You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनसुख मांडवीय यांचा अभाविप कार्यकर्ता ते आरोग्यमंत्री हा प्रवास कसा झाला?
- Author, रॉक्सी गागडेकर छारा
- Role, अहमदाबाद
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवण्यात गुजरातच्या अनेक नेत्यांनी बाजी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच गुजरातच्या आणखी सात नेत्यांना कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे.
पुरुषोत्तम रुपाला (मत्स्योत्पादन, पशूसंवर्धन आणि दुग्धविकास), दर्शना जरदोस (राज्यमंत्री रेल्वे आणि वस्त्रोद्योग), देऊसिंह चौहान (राज्यमंत्री, दळणवळण मंत्रालय), महेंद्र मुजपारा (राज्यमंत्री महिला व बालकल्याण) आणि मनसुख मांडवीय (आरोग्य मंत्री) यांचा त्यात समावेश आहे. तर इतर दोन सदस्य हे गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य असलेले एस. जयशंकर आणि स्मृती इराणी आहेत.
या सातपैकी दोन नेते हे राज्यात दबदबा असलेल्या पाटीदार समाजाचे आहेत. तर तीन ओबीसी समुदायातील आहेत. त्यात महेंद्र मुजपारा हे कोळी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. गुजरातमध्ये मताधिक्याचा विचार करता या समुदायाचं प्राबल्य आहे.
या सर्वांमध्ये तरुण असलेले मनसुख मांडवीय हे देखील लेवा पाटीदार समाजातील आहेत. या समाजाचंही गुजरातमध्ये प्रस्थ आहेत. गुजरातमध्ये मांडवीय यांच्यापूर्वी लेवा पाटीदार समाजातील नेत्यांपैकी मोठं नाव होतं, गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल याचं. त्यानंतरच 2001 मध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते.
केशुभाई पटेल यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतल्यानंतर या समाजातील नेतृत्व आणि सत्ता यांच्यात एक प्रकारची दरी निर्माण झाली होती. ती दरी मांडवीय यांच्या रुपानं भरुन निघणार असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकाचं मत आहे.
गुजरातच्या राजकारणात पाटीदार समाजाची मतं कायमच निर्णायक ठरली आहेत. त्यात आता पक्षानं लेवा पाटीदार समाजाचा पाठिंबा मिळण्यासाठी मांडवीय यांच्या रुपानं नवं नेतृत्व पुढं केलं असल्याचं, भाजपचे नेते सांगतात.
पाटीदार नेते असण्याबरोबरच मांडवीय हे मोदी सरकारमधील RSS मधून आलेले महत्त्वाचे नेतेदेखील आहेत. सौराष्ट्र भागामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शक्ती वाढवली आहे. RSS मधील त्यांच्या स्थानामुळं मांडवीय यांनी भाजपमध्येही कमी वेळेत मोठे नेते अशी ओळख मिळवली आहे.
मांडवीय यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1992 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) च्या कार्यकारी सदस्य पदापासून केली होती. त्यानंतर 1996 मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चं काम करू लागले.
1998 मध्ये त्यांची निवड पालिताना येथील भाजप तालुकाध्यक्ष पदावर झाली. संपूर्ण तालुक्याची जबाबदारी असल्यानं हे महत्त्वाचं पद होतं. पालितना हे गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात आहे.
मांडवीय यांचा जन्म पालिताना येथील एका लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला होता. गावातील सरकारी शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर भावनगर आणि दंतीवाडामध्ये त्यांनी उच्चशिक्षण घेतलं.
2002 मध्ये पालिताना विधानसभा मतदारसंघातून त्यांना तिकिट देण्यात आलं. याचवर्षी नरेंद्र मोदी यांची गुजरातमधील सर्वात मोठे नेते अशी प्रतिमा तयार झाली. त्यावेळी 28 वर्षांचे असलेले मालवीय निवडणुकीत सहज विजयी झाले. 2002 मधील सर्वात तरुण आमदारांपैकी ते एक होते. त्यानंतर 2007 मध्येही विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला.
पदयात्रा आणि सायकल यात्रांमधून प्रसिद्धी
मोदींच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी मांडवीय यांनी 2002 आणि 2007 मध्ये दोन पदयात्रा काढल्या. 'कन्या केलावनी' (मुलीचे शिक्षण) या नावानं त्यांनी पदयात्रा काढल्या होत्या. या पदयात्रांच्या माध्यमातून त्यांनी पलिताना मतदारसंघातील 200 गावांमध्ये पक्षाचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा पाया आणखी मजबूत केला. त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक मुलींचे शिक्षण पुन्हा सुरू केलं आणि मुलींचं शाळा सोडण्याचं प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणावर कमी झालं.
