You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: मोदींच्या मंत्रिमंडळातील या 12 नेत्यांनी दिले राजीनामे
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील अनेक बड्या मंत्र्यांनी आपले राजीनामे राष्ट्रपतींकडे सोपवले आहेत.
राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत अनेक मोठी नावे असल्याने याविषयी जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार, खते व रसायनमंत्री सदानंद गौडा यांनी आपले राजीनामे राष्ट्रपतींकडे पाठवून दिले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज (बुधवार, 7 जुलै) सायंकाळी 6 वाजता होणार आहे, अशी माहिती डीडी न्यूजने ट्विट करून दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. मंगळवारी चार राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले. तर चार नवे राज्यपाल बनवण्यात आले. त्यामुळे कॅबिनेटच्या विस्ताराच्या चर्चांना आणखीनच बळ मिळालं होतं.
त्यानंतर केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांना कर्नाटकचे राज्यपाल बनवण्यात आलं. त्यामुळे मंत्रिमंडळातील आणखी एक पद रिक्त झालं.
यापूर्वी माजी मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर तसंच अकाली दल, शिवसेना हे सरकारमधून बाहेर पडल्यानंतर काही मंत्रिपदं रिक्त झाली होती. त्यामुळे अनेक मंत्र्यांवर एकाच वेळी दोन ते तीन मंत्रालयांचा कार्यभार सांभाळावा लागत होता.
मंत्रिमंडळ विस्तारामुळे या मंत्र्यांवरील कामाचा ताण दूर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
कुणी कुणी दिला राजीनामा?
1. डॉ. हर्षवर्धन
कोरोनाच्या काळात डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्यमंत्रिपद होतं. तसेच त्यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचा पदभार देखील होता.
2. थावरचंद गहलोत -
सामाजिक न्याय व हक्क मंत्री थावरचंद गेहलोत यांची वर्णी राज्यपालपदावर लागली आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाने दिलेली कामगिरी नेहमी प्रामाणिकपणे आपण बजावली असं म्हणत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
3. रमेश पोखरियाल निशंक
सध्याचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत.
4. संतोष गंगवार
मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी संतोष गंगवार यांनी देखील कामगार मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गंगवार हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देखील मंत्रिमंडळात होते.
5. सदानंद गौडा
खते व रसायनमंत्री सदानंद गौडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
6. प्रतापचंद्र सारंगी
ओडिशातील बालासोर या मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेलेले प्रतापचंद्र सारंगी हे मोदींच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाचे राज्यमंत्री होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
7. बाबुल सुप्रियो
पश्चिम बंगाल येथील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले बाबूल सुप्रियो हे मंत्री होण्याआधी प्रसिद्ध गायक होते. त्यांच्याकडे पर्यावरण, वन आणि हवामान बदल या खात्याचे राज्यमंत्रिपद होते. त्यांनी देखील राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्याची बातमी त्यांनी सोशल मीडियावरून दिली.
8. प्रकाश जावडेकर
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांनी राजीनामा दिला आहे.
9. रविशंकर प्रसाद
विधी आणि न्याय, तसेच माहिती तंत्रज्ञान या दोन महत्त्वाच्या पदांचा पदभार असलेले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
10. संजय धोत्रे
महाराष्ट्रातले खासदार आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
11. रतनलाल कटारिया
जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी राजीनामा दिला आहे.
12. देवश्री चौधरी
महिला आणि बाल कल्याण खात्याच्या राज्यमंत्री देवश्री चौधरी यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)