी

फोटो स्रोत, NASA
- Author, जोनाथन अमॉस
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हर या उपकरणाने मंगळावर कार्बन डायऑक्साईडपासून ऑक्सिजनची निर्मिती केली आहे.
नासाच्या मंगळ मोहिमेत प्राप्त झालेलं हे दुसरं यश आहे.
याआधी मंगळ ग्रहावर एक छोटं हेलिकॉप्टर उडवण्याची कामगिरी नासाने सोमवारी (19 एप्रिल) करून दाखवली होती.
मंगळावर ऑक्सिजन निर्मितीचं हे काम एका टोस्टरच्या आकाराच्या रोव्हरकडून करण्यात आलं. याला (MOXIE) मॉक्सी असं संबोधतात. MOXIE म्हणजे Mars Oxygen In-Situ Resource Utilization Experiment होय.
मॉक्सीच्या मदतीने मंगळावर 5 ग्रॅम इतकं ऑक्सिजन निर्माण करण्यास नासाला यश आलं. मंगळ ग्रहावर एका अंतराळवीराला 10 मिनिटं पुरेल इतका हा ऑक्सिजन आहे.
भविष्यात मंगळ मोहिमांमध्ये मॉक्सीचा चांगला उपयोग होईल, असं नासाला वाटतं. मंगळ मोहिमांवर जाणाऱ्या अंतराळवीरांना यामुळे पृथ्वीवरूनच सगळा ऑक्सिजनसाठा नेण्याची गरज भासणार नाही.
याशिवाय, ज्वलनप्रक्रियेसाठीही ऑक्सिजन गरजेचा असतो. रॉकेटमध्ये इंधन पेट घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण अत्याधिक आहे. येथील वातावरणात 96 टक्के कार्बन डायऑक्साईन आढळून येतं. तर मंगळावर ऑक्सिजनचं प्रमाण फक्त 0.13 टक्के इतकं आहे. दुसरीकडे, पृथ्वीवर ऑक्सिजनचं प्रमाण 21 टक्के इतकं आहे.

फोटो स्रोत, NASA
नासाचं मॉक्सी हे उपकरण कार्बन डायऑक्साईडच्या रेणूमधून (CO2) ऑक्सिजन वेगळा काढू शकतं. या प्रक्रियेतून कार्बन मोनॉक्साईड हा वायू मंगळाच्या वातावरणात बाहेर सोडला जातो.
मॉक्सी उपकरण चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी नासाकडून कठोर परिश्रम घेण्यात येत आहेत. प्रतितास 10 ग्रॅम ऑक्सिजनची निर्मिती मॉक्सीने करावी, असं उद्दीष्ट शास्त्रज्ञांनी ठेवलं आहे.
एका दुसऱ्या ग्रहावर ऑक्सिजनची निर्मिती करणारं मॉक्सी हे पहिलंच उपकरण आहे. त्याशिवाय अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे.
भविष्यातील लिव्ह ऑफ द लँड या मोहिमेला याची खूप मदत होईल. दुसऱ्या ग्रहावरील वातावरणाचा वापर करून प्राणवायू बनवण्याच्या या पद्धतीला In-Situ रिसोर्स यूटिलायझेशन असं संबोधतात, अशी माहिती ट्रडी कोर्ट्स यांनी दिली.
ट्रडी कोर्ट्स हे नासाच्या तंत्रज्ञान प्रदर्शन विभागाचे संचालक आहेत.
मंगळावर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात बनवण्यात अनेक आव्हानं आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








