You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे राज्यात भाजपला एक नंबरचा पक्ष करतील - नितेश राणे #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आढावा.
1. नारायण राणे भाजपला एक नंबरचा पक्ष करतील - नितेश राणे
भाजपला राज्यात या पुढच्या काळामध्ये एक नंबरचा पक्ष करण्यामध्ये नारायण राणे यांच नेतृत्त्वं महत्त्वाचं ठरेल, असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय.
नारायण राणे यांनी काल (7 जुलै) दिल्लीत केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. राणे कुटुंबियांसाठी हा सुवर्णक्षण असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय.
नारायण राणेंनी नेहमीच पदाला शंभर टक्के न्याय देण्याचं काम केलं असून मंत्रिपद ही वेगळी जबाबदारी आहे आणि वेगळ्या स्तरावर देशाची सेवा करायची संधी असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय.
ई-सकाळने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे.
2. एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक
माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय.
पुण्यातल्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंगळवारी ईडीने जवळपास 13 तास चौकशी केल्याचं लोकमतने बातमीत म्हटलंय.
खडसे फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना भोसरीमधला एक भूखंड खडसेंची पत्नी आणि जावयाच्या नावावर घेण्यात आला होता. याच खरेदीविषयीची चौकशी सुरु आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांची आज (8 जुलै) होणार असलेली पत्रकार परिषद त्यांची प्रकृती खालावल्याने रद्द करण्यात आलीय.
3. तिसऱ्या लाटेमध्ये उद्योग सुरु राहतील यादृष्टीने नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
संभाव्य तिसऱ्या लाटेमध्येही उद्योग सुरु राहतील अशा प्रकारे नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
यासाठी राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या मोठ्या उद्योगपतींची बैठक घ्यावी, असं सांगण्यात आलंय.
ज्या उद्योगपतींना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांच्या राहण्याची सोय करणं शक्य आहे तिथे त्यांनी तशी व्यवस्था करावी आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी कंपनीच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची सोय करावी, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
ABP माझाने याविषयीची बातमी दिली आहे.
4. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचं निधन
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचं सिमल्याध्ये निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.
वीरभद्र सिंह यांना एप्रिल आणि जून अशी दोनदा कोव्हिड-19ची लागण झाली होती. त्यांच्यावर सिमल्यातल्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
वीरभद्र सिंह 9 वेळा आमदार तर 5 वेळा खासदार होते. त्यांनी 6 वेळा हिमाचल प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं.
हिंदुस्तान टाईम्सने याविषयीची बातमी दिली आहे.
5. सोनं 1500 रुपयांनी महागलं
गेल्या 5 दिवसांमध्ये सोनं 1500 रुपयांनी महागलंय. सोन्याचा दर आता 47, 800 रुपयांवर पोहोचलाय.
टीव्ही9 मराठीने ही बातमी दिलीय.
जागतिक बाजारपेठेतही सोनं गेल्या 3 आठवड्यांच्या उच्चांकांवर होतं. असं असलं तरी सोनं आजवरच्या उच्चांकी पातळीपेक्षा कमी किंमतींवर आहे. ऑगस्ट 2020मध्ये सोन्याचे दर 56,200 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते.
डॉलरमध्ये होणारी घसरण आणि कोव्हिड 19 मुळे असलेली जगभरातली भीती यामुळे सोन्याच्या दरात चढउतार होत असल्याचं सांगितलं जातंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)