कोरोना औरंगाबाद : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण, कोरोना नियम पायदळी, #5मोठ्याबातम्या

इम्तियाज जलील

फोटो स्रोत, IMTIAZ JALEEL

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण, कोरोनाच्या नियमांना हरताळ

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत औरंगाबादेत एमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जलील यांच्यावर चक्क नोटांची उधळण करण्यात आली. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.

औरंगाबादधल्या खुलताबाद परिसरात कव्वालीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते.

कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलिल यांचं व्यासपीठावर आगमन होताच, तिथं उपस्थित असलेल्या कोही लोकांनी त्यांच्यावर नोटांची उधळण केली. याबाबतचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह या व्हीडिओत दिसणाऱ्या एकाही व्यक्तीने मास्क घातला नव्हता. औरंगाबादमध्ये सध्या विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

अशातच शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कव्वालीच्या कार्यक्रमाला शेकडोंची गर्दी जमली होती.

2. राज्य सरकारकडून जाहिरातींवर 155 कोटी खर्च

महाविकास आघाडी सरकारने गेल्या 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल 155 कोटी खर्च केलेत. त्यामध्ये कोरोना लसीकरण, शिवभोजन थाळी, निसर्ग चक्रीवादळ याबाबतच्या प्रसिद्धीवर मोठ्याप्रमाणात खर्च झाल्याची माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानं दिली आहे.

या खर्चात जवळपास 10 कोटी रुपये समाजमाध्यमांवर खर्च झाला असून सरकारच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक महिन्याला 9.6 कोटी खर्च झाल्याची बाब समोर आली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, परमबीर सिंह, सचिन वाझे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सरकारच्या स्थापनेपासून प्रसिद्धी मोहिमेवर करण्यात आलेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती. त्यानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने 11 डिसेंबर 2019 ते 12 मार्च 2021 या 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर केलेल्या खर्चाची माहिती उपलब्ध करून दिली.

यात 2019 मध्ये 20.31 कोटी खर्च करण्यात आले असून नियमित लसीकरण प्रचारावर सर्वाधिक 19.92 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. वर्ष 2020 मध्ये एकूण 26 विभागाच्या प्रसिद्धी मोहिमेवर एकूण 104.55 कोटी खर्च करण्यात आले. यात महिला दिनानिमित्त प्रसिद्धी मोहिमेवर 5.96 कोटी खर्च करण्यात आले आहे. तर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने 9.99 कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियानावर 19.92 कोटी, सरकारच्या विशेष प्रसिद्धी मोहिमेवर चार टप्प्यात 22.65 कोटी खर्च करण्यात आले आहेत.

3. लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या सलून व्यावसायिकाची आत्महत्या

सततच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने जळगावातील एका सलून व्यवसायिकानं आत्महत्या केली आहे.

रविवारी (4 जून) सकाळी 8.30 वाजता ही घटना उघडकीस आली. गजानन कडू वाघ असं मृत सलून व्यवसायिकाचं नाव आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

35 वर्षांचे गजानन वाघ गेल्या वर्षीपासून जळगाव शहरात स्थायिक झाले होते. लक्ष्मीनगरात खोली भाड्याने घेऊन तिथं ते पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. सलून दुकानावर कारागीर म्हणून ते काम करीत होते. पहील्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे दुकानं बंद पडली.

त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला होता. सुरुवातीच्या काळात सलून दुकानदारांकडून काही प्रमाणात मदत मिळाली. मात्र लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली. त्यातून त्यांनी हातउसनवारी करून घरखर्च भागवण्यास सुरुवात केली.

अनलॉक झाल्यांनतरही पुरेसे काम त्यांना मिळत नव्हते. डोक्यावरील कर्ज वाढत चालले होते. यातून पैसे परत मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाला होता.

4. 'इतिहास बनवायचा असेल, तर तैमूर, औरंगजेब पैदा व्हायला नकोत'

हरियाणा भाजपचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सुरज पाल अमू यांनी रविवारी (4 जून) गुडगावच्या पतौडी भागात महापंचायतीचं आयोजन केलं होतं.

यावेळी बोलताना ते म्हणाले, "इतिहास बनवायचा असेल तर आता तैमूर, औरंगजेब, बाबर आणि हुमायून यांचा जन्म व्हायला नको." इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

सुरज पाल अमू

फोटो स्रोत, Suraj Pal Amu/FACEBOOK

फोटो कॅप्शन, सुरज पाल अमू

"भारत जर आपली माता असेल, तर पाकिस्तानचे आम्ही बाप आहोत. त्यामुळे या पाकिस्तान्यांना आम्ही इथली घरं भाड्यानं राहण्यासाठी देणार नाही. यांना या देशातून हाकलून लावा, तसा प्रस्ताव मंजूर करा," असं त्यांनी म्हटलं आहे.

लव्ह जिहाद आणि लोकसंख्या नियंत्रणाविषयीचा कायदा, यावर चर्चा करण्यासाठी या महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

5. दुबार पेरणीचं संकट गडद

देशात मान्सूनचं आगमन होऊन काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र पूर्ण देशात मान्सून पोहोचण्याआधीच त्याच्या प्रवासात खंड पडल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. तीन आठवड्यापासून राज्यात मान्सून रुसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट गडद होताना दिसत आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

सोयाबीन पेरणी

काही दिवसांपूर्वी हवामान खात्यानं देशात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूननं दिमाखात आगमन केलं. त्यानंतर मात्र पावसानं संपूर्ण देशात ब्रेक घेतला आहे.

दरम्यानच्या काळात देशातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे. देशात 7 जुलैपर्यंत मान्सूनची हीच स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)