दीर्घकाळापासून मोदींचे निकटवर्तीय
मांडवीय हे तेव्हापासूनच मोदींच्या जवळचे बनले होते. 2009 मध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये मोदींनी भाजप नेत्यांना मांडवीय यांचं उदाहरण दिलं होते. मांडवीय यांना राजकारणात उज्ज्वल भवितव्य असल्याचं ते म्हणाले होते.
नवी जबाबदारी मिळाल्यानंतर मांडवीय यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण त्यांच्याबरोबर काम केलेल्या आणि गेल्या काही वर्षांमध्ये मांडवीय यांचं काम जवळून पाहिलेल्या, नेत्यांशी बीबीसीनं चर्चा केली. मनसुख मांडवीय यांचा अभाविप कार्यकर्ता ते आरोग्यमंत्री हा प्रवास कसा झाला?
इतरांबद्दल विचार करण्याचा त्यांचा स्वभाव आणि अगदी तळाच्या कार्यकर्त्यांबरोबर जुळलेली नाळ हे त्यांच्या यशाचं गमक असल्याचं यापैकी बहुतांश नेत्यांनी म्हटलं.
मांडवीय यांच्या आरएसएसमधील संबंधांचा त्यांना पक्षात स्वतःचं स्थान मजबूत करण्यात मोठा फायदा झाल्याचं त्यांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते हेमंत भट म्हणाले.
पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसंच स्वतःच्या चुका मान्य करून त्यात दुरुस्ती करणं आणि नव्या गोष्टी शिकण्यातही त्यांना अडचण नसते. ते नव्या गोष्टी वेगानं शिकतात आणि बदलही स्वीकारतात असंही ते म्हणाले.
कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेच्या काळात त्यांच्याकडे खते आणि रसायन मंत्रालयाचा राज्यमंत्रीपदाचा पदभार होता. ''औषध कंपन्यांना कच्च्या मालाचा पुरवठा होण्यात खंड पडणार नाही यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
रेमडेसिवीरच्या उत्पादनात अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले. त्यांनी अनेक उत्पादन कंपन्यांना भेटी दिल्या. कंपन्यांना कच्चा माल वेळेत मिळावा यासाठी सर्व सरकारी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले,'' असंही भट म्हणाले.
अभाविप कार्यकर्ता ते राष्ट्रीय नेतृत्व
पलितना मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिल्यानंतर 2012 मध्ये ते गुजरातमधून खासदार बनले. 2013 मध्ये गुजरातमध्ये राज्य सचिव पदासाठीही त्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदीचा राष्ट्रीय नेते म्हणून उदय झाला. तेव्हा भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेची जबाबदारी त्यांच्यावरच होती. गुजरातमध्ये भाजपच्या सर्वाधिक सदस्यांची नोंदणी करण्याचा विक्रमही मांडवीय यांच्या नावावर आहे.
2015 मध्ये त्यांची गुजरातच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. 2016 मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री बनले. रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी, रसायन आणि खते या खात्यांचा त्यांच्याकडं कारभार होता.
2018 मध्ये पुन्हा एकदा राज्यसभेवर ते निवडून आले. 2024 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य असतील. त्यांनी 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांत आणि 2020 मध्ये दावोस इथं झालेल्या जागतिक अर्थ परिषदेतही भारताचं प्रतिनिधित्व केलं. 2019 मध्ये त्यांना युनिसेफच्या वतीनं 'मेन फॉर मेन्स्ट्रुएशन' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
स्वच्छ प्रतिमा, पण...
गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोनाची स्थिती हाताळण्यात अपयश आल्यानं त्यांच्या जागी मांडवीय यांची वर्णी लागणार, अशा शक्यतांचं वृत्त एका पत्रकारानं लिहिलं होतं.
त्यानंतर पोलिसांनी या पत्रकाराला अटक केली होती. त्यावेळी मांडवीय यांचं नाव चर्चेत आलं होतं. अनेक माध्यमांनी हे वृत्त दिलं होतं. त्यापैकी एका पत्रकाराला अटक करण्यात आली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)